
बंगळूरु: इंडियन प्रीमियर लीग २०२५ चे विजेतेपद रॉयल चॅलेंजर्स बंगळूरुने पटकावले असले तरी, या ऐतिहासिक विजयाचा जल्लोष बंगळूरुसाठी एका मोठ्या दुर्घटनेत बदलला आहे. बुधवारी (४ जून) रात्री आरसीबीच्या विजयाच्या सेलिब्रेशनदरम्यान एम. चिन्नास्वामी स्टेडियमबाहेर झालेल्या चेंगराचेंगरीत ११ जणांचा बळी गेला असून, ३३ जण जखमी झाले आहेत. या हृदयद्रावक घटनेमुळे आरसीबीचा १८ वर्षांच्या प्रतीक्षेनंतर मिळालेला पहिला आयपीएल मुकुटही काळा डाग लागल्यासारखा झाला आहे.
संघाच्या आगमनाच्या अपेक्षेने बंगळूरुभर झालेल्या सार्वजनिक मेळाव्यांबाबत प्रसारमाध्यमांच्या अहवालातून समोर आलेल्या दुर्दैवी घटनांनी आम्हाला खूप दुःख झाले आहे. प्रत्येकाची सुरक्षा आमच्यासाठी अत्यंत महत्त्वाचे आहे." आरसीबीने या दुःखद घटनेतील मृतांबद्दल शोक व्यक्त केला असून, बाधित कुटुंबांप्रती संवेदना व्यक्त केल्या आहेत.
परिस्थितीची माहिती मिळताच, आरसीबीने आपला कार्यक्रम तात्काळ बदलला आणि स्थानिक प्रशासनाच्या सूचना व सल्ल्याचे पालन केले. "आम्ही आमच्या सर्व समर्थकांना सुरक्षित राहण्याचे आवाहन करतो," असेही संघाने निवेदनात म्हटले आहे.
स्टेडियमच्या आत जल्लोष सुरू असतानाच बाहेर ही दुर्घटना घडली. संघाला आणि चाहत्यांना बाहेर काय घडले याची कल्पना नव्हती. स्टेडियममध्ये केवळ कर्णधार रजत पाटीदार आणि विराट कोहली यांनी संवाद साधला आणि ट्रॉफी भरलेल्या गर्दीला दाखवली. या घटनेची माहिती मिळताच आरसीबीचा स्टार खेळाडू विराट कोहली आणि फ्रँचायझीने तीव्र दुःख व्यक्त केले.
"शब्दातीत. पूर्णपणे उद्ध्वस्त झालो आहे," असे विराट कोहलीने इंस्टाग्रामवर आरसीबीचे अधिकृत निवेदन शेअर करत लिहिले. कोहलीची पत्नी आणि बॉलिवूड अभिनेत्री अनुष्का शर्मानेही आरसीबीचे अधिकृत निवेदन शेअर करत आपले दुःख व्यक्त केले.
आरसीबीचा माजी खेळाडू एबी डेव्हिलियर्सनेही सोशल मीडियावर दुःख व्यक्त केले. "आज चिन्नास्वामी स्टेडियममध्ये घडलेल्या दुःखद घटनांमुळे बाधित झालेल्या सर्वांसोबत माझ्या प्रार्थना आहेत." असे तो म्हणालाय.
मोठ्या संख्येने चाहते स्टेडियमबाहेर जमा झाले होते आणि नियंत्रणाच्या अभावामुळे ही दुःखद घटना घडली, ज्यामुळे आरसीबीच्या चाहत्यांसाठी एक आनंदाचा प्रसंग शोकांतिकेत बदलला. या घटनेने १८ वर्षांच्या प्रतीक्षेनंतर मिळालेल्या आयपीएल विजेतेपदाच्या आनंदावर विरजण पडले आहे.
दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.