Diwali Fire Accident: दिवाळीचा आनंद शोकात बदलला! मध्य प्रदेश ते महाराष्ट्र, आसामपर्यंत आगीच्या दुर्घटनांमध्ये 30 हून अधिक बळी; अनेक कुटुंबांवर दुःखाचा डोंगर

Diwali fire accident in India: देशभरात दिवाळीचा सण मोठ्या उत्साहात आणि जल्लोषात साजरा करण्यात आला. घराघरांत दिव्यांची रोषणाई, फटाक्यांची आतषबाजी आणि आनंदाचे वातावरण होते.
Diwali Fire Accident
Diwali Fire AccidentDainik Gomantak
Published on: 
Updated on: 

देशभरात दिवाळीचा सण मोठ्या उत्साहात आणि जल्लोषात साजरा करण्यात आला. घराघरांत दिव्यांची रोषणाई, फटाक्यांची आतषबाजी आणि आनंदाचे वातावरण होते. मात्र, याच आनंदाच्या सणाला देशातील अनेक कुटुंबांसाठी दुःखद वळण मिळाले. देशाच्या विविध भागांत आगीच्या भीषण घटना आणि फटाक्यांमुळे झालेल्या अपघातांनी अनेकांचे प्राण घेतले. मध्य प्रदेश, महाराष्ट्र, आसाम, ओडिशा, राजस्थान, दिल्ली आणि इतर राज्यांमध्ये घडलेल्या दुर्घटनांमुळे ३० हून अधिक जणांचा मृत्यू झाल्याची माहिती समोर आली आहे. काही ठिकाणी संपूर्ण कुटुंबच आगीच्या भक्ष्यस्थानी पडल्याने परिसरात हळहळ व्यक्त केली जात आहे.

मध्य प्रदेशात दोन भीषण अग्निकांड; ११ जणांचा मृत्यू

मध्य प्रदेशातील कटनी जिल्ह्यातील बरही येथे दिवाळीच्या रात्री मोठी दुर्घटना घडली. मध्यरात्री सुमारास पूरण अग्रवाल यांच्या क्रॉकरी दुकानाला अचानक आग लागली. दुकानाला लागूनच असलेल्या तीन मजली इमारतीत त्यांचे कुटुंब वास्तव्यास होते. काही क्षणांत आगीने संपूर्ण इमारतीला वेढा घातला. त्यामुळे घरातील सदस्यांना बाहेर पडण्याची संधीही मिळाली नाही.

या दुर्घटनेत ७७ वर्षीय पूरण अग्रवाल, त्यांची पत्नी चंद्रकला, सून पूनम, १४ वर्षीय आर्या, ६ वर्षीय अन्वी आणि अवघ्या दोन महिन्यांच्या बाळाचा मृत्यू झाला. घटनेची माहिती मिळताच अग्निशमन दल आणि प्रशासनाने बचावकार्य सुरू केले. पहाटे साडेचारच्या सुमारास पूरण अग्रवाल यांना बाहेर काढण्यात आले. त्यानंतर जेसीबीच्या साहाय्याने इमारतीची भिंत तोडून कुटुंबातील इतर सदस्यांना बाहेर काढण्यात आले.

Diwali Fire Accident
Indian Super League: 'आयएसएल' पंचगिरीबाबत FC Goa नाराज, अखिल भारतीय फुटबॉल महासंघाकडे लेखी तक्रार; तीव्र चिंता व्यक्त

दरम्यान, सिवनी जिल्ह्यातील छपारा येथील जैन मोहल्ल्यातही पहाटेच्या सुमारास एका घराला आग लागली. सराफा व्यावसायिक कुंदन सोनी यांच्या घरात घडलेल्या या दुर्घटनेत सहा जणांना बाहेर काढण्यात आले. मात्र, त्यापैकी पाच जणांचा मृत्यू झाला. या दोन्ही घटनांमुळे मध्य प्रदेशात शोककळा पसरली.

महाराष्ट्रात धाराशिवमध्ये एकाच कुटुंबातील सहा जणांचा मृत्यू

महाराष्ट्रातील धाराशिव जिल्ह्यातील येडशी गावातही दिवाळीच्या रात्री हृदयद्रावक घटना घडली. एका किराणा दुकानाला आणि त्यावरील घराला अचानक भीषण आग लागली. आगीमुळे परिसरात धुराचे मोठे लोट पसरले. घरात अडकलेल्या सदस्यांना बाहेर पडता आले नाही. विषारी धुरामुळे गुदमरून आणि भाजल्यामुळे एकाच कुटुंबातील सहा जणांचा मृत्यू झाला. दिवाळीच्या आनंदाच्या क्षणी संपूर्ण कुटुंब उद्ध्वस्त झाल्याने गावात हळहळ व्यक्त होत आहे.

मुंबईतील अंधेरी पश्चिम येथील लोखंडवाला परिसरातील एका उंच इमारतीतही आगीची घटना घडली. या दुर्घटनेत एका व्यक्तीचा मृत्यू झाला. दुसरीकडे, पुण्यात दिवाळीच्या काळात आगीच्या तब्बल ६३ घटनांची नोंद करण्यात आली. या घटनांमुळे शहरातील अग्निशमन यंत्रणाही सतर्क झाली होती.

आसाममधील ऑइल इंडिया प्रकल्पात चौघांचा होरपळून मृत्यू

आसाममधील डिब्रूगड येथे ऑइल इंडिया (OIL) कंपनीच्या औद्योगिक प्रकल्पात आग लागण्याची गंभीर घटना घडली. या आगीत चार कर्मचाऱ्यांचा होरपळून मृत्यू झाला. औद्योगिक प्रकल्पात घडलेल्या या दुर्घटनेमुळे कामगारांच्या सुरक्षेचा आणि अग्निसुरक्षा व्यवस्थेचा प्रश्न पुन्हा चर्चेत आला आहे. दिवाळीच्या काळात घडलेल्या या घटनेने संबंधित परिसरात शोक व्यक्त केला जात आहे.

Diwali Fire Accident
Goa POCSO Court: अल्पवयीन मुलीवर लैंगिक अत्याचार प्रकरण; बसचालकाला 13 वर्षे सक्तमजुरी, पोक्सो न्यायालयाचा निकाल

राजस्थान आणि दिल्लीत फटाक्यांमुळे जीवघेणे अपघात

दिवाळीच्या काळात फटाक्यांच्या आतषबाजीमुळेही काही ठिकाणी गंभीर दुर्घटना घडल्या. राजस्थानमधील पाली जिल्ह्यातील फलना येथे फटाक्यांच्या दुकानावर ठिणगी पडल्याने आग लागली. या आगीत दोन जणांचा मृत्यू झाला. दिल्लीतील नरेला परिसरात फटाक्याचा रॉकेट थेट दहा वर्षांच्या मुलाच्या अंगावर आदळला. या अपघातात गंभीर जखमी झालेल्या मुलाचा मृत्यू झाला. तमिळनाडूमध्येही फटाक्यांच्या आतषबाजीदरम्यान झालेल्या दुर्घटनेत एका बालकाला जीव गमवावा लागला.

ओडिशात एकाच कुटुंबातील चार जणांचा मृत्यू

ओडिशातील जाजपूर जिल्ह्यातील नालीपूर गावात शनिवारी रात्री घराला आग लागल्याची घटना घडली. या आगीत एकाच कुटुंबातील चार जणांचा मृत्यू झाला. मृतांमध्ये ४२ वर्षीय तबस्सुम, त्यांची २७ वर्षीय मुलगी गुलअफ्सा आणि १० व ८ वर्षांच्या दोन मुलांचा समावेश आहे. घराला आग लागल्यानंतर कुटुंबातील सदस्यांना बाहेर पडता न आल्याने ही दुर्घटना घडली.

उज्जैनमध्ये १०७ वर्षीय वृद्धाचा दुर्दैवी मृत्यू

मध्य प्रदेशातील उज्जैन शहरातील नागझिरी परिसरातही दिवाळीच्या रात्री दोन मजली इमारतीच्या खालच्या मजल्यावरील दुकानांना आग लागली. या इमारतीच्या वरच्या मजल्यावर एकाच कुटुंबातील दहा सदस्य अडकले होते. स्थानिक नागरिक, पोलीस आणि महापालिकेच्या पथकाने तातडीने बचावकार्य सुरू करून सर्वांना सुरक्षित बाहेर काढले. मात्र, या गोंधळात १०७ वर्षीय वृद्धाचा मृत्यू झाला.

सणासुदीच्या काळात अग्निसुरक्षेचा प्रश्न ऐरणीवर

दिवाळी हा आनंद, उत्साह आणि प्रकाशाचा सण मानला जातो. मात्र, देशभरात घडलेल्या या दुर्घटनांनी सणासुदीच्या काळातील सुरक्षिततेचा प्रश्न पुन्हा एकदा ऐरणीवर आणला आहे. घरांमध्ये तसेच दुकानांमध्ये विद्युत उपकरणे, दिवे आणि फटाक्यांचा वापर करताना आवश्यक खबरदारी घेणे किती महत्त्वाचे आहे, हे या घटनांमधून अधोरेखित झाले आहे. काही क्षणांच्या निष्काळजीपणामुळे अनेक कुटुंबांचे आयुष्य कायमचे बदलले आहे.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.