बाल लैंगिक शोषण संबधित साहित्य डाउनलोड आणि प्रसारित करण्याच्या दोन प्रकरणात सीबीआयने (Central Bureau of Investigation) गोव्यात शोध मोहिम राबवली. सीबीआय करत असलेल्या देशव्यापी कारवाईचाच हा एक भाग आहे. सीबीआयची शनिवारी रात्री उशीरापर्यंत गोव्यात शोध मोहिम सुरू राहिली. बाल अत्याचार (Crime Against Children) प्रकरणी आयटी कायद्यांतर्गत दोन गुन्हे दाखल आहेत. याच प्रकरणी सीबीआयने गोव्यात तपास केला.
बाल लैंगिक शोषण संबधित साहित्य डाउनलोड आणि प्रसारित करण्याविरोधात सीबीआयने ऑपरेशन मेघचक्र (Operation Meghchakra) हाती घेतले आहे. याचाच भाग म्हणून शनिवारी 21 राज्यातील 59 ठिकाणी सीबीआयने छापेमारी केली. सिंगापूरच्या इंटरपोलला (Singapore Interpole) न्यूझीलंड पोलिसांकडून मिळालेल्या माहितीच्या आधारे सीबीआयने आयटी कायद्यांतर्गत दोन गुन्हे दाखल केले. सीबीआय पथकाने हरियाणा, गुजरात, महाराष्ट्र, पश्चिम बंगाल, गोवा. उत्तर प्रदेश, कर्नाटक, केरळ, झारखंड यासह विविध राज्य आणि केंद्र शासित प्रदेशात देखील छापेमारी करत शोध घेतला.
सीबीआयच्या माहितीनुसार, अनेक भारतीय नागरिक क्लाउड-आधारित स्टोरेजचा वापर करून बाल लैंगिक शोषण संबधित साहित्य डाउनलोड आणि प्रसारित करत आहेत. भारतात बाल लैंगिक शोषण संबधित साहित्य प्रसारित करणाऱ्या रॅकेटचा नायनाट करणे हा सीबीआयच्या या मेघचक्र ऑपरेशनचा उद्देश आहे. सीबीआय पथकाने शनिवारी तपासादरम्यान 50 संशियाताकडून मोबाईल, टॅब, लॅपटॉप तसेच इतर ईलेक्ट्रॉनिक साहित्य जप्त केले आहे. याचा सर्व डिव्हाईसचा फॉरेन्सिक तज्ञाच्या मदतीने तपासणी केली जाणार आहे.
नोव्हेंबर 2021 मध्येही राबविले होते 'ऑपरेशन कार्बन'
बाल लैंगिक शोषण संबधित साहित्य डाउनलोड आणि प्रसारित करण्याविरोधात सीबीआयने यापूर्वी देखील धडक मोहिम राबविली होती. नोव्हेंबर 2021 मध्ये सीबीआयने देशात 'ऑपरेशन कार्बन' राबवले. यामध्ये देशातील विविध राज्यात एकूण 76 ठिकाणी छापेमारी करत, 86 संशयित आरोपींना अटक केली. बाल लैंगिक शोषण संबधित कारवायांना आळा घालण्यासाठी सीबीआयने पुन्हा मोठी मोहिम हाती घेतल्याचे दिसते.
शनिवारी खालील ठिकाणी केली सीबीआयने छापेमारी
फरीदाबाद, फतेहाबाद (हरियाणा); डेहराडून (उत्तराखंड); कच्छ (गुजरात); गाझियाबाद, हाथरस, महाराजगंज (उत्तर प्रदेश); वर्धमान, मुर्शिदाबाद (पश्चिम बंगाल); मुंबई, पुणे, नाशिक, ठाणे, नांदेड, सोलापूर, कोल्हापूर आणि नागपूर (सर्व महाराष्ट्रात); रांची, धनबाद (झारखंड); चित्तूर, कृष्णा (आंध्र प्रदेश); बेंगळुरू, कोडागू, राम नगर, कोलार (कर्नाटक); रायपूर (छत्तीसगड); नवी दिल्ली; चेलाक्करा (केरळ); चेन्नई, दिंडीगुल, कुड्डालोर; गुरुदासपूर आणि होशियारपूर (पंजाब); सारण, भागलपूर (बिहार); गोवा; हैदराबाद (तेलंगणा); अजमेर, जयपूर (राजस्थान); मल्लपुरम (केरळ); राजकोट, लुनावडा, गोध्रा (गुजरात); गुवाहाटी, धीमाजी (आसाम); इटानगर (अरुणाचल प्रदेश); आगरतळा (त्रिपुरा); आणि मंडी (हिमाचल प्रदेश).
Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.