World Pharmacist Day: फार्मासिस्ट म्हणजे औषधांच्या निर्माणात गुंतलेला 'एक रसायनतज्ज्ञ'

World Pharmacist Day: 2009 साली जागतिक फार्मसी आणि औषधरसायनशास्त्र कॉंग्रेसच्या मंचवरुन आंतरराष्ट्रीय फार्मास्युटिकल्स महासंघाने हा दिवस साजरा करण्याचा निर्णय घेतला.
World Pharmacist Day
World Pharmacist DayDainik Gomantak
Published on
Updated on

World Pharmacist Day: 25 सप्टेंबर हा दिवस जगभरात फार्मासिस्टचा दिवस म्हणून साजरा केला जातो. 2009 साली जागतिक फार्मसी आणि औषधरसायनशास्त्र कॉंग्रेसच्या मंचवरून आंतरराष्ट्रीय फार्मास्युटिकल्स (International Pharmaceuticals) महासंघाने हा दिवस साजरा करण्याचा निर्णय घेतला. फार्मासिस्ट म्हणजे औषधांच्या निर्माणात गुंतलेला रसायनतज्ज्ञ. जगाच्या सर्व भागांत व्यक्तिगत आणि समाजाच्या स्वास्थ्यसुधारणेतील त्याच्या भूमिकेला प्रकाशझोतात आणण्यासाठी या दिवसाचे आयोजन त्यानंतर दरवर्षी सातत्याने होत आले आहे.

फार्मासिस्ट हा आरोग्यसेवेच्या शृंखलेतला महत्त्वाचा दुवा. हल्लीच मानवतेवर आघात करणाऱ्या कोविड महामारीच्या काळातही या घटकाने रुग्णसेवा आणि उपचारांच्या प्रांतात डॉक्टर, परिचारिका आणि अन्य आरोग्यकर्मींच्या खांद्याला खांदा लावून अत्यंत महत्त्वाची आणि अविस्मरणीय कामगिरी बजावलेली आहे.

World Pharmacist Day
PM Applaud Goa: पंतप्रधान मोदींकडून गोव्यातील किनारपट्टी स्वच्छता अभियानाचे कौतुक

औषधनिर्माण हा उदात्त व्यवसाय मानला जातो. नोंदणीकृत फार्मासिस्ट म्हणून आवश्यक परवाना मिळविण्यासाठी तशी शैक्षणिक अर्हता असावी लागते. आपल्या देशात औषध निर्मितीचे नियमन करणारा कायदा आहे आणि त्यान्वये प्रत्येक फार्मासिस्टला राज्य फार्मसी मंडळाच्या माध्यमातून राष्ट्रीय फार्मसी मंडळाकडे नोंदणी करणे अनिवार्य आहे. अशा प्रकारची नोंदणी करण्यासाठी आपल्या देशात असलेले फार्मसीशास्त्र विषयक पदविका, पदवी, पदव्युत्तर तसेच डी. फार्मा यापैकी कोणताही अभ्यासक्रम पूर्ण करावा लागतो.

गोव्यातील फार्मासिस्टची नोंदणी बांबोळी येथे असलेल्या खाद्य आणि औषध प्रशासन संचालनालयाच्या कार्यालयात स्थीत असलेल्या गोवा राज्य फार्मसी मंडळाच्या कार्यालयातून केली जाते. औषधनिर्माणशास्त्राचे अध्ययन करणाऱ्यांसाठी रोजगाराची अनेक दालने खुली असतात. यात समाजाधिष्ठित फार्मासिस्ट, रुग्णालयांतले फार्मासिस्ट, शिक्षक-अध्यापक, संशोधन करू पाहणारे शास्त्रज्ञ, औषध निर्माते केमिस्ट, दर्जा नियंत्रण अभ्यासक, औषध विक्रीतले व्यावसायिक, नियंत्रक अशा रोजगारांचा समावेश आहे.

World Pharmacist Day
Sun Pharma च्या हलोल प्लांटला यूएस एफडीएकडून 10 आक्षेप; शेअर्समध्ये मोठी घसरण

मात्र, या क्षेत्रातील करिअरच्या संधींविषयीची माहिती अवघ्याच लोकांना असते. बहुतेकांना औषधनिर्माणशास्त्रात अर्हता प्राप्त करणे म्हणजे एखाद्या औषधालयात काम करणे किंवा असे दुकान उघडण्यापुरतेच मर्यादित वाटते. अनेकदा कुणी आपली पात्रता सांगताना आपण बी. फार्म असल्याचे म्हटले तर ऐकणारा बी. कॉम असे ऐकतो, इतके हे अपरिचित क्षेत्र आहे. अशा लोकांना मग औषधनिर्मिती क्षेत्राविषयी सविस्तरपणे सांगण्याशिवाय गत्यंतर नसते.

मला वैयक्तिक स्तरावर आलेला एक अनुभव सांगतो. मी फार्मसीचा पदवी अभ्यासक्रम उत्कृष्ट गुणांनिशी पूर्ण केला तेव्हा एक सुशिक्षित गृहस्थ मला विचारू लागले, ‘ठीक आहे, आता तुझी स्वतःची फार्मसी केव्हा उघडतोस?’ अर्थात हळूहळू परिस्थिती बदलते आहे, पण तिची गती काही आश्वस्त करणारी नाही, हेही तितकेच खरे.

World Pharmacist Day
Goa Beach: समुद्र लाटांशी जीवघेणा खेळ थांबेना! पर्यटक पोलिसांचे लक्ष कुठे?

गोव्यांत औषधनिर्माणशास्त्र शिकवणारी दोन महाविद्यालये आहेत. त्यातले एक आहे माझे स्वतःचे विद्यामंदिर- आशिया खंडातले सर्वात जुने फार्मसी महाविद्यालय- गोवा सरकारतर्फे चालविले जाणारे पणजीतले गोवा फार्मसी महाविद्यालय. दुसरे महाविद्यालय फोंडा येथे फोंडा शिक्षण संस्थेतर्फे चालविण्यात येते. या दोन्ही महाविद्यालयांतील संपूर्ण अध्यापकवर्ग फार्मासिस्ट आहे, अपवाद संगणकाविषयीचे किंवा शारीरिक शिक्षण विषयाचे अध्यापन करणाऱ्या प्राध्यापकांचा.

नियमनाची बाजू आपल्याकडे सांभाळते आहे अन्न आणि औषध प्रशासन संचालनालय. जे ड्रग अँड कॉस्मेटिक (Drug and Cosmetic) कायद्यांतर्गत नियमांची अंमलबजावणी करते आणि त्यायोगे फार्मा उद्योग आणि व्यापार यांच्यावर नियंत्रण ठेवते. या संचालनालयात अंमलबजावणी आणि तांत्रिक विभागात, औषधविषयक प्रयोगशाळेत तसेच प्रशासनातही फार्मासिस्टचा भरणा असतो तसेच या संचालनालयाचे संचालकही फार्मासिस्टच आहेत.

World Pharmacist Day
Goa Agriculture: शास्त्रज्ञांना मिळालं मोठं यश, गोव्यात शोधलं भाताचं नवं वाण!

गोव्यात औषधनिर्मिती उद्योगाने चांगलेच बस्तान बसविले आहे. राज्यात औषध निर्मिती करणारे 75 च्या आसपास उद्योग असून त्यातील 57 उद्योगांची उत्पादने निर्यातीसाठी असतात. औषध निर्मितीत गोव्याचा क्रमांक देशातील अन्य राज्यांच्या तुलनेत चौथा लागतो. आपल्याकडील औषध निर्यातीचा एकूण देशी औषध निर्यातीतला वाटा 12टक्के इतका आहे.

जपान, अमेरिकेसारख्या नियंत्रित बाजारपेठांसहित जगाच्या कानाकोपऱ्यांत होणाऱ्या औषधांच्या निर्यातीतून आपल्याला वार्षिक 1.7 अब्ज डॉलर्सची कमाई होते. यातील बहुतेक उद्योगांनी उत्पादनासाठी गोव्याची निवड करण्यामागचे कारण होते, राज्याने जाहीर केलेली कर सवलत. नव्या उद्योगांना आकर्षित करण्यासाठी नव्वदीच्या दशकात ही सवलत देण्यात आली होती.

World Pharmacist Day
CBI In Goa: बाल लैंगिक शोषण प्रकरणी सीबीआयची गोव्यात शोध मोहिम

त्यानंतर हिमाचल प्रदेश, सिक्कीम, उत्तराखंड ही राज्येही अशाच सवलती देत उद्योगांना आकर्षित करू लागली. त्याच दरम्यान गोव्याने निर्यातीसाठी निर्माण केलेल्या सुविधांचा विस्तार करण्यावर भर दिला आणि इथे सुस्थापित झालेल्या उद्योगांना ते सोयीचे पडले. आज हा उद्योग 17,000 लोकांना रोजगार देतो आहे आणि त्यात औषध निर्माण क्षेत्रातले 7,500 हून अधिक तज्ज्ञ आहेत.

गोव्यात आजमितीस 942 औषधालये असून घाऊक विक्रेत्यांची संख्या 378 आहे. साधारणतः तीन हजार फार्मासिस्टना त्यायोगे रोजगार मिळत असतो. गोवा वैद्यकीय महाविद्यालय, आरोग्य सेवा संचालनालय, मानसशास्त्र आणि मनोव्यापार संस्था, ईएसआय अशा सरकारी संस्थांतूनही बऱ्याच फार्मासिस्टना रोजगार उपलब्ध झालेला आहे. रुग्णांना दर्जेदार औषधांचा पुरवठा करणे तसेच विहित कायद्याच्या कक्षेत राहून औषधे देणे ही फार्मासिस्टची प्रमुख जबाबदारी.

World Pharmacist Day
Goa Government: शिक्षकांवरही राहणार आता सरकारची बारीक नजर!

औषधांची अनुरूपता, दोन किंवा अधिक औषधांचा एकत्रित परिणाम, साइड इफेक्ट, औषध सेवन करण्याची पद्धत याविषयी त्याने रुग्णांना मार्गदर्शन करणे अपेक्षित असते. नियामक व्यवस्थेत जे फार्मासिस्ट कार्यरत असतात त्यांनी आपल्या कार्यक्षेत्रातले औषधांचे उत्पादन, विक्री, चाचण्या, साठा, वितरण इत्यादी नियमांच्या चौकटीत होते आहे, याची खातरजमा करायची असते.

वरिल विवेचनावरून लक्षात येईल की औषध निर्मितीच्या क्षेत्रात जसा रोजगाराला भरपूर वाव आहे तसाच तो आपला स्वतःचा किरकोळ किंवा घाऊक औषध विक्रीचा उद्योग सुरू करण्यातही आहे. देशातील नागरिकांना स्वस्तात औषधे उपलब्ध व्हावीत म्हणून भारत सरकारने आपल्या औषध निर्माण खात्याच्या माध्यमातून जनऔषधी ही योजना कार्यान्वित केली असून तिच्यामुळे जेनेरिक औषधांची विक्री करणाऱ्या केंद्रातून ब्रँडेड औषधांइतकीच प्रभावी औषधे कितीतरी कमी किमतीत मिळतात.

World Pharmacist Day
PM Applaud Goa: पंतप्रधान मोदींकडून गोव्यातील किनारपट्टी स्वच्छता अभियानाचे कौतुक

औषध निर्मिती आणि विक्रीच्या क्षेत्राला अत्युच्च नियमनाला सामोरे जावे लागते. औषधांचे उत्पादन करायचे असेल तर आवश्यक अर्हता असलेले तांत्रिकदृष्ट्या कुशल मनुष्यबळ लागते. या अनुभवाला आणि अर्हतेला राज्यस्तरीय एफडीएची मान्यता लागते. त्याचप्रमाणे औषधालयाचा मालक किंवा कर्मचारी नोंदणीकृत फार्मासिस्ट असावा लागतो.

नोंदणीकृत डॉक्टरच्या शिफारशीशिवाय आणि नोंदणीकृत फार्मासिस्टच्या मान्यतेशिवाय कोणतेच महत्त्वाचे औषध विकता येत नाही. औषधांच्या खरेदी-विक्रीची सर्व नोंद काटेकोरपणे ठेवावी लागते. अशी नोंद न ठेवणाऱ्या विक्रेत्यांवर नियमांनुसार कारवाई होऊ शकते आणि त्यांचा विक्री परवाना रद्द होऊ शकतो.

World Pharmacist Day
Goa Water Supply: वालकिणीत लोक पितात उघड्या टाकीचे पाणी..!

कोविडकाळात राज्यातील औषध निर्माण उद्योगाला थोड्याच विलंबानंतर आपले उत्पादन पूर्ववत सुरू करता आले. यामागचे कारण म्हणजे प्रशासन आणि उद्योगातला समन्वय. लॉकडाऊननंतर अवघ्या एका महिन्याच्या काळातच औषध निर्मिती उद्योगाने आपल्या क्षमतेच्या 90 टक्क्यांपर्यंत उत्पादनाची मजल गाठली. यावेळी अन्य कर्मचाऱ्यांबरोबरच फार्मासिस्टनीही सहकार्याचा हात पुढे केला.

केवळ गोव्यातच नव्हे तर जगभरातील फार्मासिस्टनी कोविडच्या कसोटीच्या काळात अत्युच्च सेवावृत्तीचे दर्शन घडविले. काहींना कर्तव्यपूर्ती करताना आपल्या प्राणांसही मुकावे लागले. मात्र, या सेवेची कदर सरकारी यंत्रणेकडून आणि जनता व रुग्णांकडूनही हवी तशी झालेली नाही, असे एक शल्य या व्यवसायात असलेल्यांच्या मनात घर करून आहे. आजच्या दिवशी आपण आरोग्यसेवा शृंखलेतील या अतिमहत्त्वाच्या घटकाच्या योगदानाला मानवंदना देऊया.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
var bottom_sticky_ad = googletag .sizeMapping() .addSize([1000, 0], [[728, 90]]) .addSize( [0, 0], [ [320, 50], [300, 50], [320, 100] ] )         .build()
Goa News on Dainik Gomantak
dainikgomantak.esakal.com