Goa Opinion: ‘कूल’ गोवा हा ‘कोल’ गोवा करून, विकासाच्या नावाखाली गोव्याचा जो विध्वंस चालला आहे त्याचे काय?

Goa Liberation Day: विकास हा सगळ्यांनाच हवा असतो. यात मुळीच दुमत होणार नाही. विकास हा हवाच पण तो विध्वंसक नसावा. विकास लोकाभिमुख व्हावा, लोकांच्या अडीअडचणी, समस्यांना छेद देणारा हवा.
Coal handling
Coal handling Dainik Gomantak
Published on
Updated on

शंभू भाऊ बांदेकर

आपला आपला गोवा पोर्तुगिजांच्या गुलामगिरीतून १९ डिसेंबर १९६१ रोजी मुक्त करण्यात आला. तो यानंतर संघराज्याचा अविभाज्य घटक बनला. मग गोवा संघ प्रदेशाला १९८७साली घटक राज्याचा दर्जा प्राप्त झाला. जेव्हा जेव्हा गोवा मुक्तीदिन आणि गोव्याला मिळालेले घटक राज्य आपण साजरे करतो, त्या त्या वेळी विरोधक हटकून एका गोष्टीचा उल्लेख करतात तो म्हणजे भारताच्या स्वातंत्र्यानंतर तब्बल १४ वर्षांनंतर गोवा स्वतंत्र झाला व त्याला कारण तत्कालीन प्रधानमंत्री पंडित नेहरू होते. याबाबत सत्य काय आहे ते सत्ताधारी विरोधक हे आपापल्या पद्धतीने सांगण्याचा प्रयत्न करतात.

मी त्या खोलात न जाता सत्याचा विपर्यास करू इच्छिणाऱ्या अशा लोकांना उघडे पाडण्याचा प्रथम प्रयत्न जाहीररीत्या ‘दक्षिणायन’ने केला होता.

या संस्थेचे पदाधिकारी भाई ओम दामोदर मावजो, दत्ता दामोदर नायक आणि संदेश प्रभुदेसाई या त्रयींनी हीरकमहोत्सव कार्यक्रमात सामील होण्यासाठी गोवा सरकारच्या निमंत्रणावरून राष्ट्रपती महामहीम रामनाथ कोविंद गोव्यात येताहेत हे कळताच पत्रकार परिषदेतून त्यांनी विनंती केली होती की, काही सत्ताधारी गोवा मुक्तीच्या संदर्भात पंडित नेहरूंना बदनाम करण्याचा प्रयत्न करीत आहेत, तरी गोवा मुक्तीसाठी भारताचे पहिले प्रधानमंत्री पंडित नेहरू यांनी जी ऐतिहासिक स्वरूपाची भूमिका घेतली व गोव्याला मुक्ती मिळवून दिली तिचा यथायोग्य उल्लेख राष्ट्रपतींनी आपल्या गोवा भेटीच्या वेळी करावा.

या तथाकथित ‘वादग्रस्त’ विषयाला पूर्णविराम देताना मला ‘जाणता राजा’ या महानाट्याचे लेखक निर्माता शिवचरित्रकार बाबासाहेब पुरंदरे यांचे शब्द उद्धृत करावेसे वाटतात. ते म्हणाले होते, ‘इतिहासात चंदनही खूप आहे आणि कोळसाही खूप आहे. आपण चंदन उगाळूया, कोळसा नको. चंदनाचा कोळसा करून तर नकोच नको.’

आता आपण मुख्य विषयाकडे म्हणजे ‘कूल’ गोवा (थंड गोवा) हा ‘कोल’ गोवा (कोळसा गोवा) करून विकासाच्या नावाखाली गोव्याचा जो विध्वंस चालला आहे त्याकडे वळूया...

जे आठ आमदार कॉंग्रेसच्या तिकिटावर निवडून आले व विकासाच्या नावाखाली सत्ताधारी पक्षात सामील झाले. अशांचा या कोळशासारख्या काळ्या धंद्यात समावेश असल्यामुळेच गोवा विध्वंसाकडे तर वाटचाल करत नाही ना? अशी शंका बळावते. काही जणांना कोळसा उगाळायचा उपद्व्याप करणे मनापासून का आवडते? या लोकांनी कोंबडा झाकून ठेवला, तरी पहाटे तो बांग देणारच हे वास्तव का बरे दुर्लक्षित करावे?

गोवा मुक्तीदिन आपण कालच साजरा केला, त्या निमित्ताने येथे मुक्त चिंतनाच्या माध्यमातून वाचकांशी संपर्क साधायचे मुख्य कारण म्हणजे मांडवी आणि जुवारी नद्यांच्या प्रांगणात वाढत चाललेल्या समस्यांचा महासागर, आज आपली जीवनदायिनी म्हादई नदी तर धोक्यात आहेच.

तिला न्याय देण्याचे काम येथील पर्यावरणप्रेमीच अधिक देत आहेत. हे तर आपणांस माहीतच आहे. तसेच अडगळीत पडू पाहत आहेत. व्याघ्र प्रकल्पच सहीसलामत मार्गी लागावा म्हणूनही जनतेने कंबर कसलेली आहे.

येथे दिवसेंदिवस वाढत चाललेली जमीन हडप प्रकरण, पंचायत व नगरपालिका क्षेत्रामध्ये वाढत असलेली बेकायदा बांधकामे, राजधानी पणजी शहरात ‘स्मार्ट सिटी’च्या नावाखाली केलेला सावळा गोंधळ, दिवसेंदिवस फोफावत चाललेला अमली पदार्थांचा पसारा, कचऱ्याला कचऱ्याची वाट दाखवण्याऐवजी अधांतरी असलेला वायंगिणी आणि सोनसोडो कचरा प्रकल्प, भोम महामार्ग रुंदीकरणाचा प्रश्‍न, उत्तर

आणि दक्षिण गोव्यातील किनारी भागात अनिर्बंधपणे रात्रीबेरात्रीचे ध्वनिप्रदूषण, रंगीत पार्ट्यात रममाण होऊन ‘खाओ पिओ, मजा करो’मुळे चाललेला धांगडधिंगा, गोव्याची आतित्थ्यशीलता व संस्कृती आणि गोव्याचे गोंयकारपण यास छेद देणारे अनिष्ट अश्‍लाघ्य अवर्णनीय व्यवहार, वाढते अत्याचार व बलात्कार, वाढत्या घरफोड्या आणि वाढती गँगवॉर प्रकरणे; किती उदाहरणे द्यावीत? ही सर्व प्रकरणे, ‘वाढता वाढता वाढे’ अशी असून सोबतीला महागाईनेही सर्वसामान्य जनतेचे जिणे मुश्किल करून सोडले आहे.

देशातील तापमानातील बदलांमुळे जसा देशभरातील लोकांना ताप व मनस्ताप सहन करावा लागत आहे, तसाच देशभराबरोबरच गोव्यातही या सर्व समस्यांच्या कारणांमुळे ताप, मनस्ताप व पश्‍चात्तापाला तोंड द्यावे लागत आहे.

Coal handling
Goa Liberation Day: नेहरूंनी दिलेला 'तो' एक आदेश अन् गोवा झाला मुक्त; वाचा 36 तासांच्या धडाकेबाज मोहिमेचा थरार

अर्थात, सरकार यासाठी काहीच करत नाही, असे समजायचे कारण नाही. सरकार ‘भिवपाची गरज ना’ असा दिलासा देत आपल्यापरीने प्रयत्न करीत आहे. पण शासन सरळ व सुरळीत चालण्यासाठी जनतेच्या प्राथमिक गरजा भागण्यासाठी जे प्रयत्न व्हायला पाहिजेत ते होत नाहीत. म्हणूनच जनता चिंताक्रांत आहे.

अर्थात वर महत्त्वाच्या समस्यांचाच धावता आढावा प्रत्येकाच्या चिंतनासाठी व गोव्याच्या भल्यासाठी घेतलेला आहे. आपली गोमंतभूमी देवभूमी म्हणून मानली गेली आहे. वर उल्लेखीत सर्व समस्यांमुळे ती भोगभूमी ठरण्याच्या मार्गावर आहे, म्हणून हे मुक्तचिंतन.

Coal handling
Goa Liberation Day 2025: स्वातंत्र्यसैनिकांनी लढून मुक्त केलेला गोवा आपण कसा राखला पाहिजे, याची किमान जाणीव व्हावी....

शेवटी विकास हा सगळ्यांनाच हवा असतो. यात मुळीच दुमत होणार नाही. विकास हा हवाच पण तो विध्वंसक नसावा. विकास लोकाभिमुख व्हावा, लोकांच्या अडीअडचणी, समस्यांना छेद देणारा हवा. हे सूत्र सत्ताधाऱ्यांनी मग ते कुठल्याही राजकीय पक्षाचे का असेनात, त्यांनी या सूत्राचा पाठपुरावा केला तर लोक सत्ताधारी पक्षाला सत्ताधाऱ्यांना दुवा देतील. तसे काम त्यांच्या हातून घडो, अशी अपेक्षा!

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Goa News in Marathi - Dainik Gomantak
dainikgomantak.esakal.com