Super Sunday! आशिया कपसाठी भारत-पाकिस्तानमध्ये 'कांटे की टक्कर', कधी अन् कुठे पाहता येणार अंतिम सामना? जाणून घ्या
क्रिकेट विश्वातील सर्वात मोठी आणि रोमांचक लढत म्हणून ओळखली जाणारी भारत विरुद्ध पाकिस्तान ही फाईट पुन्हा एकदा प्रेक्षकांना पाहायला मिळणार आहे. संयुक्त अरब अमिरातीमध्ये (UAE) सुरू असलेल्या अंडर-१९ आशिया चषक २०२५ च्या अंतिम फेरीत भारत आणि पाकिस्तान हे दोन कट्टर प्रतिस्पर्धी आमनेसामने ठाकले आहेत. आयुष म्हात्रेच्या नेतृत्वाखालील भारतीय संघाने उपांत्य फेरीत श्रीलंकेचा पराभव करून दिमाखात अंतिम फेरीत प्रवेश केला, तर दुसऱ्या बाजूला पाकिस्तानने गतविजेत्या बांगलादेशला पराभूत करून फायनलचे तिकीट निश्चित केले.
भारताची चमकदार कामगिरी
उपांत्य फेरीच्या सामन्यात भारताने श्रीलंकेचा ८ गडी राखून धुव्वा उडवला. प्रथम फलंदाजी करताना श्रीलंकेने १३८ धावांचे लक्ष्य दिले होते. सलामीवीर लवकर बाद झाल्यानंतर विहान मल्होत्रा (नाबाद ६१) आणि आरोन जॉर्ज (नाबाद ५८) यांनी ११४ धावांची अभेद्य भागीदारी करत भारताला सहज विजय मिळवून दिला. भारताची फलंदाजी आणि गोलंदाजी दोन्ही सध्या फॉर्मात असून स्पर्धेत संघ आतापर्यंत अजिंक्य राहिला आहे.
जेतेपदाचा दुष्काळ संपवण्याची संधी
भारतीय संघाने यापूर्वी अनेकदा आशिया चषकावर आपले नाव कोरले आहे, मात्र गेल्या चार वर्षांपासून भारताला ही ट्रॉफी जिंकता आलेली नाही. २०२४ मध्ये बांगलादेशने भारताला उपविजेतेपदावर समाधान मानण्यास भाग पाडले होते. त्यामुळे यंदा पाकिस्तानला नमवून विजेतेपदाचा दुष्काळ संपवण्याचा निर्धार भारतीय युवा संघाने केला आहे. विशेष म्हणजे, साखळी सामन्यात भारताने पाकिस्तानला ९० धावांनी पराभूत केले होते, ज्यामुळे भारतीय संघाचे मनोबल उंचावलेले आहे.
कधी आणि कुठे होणार सामना?
भारत आणि पाकिस्तान यांच्यातील हा अंतिम सामना २१ डिसेंबर २०२५ रोजी दुबईतील आयसीसी अकादमी (ICC Academy) मैदानावर खेळला जाणार आहे. भारतीय वेळेनुसार सकाळी १०:३० वाजता या सामन्याला सुरुवात होईल. चाहत्यांना हा रोमांचक सामना सोनी स्पोर्ट्स नेटवर्क (Sony Sports Network) वर थेट पाहता येईल, तसेच सोनी लिव्ह (SonyLiv) ॲपवर याच्या ऑनलाईन स्ट्रीमिंगचा आनंद घेता येईल.
दोन्ही संघ
भारतीय अंडर-१९ संघ: आयुष म्हात्रे (कर्णधार), वैभव सूर्यवंशी, आरोन जॉर्ज, विहान मल्होत्रा, वेदांत त्रिवेदी, अभिज्ञान कुंडू (यष्टीरक्षक), कनिष्क चौहान, हेनिल पटेल, खिलान पटेल, दीपेश देवेंद्रन, किशन कुमार सिंह, उधव मोहन, नमन पुष्पक, हरवंश पंगालिया, युवराज गोहिल.
पाकिस्तान अंडर-१९ संघ: समीर मिन्हास, हमजा जहूर (यष्टीरक्षक), उस्मान खान, अहमद हुसैन, फरहान यूसुफ (कर्णधार), हुजैफा अहसान, दानियाल अली खान, मोहम्मद शायन, अब्दुल सुभान, मोहम्मद सय्याम, अली रजा, मोमिन कमर, अली हसन बलूच, नकाब शफीक, मोहम्मद हुजैफा.
दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

