

एकदिवसीय मालिकेच्या समाप्तीनंतर आता क्रिकेट चाहत्यांचे लक्ष भारत आणि न्यूझीलंड यांच्यातील आगामी टी-२० मालिकेवर लागले आहे. २१ जानेवारीपासून या हाय-व्होल्टेज मालिकेला सुरुवात होत असून, आगामी 'टी-२० विश्वचषक २०२६' च्या पार्श्वभूमीवर ही मालिका दोन्ही संघांसाठी अत्यंत महत्त्वाची मानली जात आहे. विश्वचषकापूर्वी आपली ताकद आजमावण्यासाठी आणि योग्य संघ निवडीसाठी दोन्ही देशांकडे ही शेवटची मोठी संधी असेल.
भारत आणि न्यूझीलंड यांच्यातील टी-२० क्रिकेटचा इतिहास पाहिला तर भारतीय संघाचे पारडे किंचित जड असल्याचे दिसून येते. आतापर्यंत या दोन्ही संघांमध्ये एकूण २५ टी-२० आंतरराष्ट्रीय सामने खेळले गेले आहेत.
त्यापैकी भारताने १४ सामन्यांत विजय मिळवला आहे, तर न्यूझीलंडला १० सामने जिंकण्यात यश आले आहे. आकडेवारीनुसार भारत वरचढ असला तरी, न्यूझीलंडचा संघ 'अंडरडॉग' म्हणून ओळखला जातो आणि ते कोणत्याही क्षणी सामन्याचे चित्र पालटण्याची क्षमता ठेवतात.
या मालिकेचे वैशिष्ट्य म्हणजे हे सर्व पाचही सामने भारतातील वेगवेगळ्या शहरांमध्ये खेळवले जाणार आहेत. २१ जानेवारीला नागपूरमध्ये पहिल्या सामन्याने मालिकेचा बिगुल वाजेल.
त्यानंतर २३ जानेवारीला रायपूर, २५ जानेवारीला गुवाहाटी, २८ जानेवारीला विशाखापट्टणम आणि ३१ जानेवारीला तिरुवनंतपुरम येथे अखेरचा सामना होईल. सर्व सामने भारतीय वेळेनुसार संध्याकाळी ७ वाजता सुरू होतील, तर ६:३० वाजता नाणेफेक (टॉस) होईल.
भारतीय संघाचे नेतृत्व सूर्यकुमार यादवकडे सोपवण्यात आले असून, अक्षर पटेल उपकर्णधाराची भूमिका बजावेल. संघात संजू सॅमसन, हार्दिक पंड्या, रिंकू सिंह आणि जसप्रीत बुमराह यांसारख्या स्फोटक खेळाडूंचा समावेश आहे.
दुसरीकडे, न्यूझीलंडने मिचेल सँटनरच्या नेतृत्वाखाली अनुभवी डेवॉन कॉन्वे, डॅरिल मिचेल आणि रचीन रवींद्र यांसारख्या खेळाडूंना संधी दिली आहे. विश्वचषकासाठी अंतिम संघ निश्चित करण्याच्या दृष्टीने ही मालिका म्हणजे दोन्ही संघांसाठी एक प्रकारची 'रिहर्सल' ठरणार आहे.
दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.