Vasco electric shock death
Vasco electric shock deathDainik Gomantak

Goa Accident: गोव्यात रस्त्यांवरून चालणे ठरत आहे धोकादायक? 57 पादचाऱ्यांचा अपघाती मृत्‍यू; रस्‍ता सुरक्षेबद्दल जागृतीची मागणी

Goa Road Accident Death: २०२४ व २०२५ या दाेन वर्षांतील अपघातांची तुलना केल्‍यास गोव्‍यात एकूण अपघातांची संख्‍या ११.६३ टक्‍क्‍यांनी कमी झालेली आहे.
Published on

मडगाव: गोव्‍यातील रस्‍त्‍यांवरील वाहन अपघात आणि अपघातात होणारे मृत्‍यू यांचे प्रमाण मागच्‍या वर्षी सहा ते दहा टक्‍क्‍यांनी उतरले असले तरी रस्‍ता अपघातात मृत्‍यूमुखी पडणाऱ्या पादचाऱ्यांच्‍या संख्‍येत तब्‍बल ३५ टक्‍क्‍यांनी वाढ झालेली आहे. त्‍यामुळे या बाबींकडे एक चिंतेचा विषय म्‍हणून पाहिले जात आहे. हे मृत्‍यू कमी व्‍हावेत यासाठी तातडीने उपाय घेण्‍याची मागणी होत आहे.

२०२४ व २०२५ या दाेन वर्षांतील अपघातांची तुलना केल्‍यास गोव्‍यात एकूण अपघातांची संख्‍या ११.६३ टक्‍क्‍यांनी कमी झालेली आहे. २०२४ मध्‍ये २,६८२ अपघात राज्‍यात घडले होते. २०२५ मध्‍ये हा आकडा २,३७० एवढ्यावर खाली आला आहे.

२०२४ मध्‍ये एकूण २७१ अपघात जीवघेणे होते. त्‍यात २८६ जणांना मृत्‍यू आला हाेता. २०२५ मध्‍ये या आकडेवारीत सहा टक्‍क्‍यांनी घट झाली असून एकूण २५७ अपघातांत २६९ लाेकांना मृत्‍यू आला आहे. याउलट २०२४ मध्‍ये गोव्‍यात ४२ पादचाऱ्यांना मृत्‍यू आला होता.

२०२५ मध्‍ये त्‍यात ३५.७१ टक्‍क्‍यांनी वाढ झालेली असून मागच्‍यावर्षी एकूण ५७ पादचाऱ्यांना अपघातात मृत्‍यू आला आहे.

यासंदर्भात रस्‍ता सुरक्षा चळवळीत काम करणाऱ्या ‘गोवा कॅन’ या संस्‍थेचे निमंत्रक रोलंड मार्टिन्‍स यांना विचारले असता, रस्ता सुरक्षेचे उपाय घेत असताना राज्‍यात पादचाऱ्यांकडे विशेष लक्ष दिले जात नाही, हे त्‍यातून दिसून येते. १२ महिन्‍यांत ५७ पादचाऱ्यांना मृत्‍यू येणे ही धोकादायक बाब आहे. वाहनचालकांबरोबर पादचाऱ्यांनाही रस्‍ता सुरक्षेची माहिती देण्‍यासाठी व्‍यापक प्रमाणावर जागृती मोहीम हाती घेण्‍याची गरज त्‍यांनी व्‍यक्‍त केली.

वाहतूक विभागाचे पोलिस अधीक्षक प्रबोध शिरवईकर यांना विचारले असता, रस्‍ता सुरक्षेसंदर्भात पादचाऱ्यांमध्‍ये जागृती व्‍हावी यासाठी गाेवा वाहतूक पोलिस वेळोवेळी जागृती मोहीम हाती घेत असून पादचाऱ्यांनी पदपथावरूनच चालावे आणि ज्‍या ठिकाणी झेब्रा क्रॉसिंग्‍स आहेत त्‍या ठिकाणीच रस्‍ता ओलांडावा,

अशी सूचना आमच्‍यातर्फे केली जात आहे. काही ठिकाणी रस्‍त्‍याच्‍या बाजूला रेलिंग्‍स बसवावेत आणि काही ठिकाणी क्रॅश बॅरियर्स बसवावेत याचीही यादी आम्‍ही प्रशासनाला दिली आहे, असे त्‍यांनी सांगितले.

Vasco electric shock death
Goa Accident: वाहने चक्काचूर, टायर हवेत उडाला! पणजीत मध्यरात्री भीषण अपघात; तामिळनाडूच्या चालकाची 'अल्कोमीटर' चाचणी होणार

उजव्या बाजूने चालावे!

उजव्या बाजूने चालल्यामुळे पादचाऱ्यांना समोरून येणारी वाहने दिसतात, त्यामुळे चालकांच्या हालचाली, वाहनांचा वेग व अंतर याचा अंदाज येतो. अचानक वाहन जवळ आल्यास पादचारी लगेच सावध होऊन रस्त्याच्या कडेला सरकू शकतो.

फूटपाथ नसलेल्या ग्रामीण किंवा अरुंद रस्त्यांवर हा नियम अधिक सुरक्षित ठरतो. रात्रीच्या वेळी उजव्या बाजूने चालताना उजळ कपडे किंवा रिफ्लेक्टर वापरल्यास चालकांना पादचारी लवकर दिसतो. तसेच गटाने चालताना एकाच रांगेत चालणे आणि रस्त्याच्या कडेनेच राहणे हेही सुरक्षिततेसाठी महत्त्वाचे आहे.

Vasco electric shock death
Train Accident: काळजाचा थरकाप उडवणारा अपघात! चालत्या ट्रेनवर कोसळले क्रेन, 22 जणांचा मृत्यू, 30 हून अधिक जखमी; युद्धपातळीवर बचावकार्य सुरु VIDEO

दोन वर्षांतील अपघातांची तुलना

प्रकार २०२४ २०२५

एकूण अपघात २,६८२ २,३७०

जीवघेणे अपघात २७१ २५७

एकूण मृत्यू २८६ २६९

गंभीर जखमी २७६ २८०

किरकोळ जखमी ७६५ ३९१

दुचाकीचालक मृत्‍यू १६६ १५७

मागे बसलेल्‍यांचा मृत्‍यू ४२ ३४

पादचाऱ्यांचे मृत्‍यू ४२ ५७

प्रवाशांचे मृत्‍यू १४ ६

सायकलस्‍वारांचे मृत्‍यू ५ १

इतरांचे मृत्‍यू ० ३

गोव्‍यात पादचाऱ्यांना अपघातात येणाऱ्या मृत्‍यूचे प्रमाण राष्‍ट्रीय सरासरीपेक्षा बरेच जास्‍त असून त्‍यामुळेच गोव्‍यात यासंदर्भात विशेष मोहीम राबवावी. ज्‍या ठिकाणी लोकांचे रस्‍ता ओलांडण्‍याचे प्रमाण जास्‍त असते त्‍या ठिकाणी आता स्‍वयंचलित सिग्‍नल्‍स बसविण्‍याची गरज आहे. सर्वोच्‍च न्‍यायालयानेही पादचाऱ्यांच्‍या सुरक्षेकडे विशेष लक्ष द्या, अशा सूचना केल्‍या आहेत. या सूचनांची गांभीर्याने अंमलबजावणी व्हावी.

रोलंड मार्टिन्‍स, ‘गोवा कॅन’चे निमंत्रक

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Goa News in Marathi - Dainik Gomantak
dainikgomantak.esakal.com