

चालुक्य राजवटीच्या दक्षिण भारतातील सहाशे वर्षांच्या कालावधीत आजच्या दख्खन भारताला घडवण्यात मोठी भूमिका बजावली आहे. बदामीच्या चालुक्यांनी त्यांच्या जवळजवळ सहाशे वर्षांच्या काळात संपूर्ण कर्नाटक, महाराष्ट्र, उत्तर व दक्षिणेकडील कोकण आणि संयुक्त आंध्र प्रदेशावर राज्य केले. चालुक्य राजवंशाची स्थापना पुलिकेशी प्रथमने केली आणि त्याची राजधानी वातापी किंवा सध्याच्या बदामी येथे होती. त्यांना सुरुवातीचे चालुक्य म्हणून ओळखले जात असे. आज दिसणारे बदामी शहर हे चालुक्य राजवंशाची राजधानी वातापी म्हणून प्रसिद्ध शहर होते. चालुक्य राजवंशातील राजा पुलिकेशी(प्रथम)नंतर त्याचा मुलगा कीर्तिवर्मन गादीवर आला, ज्याचे अकाली निधन झाले तेव्हा त्याचा भाऊ सर्व राज्य कारभार पाहत होता.
कीर्तिवर्मनची मुले खूप लहान असल्याने त्याचा भाऊ मंगलेश याने गादी सांभाळली. मंगलेश एक सक्षम शासक होता आणि त्याने साम्राज्याची उभारणी केली. तथापि, राजकुमार पुलिकेशी (द्वितीय)ला वाटले की त्याचा काका स्वतःसाठी सिंहासन बळकावण्याचा प्रयत्न करीत आहे. पुलिकेशी (द्वितीय)ला मांगलेशाने हद्दपार केले.
पुलिकेशी दुसरा शेजारच्या राजांच्या मदतीने निर्वासनातून परतला, त्याने राज्य ताब्यात घेण्यासाठी त्याच्या काकांचा पराभव केला आणि त्याला ठार मारले. नवीन राजाला अनेक लहान लहान योद्ध्यांनी व राज्यांनी आव्हान दिले. मंगलेशाच्या अधीन असलेल्या शेजारच्या लहान राजांनी स्वतःला स्वतंत्र घोषित केले होते. सर्वत्र बंडाची वाट पाहत होते. पुलिकेशी (द्वितीय)ने शत्रूंचा पराभव केला, बंड शमावले आणि स्वतःला एक सक्षम राजा व सेनापती म्हणून स्थापित केले. केवळ लढणाऱ्या लहान राजांनाच परत सत्तेखाली आणण्यात आले असं नाही, तर इतर अनेकांनी नम्रपणे लढाई न करता शरण जाणे पत्करले.
त्या काळात, समकालीन राज्ये म्हणजे देशाच्या उत्तरेकडील भागात वर्धन राजवंशातील हर्षवर्धन यांचे राज्य होते आणि दक्षिणेत पल्लवांनी स्वत:ला स्थापित केले होते. राजा हर्षाचा जीवन इतिहास त्याच्या दरबारातील कवी बाणभट्ट यांनी ’हर्षचरित’ या नावाने लिहिला आहे. राजा हर्षाने चालुक्यांवर हल्ला केला आणि त्यांना अपमानास्पद पराभवाला सामोरे जावे लागले.
पुलिकेशी (द्वितीय)चा हा देशाच्या उत्तरेकडील राजा हर्षाविरुद्धचा सर्वात मोठा विजय होता, जरी ’हर्षचरित’मध्ये पुलिकेशी (द्वितीय)च्या हातून हर्षाचा पराभव झाल्याचा सोयीस्कर उल्लेख केलेला नाही, परंतु इतर विविध स्रोतांद्वारे याची पुष्टी केलेली सापडते. हे युद्ध ६३०च्या सुमारास झाले असावे. विजापूर जिल्ह्यातील ऐहोळे येथील जैन देवालयातील ६३४-३५ च्या शिलालेखात रविकीर्तिकवीने पुलकेशीच्या दिग्विजयाचे सुंदर वर्णन केले आहे.
दिव्यचरितम या ऐतिहासिक पुस्तकानुसार आपले राज्य वाढवण्याच्या महत्त्वाकांक्षी असलेल्या पुलिकेशी (द्वितीय)ने दक्षिणेस पल्लवांवर हल्ला केला ज्यात अनेक अनिर्णीत लढाया झाल्या. महेंद्रवर्मा पल्लव सुरुवातीला एक जैन राजा होते. त्या काळात धार्मिक छळ झाल्याचे अनेक साहित्यिक पुरावे महेंद्रवर्मन यांनाच जबाबदार धरताना दिसतात. ’दिव्यचरितम’ या ऐतिहासिक पुस्तकानुसार, व्यापक धार्मिक छळामुळे विष्णू भक्त ’थिरुमालिसाई अलवार’ यांच्यासह अनेक संतांनी कांचीपुरम सोडण्याचा निर्णय घेतल्याचे उल्लेख आहे.
शैव संत, थिरुणावुक्करसर यांना मारण्याच्या उद्देशाने अनेक यातना देण्यात आल्या, जसे की सात दिवस चुनखडी बनवलेल्या खोलीत बंद करून ठेवणे, त्यांना विष देणे, वेड्या हत्तीखाली टाकणे आणि दगड बांधून समुद्रात फेकणे. थिरुणावुक्करसर प्रत्येक वेळी चमत्कारिकपणे वाचला.
या चमत्कारांमुळेच अखेर नरसिंहवर्मन यांना थिरुणावुक्करसरच्या देवत्वाची खात्री पटली. या घटना थिरुणावुक्करसर यांनी त्यांच्या पुस्तकानुसार ’देवराम’ महाकाव्यात टिपल्या आहेत. बौद्धांचे आणखी एक महान वारसा स्थळ, अजिंठा लेणीदेखील चालुक्यांनीच बांधली होती. चिनी बौद्ध भिक्षू झुआनझांग, ज्याला ह्युएन-त्सांग म्हणूनही ओळखले जाते, त्यांनी सुमारे १७ वर्षे भारतात प्रवास केला.
त्यांनी पल्लव आणि चालुक्य दोघांनाही भेट दिली होती. झुआनझांग यांनी सांगितले की पल्लव राजधानी असलेल्या कांचीपुरममध्ये १००हून अधिक बौद्ध मठ आणि ८० मंदिरे होती. त्यांनी कांचीपुरमचे वर्णन एक वैभवशाली शहर म्हणून केले आणि या प्रदेशातील पल्लवांच्या सौम्य राजवटीचे कौतुक केले. कांचीपुरमनंतर हुआनझांग पुलिकेशी (द्वितीय)च्या दरबारात गेला.
पुलिकेशीने त्याचे प्रांत तीन महाराष्ट्रकांत विभागले होते. या तीन महाराष्ट्रकामध्ये सध्याचे महाराष्ट्र, कर्नाटक आणि किनारी कोकण यांचा समावेश होता. महाराष्ट्राचे आधुनिक नावही याच नावावरून आले असावे अशी शक्यता अनेक विद्वानांनी वर्तवलेली आहे. हुआनझांग राजाच्या व्यवस्थेने प्रभावित झाले आणि त्यांनी राजाच्या प्रशासकीय क्षमतेचे कौतुक केले आणि सक्षम प्रशासनाचे फायदे नागरिकांना दूरवर जाणवत असल्याचे गौरवले. बदामीच्या चालुक्यांनी त्यांच्या जवळजवळ सहाशे वर्षांच्या काळात कर्नाटक, महाराष्ट्र, उत्तर व दक्षिणेकडील कोकण आणि संयुक्त आंध्र प्रदेशावर सक्षम प्रशासनाने राज्य केलेल्याचा हा पुरावाच होता.
- सर्वेश बोरकर
दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.