

Bengaluru Cash Van Robbery: कर्नाटकची राजधानी बंगळूरु येथे कॅश व्हॅन लुटल्याची एक मोठी आणि धक्कादायक घटना समोर आली आहे. या घटनेत आरोपींनी तब्बल 7 कोटी 11 लाखांची रोकड लंपास केली. विशेष म्हणजे, या संपूर्ण कटात आरोपींनी स्वतःला 'रिझर्व्ह बँक ऑफ इंडिया' (RBI) चे अधिकारी असल्याचे सांगून ही लूट केली, अशी माहिती सिद्धापुरा पोलीस स्टेशनमध्ये दाखल झालेल्या तक्रारीतून समोर आली.
सीएमएस इनो सिस्टम लिमिटेड या एचबीआर लेआउटमधील कंपनीचे शाखा व्यवस्थापक विनोद चंद्रार (वय 47) यांनी सिद्धापुरा पोलीस स्टेशनमध्ये या घटनेची तक्रार दाखल केली. कंपनी दररोज जेपी नगर येथील एचडीएफसी बँक (HDFC Bank) करन्सी चेस्टमधून पैसे काढून बंगळूरुमधील विविध एचडीएफसी बँकेच्या एटीएममध्ये जमा करण्यासाठी आपल्या वाहनातून घेऊन जाते.
घटनेच्या दिवशी, सुमारे सकाळी 9:30 वाजता कस्टोडियन अफताब यांच्या देखरेखीखाली, कंपनीची टाटा योद्धा (Tata Yodha - GJ-01-HT-9173) ही कॅश व्हॅन चालक बिनोद कुमार आणि दोन बंदूकधारी राजन्ना आणि तम्मैया यांच्यासह बँकेकडे निघाली. दुपारी 12:24 वाजता त्यांनी जेपी नगर एचडीएफसी करन्सी चेस्टमधून 7,11,00,000 काढले. ही रक्कम बॉक्समध्ये भरुन टाटा योद्धा गाडीत लोड करण्यात आली.
जेव्हा तक्रारदार विनोद चंद्रार आणि सीएमएसचे एफआयटी व्यवस्थापक फारुक पाशा हे त्यांच्या ब्रांचमध्ये होते, तेव्हा चालक बिनोद कुमारने फारुक पाशा यांना फोन केला. त्याने सांगितले की, जयनगर अशोक पिलरवरुन लालबाग सिद्धापुरा गेटकडे जात असताना, एका इनोव्हा कारने (KA-03-NC-8052) त्यांच्या कॅश व्हॅनला अडवले. त्या इनोव्हामधून सुमारे पाच ते सहा लोक खाली उतरले. त्यांनी स्वतःला आरबीआय अधिकारी असल्याचे भासवले आणि कॅश व्हॅनमधील कर्मचाऱ्यांना गाडीतून बाहेर पडण्यास सांगितले.
आरोपींनी कस्टोडियन अफताब आणि दोन्ही बंदूकधारी राजन्ना व तम्मैया यांना त्यांच्या इनोव्हामध्ये बसवले आणि ड्रायव्हर बिनोद कुमारला रोकड भरलेली गाडी एकट्याने चालवण्यास सांगितले. कॅश व्हॅनमधील तिन्ही कर्मचाऱ्यांना नेमके कुठे घेऊन गेले, याची माहिती ड्रायव्हरला नव्हती. यानंतर, पिस्तूल दाखवून आरोपींनी ड्रायव्हरला धमकावले. डेअरी सर्कल फ्लायओव्हरजवळ गाडी थांबवून आरोपींनी संपूर्ण 7.11 कोटींची रोकड लुटली आणि घटनास्थळावरुन पळून गेले.
तक्रारदाराने तातडीने गाडीचे जीपीआरएस तपासले आणि गाडी होसूर रोड, डेअरी सर्कलजवळ असल्याची खात्री केली. त्यांनी पोलिसांना (कंट्रोल रुम 122) घटनेची माहिती दिली. कंपनीच्या तंत्रज्ञांनी तपासले असता, लुटारुंनी गाडीतील डीव्हीआर म्हणजेच सीसीटीव्ही रेकॉर्डिंग डिव्हाइस देखील चोरुन नेल्याचे निष्पन्न झाले.
या हाय-प्रोफाइल लुटीचा तपास करण्यासाठी पोलिसांनी एकूण 5 विशेष टीम (Special Teams) तयार केल्या आहेत. सीसीटीव्ही फुटेजच्या आधारे डकैतीत वापरलेल्या इनोव्हा गाडीच्या हालचालींबद्दल काही महत्त्वाचे सुगावे पोलिसांना मिळाले आहेत. पोलीस आयुक्त सीमान्त कुमार सिंह यांनी स्वतः रात्री उशिरापर्यंत सिद्धापुरा पोलीस स्टेशनमध्ये थांबून या प्रकरणाच्या तपासावर लक्ष ठेवले आहे. पोलिसांना (Police) शंका आहे की, सीएमएस कंपनीतील काही लोक या गुन्ह्यात सामील असू शकतात. घटनेच्या वेळी कॅश व्हॅनमध्ये उपस्थित असलेले ड्रायव्हर, कस्टोडियन आणि दोन्ही बंदूकधारी अशा तिघांचीही कसून चौकशी केली जात आहे.
शेवटची इनोव्हा गाडी अवलहल्ली परिसरात दिसली असून, तिथून तमिळनाडू आणि आंध्र प्रदेशकडे जाणारे दोन मार्ग आहेत. पोलीस पथके या दोन्ही राज्यांमध्ये आरोपींचा मागोवा घेण्यासाठी पाठवण्यात आली आहेत.
दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.