

पणजी: इंडियन सुपर लीग (आयएसएल) फुटबॉल स्पर्धेत यंदा पंचगिरीचा दर्जा घसरल्याबद्दल एफसी गोवा संघाने तीव्र चिंता व्यक्त केली आहे. याबाबतीत त्यांनी शनिवारी जाहीर नाराजी व्यक्त केली.
यासंदर्भात एफसी गोवा संघाने अखिल भारतीय फुटबॉल महासंघाच्या (एआयएफएफ) रेफरी विभाग, महासंघाचे सचिवालय आणि लीग आयोजकांकडे अधिकृत पत्राद्वारे तक्रार नोंदविली आहे. मोसमात आतापर्यंत विविध सामन्यांमध्ये पंचांकडून झालेल्या चुका, निर्णयांमधील विसंगती आणि नव्या पंचांना मिळणारे मार्गदर्शन व तयारीचा अभाव याकडे एफसी गोवाने लक्ष वेधले आहे.
या पत्रातून एफसी गोवाने पंचांच्या चुकांबाबत अधिक पारदर्शकता आणि उत्तरदायित्व निश्चित करण्याची मागणी केली आहे. पंचांची नियुक्ती कोणत्या निकषांवर केली जाते आणि त्यांच्या कामगिरीचे मूल्यमापन कसे होते, याबाबत स्पष्टता असावी, असे एफसी गोवाचे म्हणणे आहे.
तसेच क्लब आणि एआयएफएफच्या रेफरी विभागादरम्यान नियमित संवादाची व्यवस्था पुन्हा सुरू करावी आणि लीगमध्ये नव्याने दाखल झालेल्या पंचांसाठी अधिक प्रभावी मार्गदर्शन व प्रशिक्षणाची व्यवस्था करावी, अशा मागण्याही करण्यात आल्या आहेत.
सुधारात्मक पावले उचलण्याची मागणी
पंचगिरीच्या दर्जाचा प्रश्न केवळ एफसी गोवापुरता मर्यादित नसून त्याचा परिणाम प्रत्येक क्लब, खेळाडू आणि चाहत्यांवर होत असल्याचे एफसी गोवाने नमूद केले आहे. ‘एआयएफएफ’ने या तक्रारींची गांभीर्याने दखल घेऊन आवश्यक सुधारात्मक पावले उचलावीत, असे आवाहन त्यांनी पत्रात केले आहे. भारतीय फुटबॉलचा दर्जा उंचावण्यासाठी महासंघ, लीग आयोजक आणि अन्य संबंधित घटकांसोबत सहकार्य करण्याची आपली तयारी असल्याचेही एफसी गोवाने स्पष्ट केले आहे.
‘गोवा-बंगळूर’ लढतीच्या पार्श्वभूमीवर पत्र
फातोर्डा येथील पंडित जवाहरलाल नेहरू स्टेडियमवर शुक्रवारी रात्री झालेल्या आयएसएल सामन्यात भरपाई वेळेतील तिसऱ्या मिनिटास नोंदविलेल्या गोलमुळे बंगळूर एफसीने एफसी गोवाला २-१ असे निसटते हरविले. सामन्यात निर्णायक ठरलेल्या गोलबाबत एफसी गोवा संघाने आक्षेप घेतला. कर्णधार संदेश झिंगन याने हात जोडून संघाचे म्हणणे रेफरींना पटवून देण्याचा प्रयत्न केला; पण गोल कायम राहिला आणि निकाल काही बदलला नाही. भरपाई वेळेत थ्रो-ईन एफसी गोवासाठी होते; पण ते बंगळूर एफसीला मिळाले, त्यामुळे झालेला गोल अवैध आहे असा एफसी गोवाचा दावा होता. या पार्श्वभूमीवर एफसी गोवाने शनिवारी पत्र लिहिले आहे. प्रतीक मोंडल हे त्या सामन्याचे रेफरी होते.
दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.