सुशीला सावंत मेंडीस
Chhatrapati Sambhaji Maharaj : शिवाजी महाराजांच्या मृत्यूनंतर मराठा आणि पोर्तुगीज यांच्यात सुमारे दोन वर्षे शांतता होती. त्यांचे उत्तराधिकारी म्हणून संभाजी महाराज व राजाराम महाराज यांच्यात समस्या होत्या. या कौटुंबिक समस्या सोडवण्यासाठी थोडा वेळ मिळावा म्हणून संभाजी महाराजांनी शांततेच्या वाटाघाटी करण्यासाठी एक दूत गोव्यात पाठवला.
ही चर्चा सुरू असतानाच काही मराठा सैनिक बार्देशमधील शिवोलीत घुसले आणि तेथे आश्रय घेतलेल्या डिचोलीमच्या तीन लोकांना घेऊन गेले. त्यानंतर डिचोलीच्या सुभेदाराने गोव्यातील हिरे व्यापाऱ्यांना अटक केली. त्यानंतर गोव्याच्या व्हाइसरॉयने मराठ्यांशी सर्व व्यापार बंद केला.
असे असूनही शांततेच्या वाटाघाटी सुरूच राहिल्या. एवढेच नव्हे तर ज्या सुभेदाराविरुद्ध तक्रारी होत्या, त्याला पोर्तुगीजांनी काढूनही टाकले.
कोणताही तह नसल्यामुळे, १६८२च्या प्रारंभी संभाजी महाराजांनी अंजदिव बेट ताब्यात घेण्याची योजना आखली. पोर्तुगीजांनी या बेटाचे रक्षण करण्यासाठी ताबडतोब पावले उचलली. हे बेट त्यांच्या अधिकारक्षेत्रात फार पूर्वीपासून होते आणि त्यांना ते सोडायचे नव्हते. त्याच वर्षी ऑगस्टमध्ये पोर्तुगिजांना कळले की मुघल संभाजी महाराजांवर हल्ला करण्याचा विचार करत आहेत.
त्यामुळे त्यांना मदत करण्यासाठी, ‘मुघलांना त्यांच्या प्रदेशातून जाण्याचा अधिकार देण्यात यावा’, अशी सूचना गोव्याच्या व्हाइसरॉयने चौल, वसई आणि दमणच्या आपल्या कॅप्टनना केली. उत्तरेकडील पोर्तुगीज प्रांतातील एका गावावर संभाजी महाराजांनी हल्ला केला.
मराठा सैनिकांनी गाव लुटले आणि जाळले. पोर्तुगीज जहाजे ताब्यात घेतली आणि काही पाद्रींना अटक केली. त्याला प्रत्युत्तर म्हणून पोर्तुगिजांनी संभाजी महाराजांच्या गोव्यातील राजदूताला अटक केली आणि त्यांची जहाजे ताब्यात घेतली.
दोघांमध्ये शत्रुत्व निर्माण करणारी दुसरी घटना म्हणजे संभाजी महाराजांनी रामनगरच्या प्रदेशाचा राजा नारायणदेव रामाचा पराभव केला. त्यानंतर मराठ्यांनी दमणकडून चौथची मागणी केली, जी पोर्तुगिजांनी रामाचे सर्व प्रदेश ताब्यात घेतलेला नसल्याच्या कारणाने नाकारली.
जानेवारी १६८३मध्ये, पोर्तुगिजांनी संभाजी महाराजांविरुद्ध युद्ध पुकारावे, मुघलांशी व्यावसायिक संबंध ठेवावेत आणि त्यांच्या जहाजांना सुरत ते बॉम्बे दरम्यान मुक्त मार्ग द्यावा, असा प्रस्ताव घेऊन एक मुघल दूत गोव्यात आला.
पोर्तुगिजांनी संभाजीशी युद्ध करण्याखेरीज सर्व अटी मान्य केल्या. ही बातमी संभाजी महाराजांना कळवण्यात आली आणि गोव्याच्या व्हाइसरॉयने पोर्तुगीजांशी तह करण्याची विनंती संभाजी महाराजांना केली. त्याच व्हॉइसरॉयने औरंगजेबाला पत्र मिळण्यापूर्वीच मुघलांना मुक्त मार्गाची परवानगी दिल्याचे लिहिले. पोर्तुगिजांना संभाजी महाराजांविरुद्ध मुघलांची मदत हवी होती.
एप्रिल ते मे १६८३च्या दरम्यान, मराठ्यांनी उत्तर कोकणातील पोर्तुगीज प्रदेशावर आक्रमण केले आणि डहाणू, अशेरी, तारापूर आणि वसई ही गावे लुटली. संभाजी महाराजांचे पेशवे निलोपंत पिंगळे यांनी चेंबूर, तळोदे, कोळवे, माहीम, धंतोरे आणि सरगाव हा पोर्तुजिजांचा ४० मैलांचा प्रदेश उद्ध्वस्त करून ताब्यात घेतला.
१६८३च्या मध्यापर्यंत संभाजी महाराजांनी चौलवर हल्ला केला. नोव्हेंबरच्या सुरुवातीला मराठ्यांचे लक्ष विचलित करण्यासाठी व्हॉइसरॉयने स्वतः मोठ्या फौजेच्या नेतृत्वाखाली फोंड्यावर हल्ला केला.
त्यानंतर संभाजी महाराजांनी फोंड्याच्या बचावासाठी ६०० सैनिकांसह वैयक्तिकरित्या येण्याचे ठरवले. स्वतःच्या जिवाला धोका असल्याने व्हाइसरॉयने माघार घेण्याचा निर्णय घेतला.
संभाजी महाराजांनी अस्तित्वात असलेला किल्ला पाडून नवीन बांधला. नवीन किल्ल्याचे नाव ‘मर्दनगड’ ठेवण्यात आले. संभाजी महाराजांनी चौलमधून सैन्य मागे घेतले नाही. पिंगळे यांनी चौलवर दबाव ठेवला आणि ऑगस्ट १६८३पर्यंत मराठ्यांनी २००० घोडेस्वार आणि ६००० पायदळांसह चौल ताब्यात घेतले.
संभाजी महाराजांनी गोव्यातील पोर्तुगिजांच्या प्रदेशाकडेही लक्ष वळवले आणि जुवेचा किल्ला ताब्यात घेतला. कमी भरतीच्या वेळी दावजी खिंडीने तिसवाडीत प्रवेश करण्याचा त्यांचा बेत होता. व्हाइसरॉयने जुवेतून मराठ्यांना हाकलून लावण्याचा प्रयत्न केला पण तो अयशस्वी ठरला.
औरंगजेबाचा बंडखोर मुलगा, अकबर याने मराठे आणि पोर्तुगीज यांच्यात शांतता प्रस्थापित करावी, असे सांगून संभाजी महाराजांनी व्हाइसरॉयकडे दूत पाठवला. दूत खात्रिलायक न वाटल्याने संदेशाकडे दुर्लक्ष करण्यात आले.
११ डिसेंबर रोजी संभाजी महाराजांचे सैन्य बार्देशमध्ये दाखल झाले. खुली लढाई जवळजवळ अशक्य असल्याने व्हाइसरॉयने किल्ल्यातील कॅप्टनांना विरोध न करण्याच्या सूचना दिल्या होत्या. चर्च जाळण्यात आले, गुरे उचलली गेली आणि गावे लुटली गेली. आतून पाण्याच्या कमतरतेमुळे थिवीचा किल्ला १० दिवसांनी पोर्तुगिजांना गमवावा झाला.
त्यानंतर शापोरा किल्ल्याला वेढा घातला. सासष्टीतही मराठ्यांनी हल्ले केले आणि मोठ्या प्रमाणात अन्नधान्य आणि गुरे वाहून गेली. मडगाव आणि इतर ठिकाणच्या तटबंदी आणि सशस्त्र चर्चवर हल्ले करून लुटले गेले. असोळणा आणि कुंकळ्ळी येथेही छापे टाकण्यात आले. मराठे २६ दिवस बार्देश आणि सासष्टीमध्ये राहिले.
पोर्तुगिजांच्या लक्षात आले की ते मराठ्यांच्या हल्ल्याला तोंड देण्यास असमर्थ आहेत आणि तिसवाडीदेखील संभाजी महाराजांच्या ताब्यात जाते असे चित्र दिसू लागले.
असाहाय्य स्थितीत व्हाइसरॉय कोंद दी अल्व्होर फ्रान्सिस्को द तावराने गोवा वाचवण्यासाठी जुने गोवे येथील सेंट फ्रान्सिस झेवियर यांच्या समाधीसमोर गुडघे टेकून प्रार्थना केली.
औरंगजेबाचा मुलगा शाह आलम १५ जानेवारी १६८४रोजी मुघल सैन्यासह डिचोली येथे आल्याने मराठ्यांनी माघार घेतल्याची चांगली बातमी लवकरच आली.
तीन दिवसांनंतर सैनिकांसह मुघल ताफा मांडवी नदीच्या मुखाशी येऊन थांबला. पोर्तुगिजांनी मुघलांच्या ताफ्याला शापोरा नदीत प्रवेश दिला.
शाहआलमने डिचोलीममधील संभाजी महाराजांचा प्रदेश लुटला. यावेळेस संभाजी महाराजांनी बार्देश आणि सासष्टीतून माघार घेतली होती. त्यांच्यात आणि पोर्तुगिजांमध्ये शांतता चर्चा पुन्हा सुरू झाली होती. एक तह झाला.
या कराराचा मजकूर सापडत नसला तरी त्यातील काही तरतुदींचा उल्लेख ४ फेब्रुवारी १६८४रोजी व्हाइसरॉयकडून नॉर्थच्या जनरलला लिहिलेल्या पत्रात केला आहे.
पोर्तुगिजांकडून घेतलेल्या सर्व जमिनी, किल्ले, जहाजे, शस्त्रे परत करण्याचे संभाजी महाराजांनी मान्य केले. त्यांनी याउलट दमण येथून चौथ भरणे सुरू ठेवण्याचे मान्य केले
पोर्तुगिजांशी चांगले संबंध ठेवून असलेल्या कोकणातील देसाईंना संभाजी महाराजांनी माफ केले. संभाजी महाराजांनी पोर्तुगीज प्रदेशांच्या सीमेवर किल्ले न बांधण्याचेही मान्य केले. तथापि दोन्ही पक्षांनी करारातील तरतुदींचे पालन केले नाही.
व्हाइसरॉयने पोर्तुगीज प्रदेशात आश्रय घेतलेल्या देसाईंना डिचोली येथे जाऊन मुघल सेवेत सामील होण्याची परवानगी दिली. पोर्तुगिजांनी मुघलांच्या वतीने २० लाख अशरफीसाठी संभाजी महाराजांच्या विरोधात लढण्याचा प्रस्ताव मुघलांना दिला होता.
या प्रस्तावाचे पुढे प्रत्यक्षात काहीही झाले नाही. संभाजी महाराजांनीही पोर्तुगिजांकडून ताब्यात घेतलेले सर्व कैदी, शस्त्रे आणि जहाजे परत केली नाहीत. बार्देशचे किल्ले त्यांच्याकडेच राहिले. पोर्तुगीजांवर हल्ला करण्याच्या उद्देशाने त्यांनी फोंडा येथे सैन्य ताब्यात घेतले.
८ फेब्रुवारी १६८५रोजी पोर्तुजिजांनी खेम सावंत आणि कोकणातील इतर देसाई यांच्याशी तह केला. या तहाचे उद्दिष्ट संभाजी महाराजांविरुद्ध आघाडी उघडणे हेच होते.
त्यात पोर्तुगिजांना बांदा ते अकोला दरम्यानच्या दोन तृतियांश जमिनी आणि किल्ले संभाजी महाराजांकडून मिळतील आणि कुडाळ आणि चौलमधील एक तृतीयांश भूभाग मिळणार होता.
स्वाक्षरी करणाऱ्यांपैकी कोणीही संभाजी महाराजांशी शांतता करारावर स्वाक्षरी करणार नव्हते. पोर्तुगिजांनी संभाजी महाराजांच्या भूमीवर आपला ताफा पाठवण्याचे मान्य केले आणि त्यांनी औरंगजेबाला खेम सावंत आणि इतर देसाईंच्या सेवा स्वीकारण्यास राजी केले.
या तहाच्या करारातील पक्षांनी हा तह संपताच मराठ्यांवर हल्ले सुरू केले. मार्च १६८९मध्ये औरंगजेबाच्या हातून दुःखद अंत होईपर्यंत संभाजी महाराजांनी आपले हल्ले चालू ठेवले. अशा प्रकारे वडिलांनी कार्य संभाजी महाराजांनी पुढे नेले.
दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा
Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.