Gujarat Assembly Election 2022: गुजरात विधानसभा निवडणुकीसाठी आम आदमी पक्षाने मुख्यमंत्रीपदाचा चेहरा जाहीर करण्याचे ठरवले आहे. शनिवारी झालेल्या पत्रकार परिषदेत दिल्लीचे मुख्यमंत्री आणि 'आप'चे राष्ट्रीय संयोजक अरविंद केजरीवाल यांनी गुजरातवासीयांनाच 'आप'चा मुख्यमंत्रीपदाचा चेहरा ठरविण्यासाठी पर्याय नोंदविण्याचे आवाहन केले.
गुजरातचा मुख्यमंत्री कोण झाले पाहिजे? असा सवाल करत केजरीवाल यांनी यासाठी एक मोहिम सुरू केली आहे. त्यांनी एक नंबर आणि ईमेल आयडी जारी केला आहे. त्यावर लोकांना मुख्यमंत्रीपदासाठीचा आपल्या आवडत्या पर्यायाची नोंद करता येईल.
केजरीवाल म्हणाले, मुख्यमंत्री कुणाला करायचे हे भाजपने जनतेला विचारलेच नाही. पण आम्ही जनतेला विचारूनच हा निर्णय घेऊ. आम्ही लोकांकडून नावांचे पर्याय मागवत आहोत. 4 नोव्हेंबर रोजी आम्ही गुजरातच्या लोकांनी घेतलेला निर्णय जाहीर करू. विजय रूपाणींमध्ये काही गडबड होती का? भाजपने त्यांना हटवून भुपेंद्र पटेल यांना मुख्यमंत्री का केले?
रूपाणींना मुख्यमंत्री केले तेव्हाही निर्णय दिल्लीतून झाला होता. लोकशाहीत जनतेने निर्णय घ्यायचा असतो. पंजाबमध्ये आम्ही हेच केले. आणि भगवंत मान मुख्यमंत्री झाले. आमचा मुख्यमंत्रीपदाचा उमेदवारच गुजरातचा पुढचा मुख्यमंत्री असेल.
या नेत्यांची मुख्यमंत्रीपदाच्या चेहऱ्याासाठी चर्चा
'आप'कडून मुख्यमंत्रीपदाच्या चेहऱ्यासाठी इसुदान गढवी, गोपाल इटालिया यांच्या नावांना पसंती मिळण्याची चर्चा आहे. गढवी हे गुजरातमधील वृत्त वाहिनीचे अँकर आहेत. ते राज्यात परिवर्तन यात्रेत सहभागी झाले आहेत. तर गोपाल इटालिया हे आपचे प्रदेशाध्यक्ष आहेत. याशिवाय काँग्रेसमधून आपमध्ये आलेले इंद्रनील राजगुरू यांचे नावही चर्चेत आहे.
दरम्यान, 182 जागा असलेल्या गुजरात विधानसभेच्या निवडणुकीच्या तारखा 1 नोव्हेंबर रोजी जाहीर होण्याची शक्यता आहे. एकाच किंवा दोन टप्प्यांमध्ये ही निवडणूक प्रक्रिया पार पडू शकते.
दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा
Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.