

‘त्या’ भावी नगरसेवकांना हवाय युरीचा आशीर्वाद !
राजकारणात यशस्वी होण्यासाठी ‘गॉड फादर’ची आवश्यकता असते. जिल्हा पंचायत निवडणुकीनंतर लगेच पालिका निवडणुका होणार आहेत. नगरसेवक बनण्यासाठी इच्छुक असलेले आता पासूनच कामाला लागले आहेत. कुंकळ्ळीचे नगरसेवक बनण्यासाठी अनेक जण इच्छुक आहेत. या इच्छुकांना वाटते की, आमदार युरी आलेमाव यांच्या पाठिंब्याशिवाय नगरसेवक बनणे शक्य नाही. म्हणून पालिका निवडणुकीत उतरण्यासाठी गुडघ्याला बाशिंग बांधून असलेले काही भावी नगरसेवक युरी आलेमाव यांच्या आशीर्वादाची प्रतीक्षा करीत आहेत. पालिका निवडणुकीत युरीचा आधार व मदत मिळविण्यासाठी अनेकजण युतीच्या आसपास घोळताना दिसतात.काही इच्छुक युरीच्या वाढदिवसाच्या आयोजनात हिरहुरीने वावरताना दिसत होते.काही प्रभागात एक पेक्षा जास्त इच्छुक युरीच्या आशीर्वादाच्या अपेक्षेत असल्याने युरी आता कोणाला आशीर्वाद देतात, हे पहावे लागणार. युरी तसे हुशार ज्याच्याकडे जिंकण्याची ताकत असेल त्यालाच ते आपल्या कळपात घेणार, हे मात्र निश्चित.
म्हणून बिहार दौरा रद्द
बिहारच्या मुख्यमंत्रिपदी नितीशकुमार दहाव्यांदा विराजमान होतील. त्यानिमित्त एनडीए सरकारच्या भव्य अशा शपथविधी सोहळ्यास भाजपशासित राज्यांचे मुख्यमंत्री, केंद्रीय मंत्रिमंडळातील सदस्यांनी उपस्थित राहण्याचे नियोजन करण्यात आले आहे. मुख्यमंत्री डॉ. प्रमोद सावंत यांनाही सोहळ्याचे निमंत्रण होते. मात्र इफ्फीच्या उद्घाटन सोहळ्यासाठी मुख्यमंत्र्यांची उपस्थिती आवश्यक असल्याने त्यांनी बिहार दौरा रद्द केला आहे.
पेडण्यात रोजगार, तोही कंत्राटी
राज्य सरकार कंत्राटी पद्धतीने कर्मचारी भरती करते. त्यांना वर्षानुवर्षे सेवेत हंगामी म्हणूनही नियुक्त करत नाही. याच पावलांवर आता केंद्रीय आयुष मंत्रालयांतर्गतच्या धारगळ येथील अखिल भारतीय आयुर्वेद संस्थान या केंद्र सरकारच्या संस्थेने पावले टाकणे सुरु केले आहे. त्यांनी ७८ जागा भरण्यासाठी अर्ज मागवले आहे. मनुष्यबळ पुरवणाऱ्या एका संस्थेच्या माध्यमातून ही कंत्राटी भरती केली जाणार आहे. पेडण्यात प्रकल्प आले की रोजगार मिळेल अशी आशा दाखवणाऱ्यांना ही चपराक आहे. आमदार प्रवीण आर्लेकर आता तरी तोंड उघडतील काय याकडे लोकांचे लक्ष आहे.
शहांना ‘हाक’ का?
राज्यात वारंवार घडत असलेले गुन्हे रोखण्यात सरकार, पोलिसांना अपयश येत आहे. इफ्फी, जुने गोवेतील सेंट फ्रान्सिस झेवियर फेस्त आणि नववर्षाच्या पार्श्वभूमीवरच राज्यातील कायदा–सुव्यवस्था ढेपाळली आहे. परिणामी, राज्यातील स्थानिक जनता आणि राज्यात देश-विदेशातून गोवा बघण्यासाठी किंवा जीवाचा गोवा करण्यासाठी येत असलेल्या पर्यटकांमध्ये भीतीचे वातावरण पसरले आहे. त्यामुळे गोव्यातील कायदा–सुव्यवस्था अबाधित राखण्यात हस्तक्षेप करण्याची मागणी काँग्रेस प्रदेशाध्यक्ष अमित पाटकर यांनी थेट केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांच्याकडे केली. मुळात सरकार ज्या–ज्या वेळी अपयशी ठरते, त्या–त्यावेळी स्थानिकांच्या बाजूने रस्त्यावर उतरून सरकारला ठिकाणावर आणण्याचे काम विरोधी पक्षांचे असते. काँग्रेस तर राज्यातील प्रमुख विरोधी पक्ष आहे. तरीही या पक्षाचे प्रदेशाध्यक्ष स्वत: काहीही न करता शहांना हाक का देत आहेत? असा प्रश्न जनतेकडून उपस्थित होत आहे. ∙
सावंत नको, इजिदोर कसे चालले?
येत्या जिल्हा पंचायत निवडणुकीत काँग्रेस, गोवा फॉरवर्ड आणि आरजीपी या तीन पक्षांतील युतीबाबत तीन बैठका झाल्याचे काँग्रेस प्रदेशाध्यक्ष अमित पाटकर यांनी बुधवारी सांगितले. त्यामुळे पुढील काही दिवसांत या युतीवर शिक्कामोर्तब होण्याची शक्यता आहे. काँग्रेससोबत अगोदरच युती असलेल्या गोवा फॉरवर्डने जिल्हा पंचायत निवडणुकीच्या तोंडावर मांद्रेतील सामाजिक कार्यकर्ते ॲड. अमित सावंत यांना पक्षात घेतले आणि त्यांच्यावर भू–माफियांशी संबंध असल्याचा ठपका ठेवून पक्षातूनही काढून टाकले. त्यानंतर सावंत यांना तत्काळ काँग्रेसने प्रवेश दिल्यानंतर गोवा फॉरवर्डचे अध्यक्ष तथा आमदार विजय सरदेसाईंनी काँग्रेसवर जळफळाट केला. पण, २०१९ विधानसभा निवडणुकीत काँग्रेसच्या उमेदवारीवर निवडून आलेल्या आणि त्यानंतर लगेचच काँग्रेसशी गद्दारी करीत इतर नऊ जणांसोबत भाजपात गेलेल्या इजिदोर फर्नांडिस यांच्याशी विजयनी लगेचच कसे काय संधान बांधले? या प्रश्नाचे उत्तर काँग्रेस कार्यकर्तेच शोधत आहेत.
सिद्धार्थचा मार्ग मोकळा !
ज्याच्या बरोबर जनता आहे, त्या राजकारण्याला निवडणूक जिंकण्यासाठी कोणत्याही पक्षाच्या उमेदवारीची गरज नसते. कारण त्याच्या जवळ जनतेची उमेदवारी असते. शेल्डे जिल्हा पंचायत मतदार संघातून पुन्हा एकदा निवडणुकीत उतरण्यासाठी विद्यमान झेडपी व दक्षिण गोवा जिल्हा पंचायतीचे उपाध्यक्ष सिद्धार्थ गावस देसाई यांचा मार्ग मोकळा झाला आहे. सिद्धार्थ देसाई यांना कुडचडेचे आमदार नीलेश काब्राल यांनी व काब्राल यांचे राजकीय प्रतिस्पर्धी रोहन गावस देसाई यांनी आपला पाठिंबा दर्शविला आहे. आता कुडचडे मतदार संघातील भाजपाच्या दोन बड्या नेत्यांचा पाठिंबा लाभल्यावर सिद्धार्थचा मार्ग अडविण्याचे धाडस कोण करू शकतो? असे शेल्डेतील मतदार विचारीत आहेत.
नेमचि येतो इफ्फी
इफ्फी म्हणजे आंतरराष्ट्रीय चित्रपट महोत्सव होणे ही आता नवी बाब राहिलेली नाही. आयोजक संस्था असलेल्या गोवा मनोरंजन संस्थेवरच्या पदाधिकाऱ्यांनीही दशक गाठले आहे. असे असले तरी इफ्फीच्या आयोजनाची तयारी कधीच वेळेच पूर्ण होत नाही. बुधवारी शहरात रंगरंगोटीची कामे सुरु होती. इफ्फी उद्घाटन सोहळ्याच्या ठिकाणी ठोकाठोकी सुरु होती. घाईघाईने कामे उरकून गुणवत्तेला बगल देण्याचा हा प्रकार असल्याची उघड चर्चा आहे. पण त्याचे सोयरसुतक कोणाला नसावे.
न्यायालयाबाहेरचे ‘चेकिंग’ चर्चेत
सध्या राज्यात सुरू असलेल्या सागर कवच मोहिमेमुळे पोलिसांचे ‘चेकिंग पॉईंट्स’ अक्षरशः सुरूच आहेत. पण या तपासणीची पद्धत पाहून वाहनधारकांना पडणारे प्रश्न मात्र चर्चेत आलेत. उच्च न्यायालयात जाताना मुख्य गेटवर वेगळाच खेळ सुरू आहे. काही वाहनांना गेटवरच थांबवून काटेकोर तपासणी तर काहींना सहजच ‘जा, पुढे जा’ अशी मोकळीक. यातला ‘सिलेक्शन प्रोसेस’ नेमका कोणत्या निकषांवर चालतो, हे कोडे नागरिकांना पडले आहे. विशेष गंमत म्हणजे दुचाकीस्वारांना गेटजवळ थांबवून बारकाईने तपासले जाते. पण चारचाकी मात्र तपासली जात नाही. यामुळे हे न्यायालयाबाहेरची सुरक्षा ‘चेकिंग’ आहे की फक्त दुचाकी चालकांची ‘चेकिंग’ अशी चर्चा न्यायालयात रंगत आहे. या तपासणीतील गोंधळाचे स्पष्टीकरण फक्त वरिष्ठ अधिकारीच देऊ शकतात, पण सध्या वाहनधारकांमध्ये सुरू असलेली ‘चेकींग’वरील चर्चा मात्र चांगलीच रंगत आहे.
द्धार्थचा मार्ग मोकळा !
ज्याच्या बरोबर जनता आहे, त्या राजकारण्याला निवडणूक जिंकण्यासाठी कोणत्याही पक्षाच्या उमेदवारीची गरज नसते. कारण त्याच्या जवळ जनतेची उमेदवारी असते. शेल्डे जिल्हा पंचायत मतदार संघातून पुन्हा एकदा निवडणुकीत उतरण्यासाठी विद्यमान झेडपी व दक्षिण गोवा जिल्हा पंचायतीचे उपाध्यक्ष सिद्धार्थ गावस देसाई यांचा मार्ग मोकळा झाला आहे. सिद्धार्थ देसाई यांना कुडचडेचे आमदार नीलेश काब्राल यांनी व काब्राल यांचे राजकीय प्रतिस्पर्धी रोहन गावस देसाई यांनी आपला पाठिंबा दर्शविला आहे. आता कुडचडे मतदार संघातील भाजपाच्या दोन बड्या नेत्यांचा पाठिंबा लाभल्यावर सिद्धार्थचा मार्ग अडविण्याचे धाडस कोण करू शकतो? असे शेल्डेतील मतदार विचारीत आहेत.
काणकोणातील ‘बॉस’ फॉरवर्डला फायद्याचा?
काणकोणातील मतदारांमध्ये ‘बॉस’ या नावाने लोकप्रिय असलेले माजी आमदार ईजिदोर फर्नांडिस यांनी काल गोवा फॉरवर्ड पक्षात प्रवेश केल्यामुळे काणकोणात याचा गोवा फॉरवर्ड पक्षाला किती फायदा होईल यावर चर्चा सुरू झाली आहे. वास्तविक त्यापूर्वी एका वृत्तवाहिनीला दिलेला मुलाखतीत इजिदोरने आपल्याला काँग्रेस पक्षात सामील व्हायचे आहे, असे सांगितले होते. पण ते सामील झाले ते गोवा फॉरवर्ड पक्षात. यामुळे आता भविष्यात गोवा फॉरवर्ड आणि काँग्रेस यांच्यात पुन्हा एकदा युती होणार या चर्चेने जोर धरला आहे. येत्या निवडणुकीत काणकाेण मतदारसंघ हा गोवा फॉरवर्डसाठी खुला असेल, त्यामुळेच इजिदोर यांनी गोवा फॉरवर्ड पक्षात प्रवेश घेतला आहे, असे म्हटले जातेय. मात्र त्यामुळे भाजपचे विद्यमान आमदार रमेश तवडकर यांच्यावर त्याचा काय परिणाम होणार याबद्दलही उलट सुलट चर्चा चालू असतानाच जि.पं. निवडणुकीत प्रशांत नाईक किती फायदा करून देतात, हा सध्या तेथे औत्सुक्याचा विषय आहे. ∙∙∙
इजिदोर झाले ‘फॉरवर्ड’!
‘भुले बिसरे गीत’ नावाचा एक जुन्या गीतांचा कार्यक्रम आपण रेडिओवर ऐकला असणार. ही जुनी गीते ऐकणारेही जुनेच असतात. त्याच प्रमाणे जुन्या पराभूत झालेल्या राजकीय नेत्यांनाही लोक विसरतात. विस्मृतीत गेलेल्या राजकीय नेत्याला पुन्हा सक्रीय राजकारणात यशस्वी होणे तेवढे सोपे नसते. अपक्ष ते काँग्रेस व काँग्रेस ते भाजपा असा राजकीय प्रवास केलेले काणकोणचे माजी आमदार इजिदोर फर्नांडिस यांनी आता गोवा फॉरवर्ड पक्षात प्रवेश केला आहे. येणाऱ्या जिल्हा पंचायत निवडणुकीत इजिदोर पैंगीण झेडपी मतदार संघातून गोवा फॉरवर्डचा उमेदवार निवडून आणणार, असा विश्वास कदाचित गोवा फॉरवर्ड पक्षाला असेल. आता या वयात माजी मंत्री इजिदोर बाब रमेश तवडकरांना आव्हान देऊ शकणार का? ‘मोडलेल्या खुर्साक कोण चेपें काडीना’ हे आता या राजकारण्यांना कोण सांगणार?∙
अँथनीचे संघटन कौशल्य
भाजपचा कुठलाही कार्यक्रम असो त्याला कुडतरीतून माणसांची कुमक आणण्याचे काम जर कोण करीत असेल तर ते गोवा तियात्र अकादमीचे अध्यक्ष अँथनी बार्बोझा हेच. वास्तविक कुडतरी मतदारसंघ हा तसा भाजप धार्जिणा नव्हे. तरीही अँथनीमुळे या मतदारसंघात भाजपाकडे बर्यापैकी कार्यकर्ते तयार झालेले आहेत. मागच्या आठवड्यात बिरसा मुंडा जयंतीनिमित्त मडगावात जी मोठी रॅली झाली होती त्यात कुडतरीहून ३०० दुचाकी आणण्याचे काम अँथनीवर साेपविले हाेते. पण अँथनीने म्हणे त्याहूनही जास्त दुचाकीस्वारांना या रॅलीत उतरविले. आणि विशेष म्हणजे, हे सगळेच दुचाकीचालक कुडतरी मतदारसंघांतले होते. कुणाकडेही चांगले संघटन कौशल्य असेल तर कामे कशी विनाव्यत्यय हाेतात, याचेच हे उदाहरण म्हटले तर अतिशयाेक्ती ठरेल का?
मुख्य सचिवांची तगमग
राज्याचे मुख्य सचिव डॉ. व्ही. कंदवेलू हे संवेदनशील गृहस्थ. नर्मविनोदी स्वभावाची झलक बोलण्यातून दाखवणारे. मोजून मापून शब्दप्रयोग करणारे. त्यांच्याकडे गृह खात्याचे सचिवपद आहे. सध्या होत असलेल्या गुन्ह्यांमुळे ते बोलण्यातून व्यथित झाल्याचे जाणवते. स्थलांतरितांमुळे हे होत असेल तर पोलिसांचे लक्ष कुठे आहे, असा त्यांचा खासगीतील प्रश्न विचार करायला लावणारा आहे. प्रशासनात अशी संवेदनशीलता काय कामाची असे वातावरण सध्या आहे. त्यामुळे त्यांची तगमग त्यांच्यापर्यंतच राहणार हे वेगळे सांगण्याची गरज भासणार नाही.
दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.