प्रा. सुभाष वेलिंगकर
गोव्यातील वाढत्या अराष्ट्रीयतेच्या विरोधात सदैव दंड थोपटून उभा ठाकणारा हा चिरतरुण खूपच विरळ वाटला. नागेशबाब कोकणी चळवळीतील आघाडीचे सैनिक. मराठीही तेवढीच प्रसन्न असलेले नागेशबाब, हे चौफेर लेखक. मी कोकणी आंदोलनात कुठेही नसताना देखील, अराष्ट्रीयतेविरुद्ध पोर्तुगीजधार्जिणेपणा करणाऱ्यांविरुद्ध, देशद्रोहाविरुद्ध उभ्या राहिलेल्या निरंतर लढ्यात पिता-पुत्रासारखे आमचे नाते जडले.
गोमंतकाच्या राष्ट्रवादाचे जनक असलेले स्व. टी. बी. कुन्हा ही नागेशबाबची अंत, प्रेरणा आणि ते माझेही स्फूर्तिस्थान! मी कट्टर संघवाला, तर नागेशबाब संघाची तत्वे न पटणारे आणि प्रसंगी संघावर टीकाही करणारे व्यक्तिमत्व. परंतु जसजसे जवळ येत गेले तसे हृदयातील राष्ट्रवादाच्या समान ऊर्मीने आम्हाला एकत्र आणले, एकत्र टिकवले.
नागेशबाब चौफेर लेखक, अफाट वाचनाचे व्यासंगी. गोव्याच्या मुक्तिलढ्यातील सहभागाव्यतिरिक्त त्यांना गोमंतकीय जनजीवनाबदल आणि गोव्यातील अराष्ट्रीयतेच्या कारनाम्यांबद्दल अफाट माहिती होती. माझ्या पिढीतील अनेकांना याबद्दल मार्गदर्शन आणि सहकार्य नागेशबाबकडून मिळत आले आहे.
लेखनासाठी, कार्यक्रम योजनेसाठी एखादा संदर्भ व अचूक माहिती हवी असेल, त्यावेळी डोळ्यांसमोर एकच नाव येई, नागेशबाब! हव्या असलेल्या संदर्भासाठी लागणारे एखादे तरी पुस्तक हमखास, नागेशबाब आपल्या तुडुंब भरलेल्या कित्येक कपाटांतील पुस्तकांतून अचूक काढून द्यायचे.
आम्ही एकत्र काम करायचा योग गेल्या 40 वर्षांत अनेकदा येऊन गेले. गोव्याचे पहिले ॲटर्नी जनरल, ज्वलंत देशभक्त स्व. ॲड. जोकिम डायस यांच्या नेतृत्वाखाली स्थापन झालेल्या देशप्रेमी नागरिक समितीच्या चळवळीपासून याची सुरवात झाली.
केंद्र सरकार व गोवा सरकारने मिळून सरकारी पातळीवर अधिकृतपणे पोर्तुगीज साम्राज्यवादाचा वास्को दी गामा यांची पंचशताब्दी धूमधडाक्याने साजरी करण्याचा निर्णय घेतला होता. हा निर्णय मागे घेण्यास दोन्ही सरकारांना भाग पाडणारे आंदोलन उभे करायचे होते. माझे वडील स्व. भास्कर वेलिंगकर स्वातंत्र्यसैनिक होते.
स्वातंत्र्यसैनिक ॲड. विश्वनाथ लवंदे, फ्लावियानबाब डायस, प्रभाकर सिनारी, नारायण नाईक यांच्याबरोबर त्यांनी काम केलेले होते. संघाचा प्रतिनिधी आणि युवाफळीचे नेतृत्व करणारा म्हणून माझ्यावर देशप्रेमी नागरिक समितीचा कृति-विभाग निमंत्रक अशी जबाबदारी होती.
या मोहिमेत होणाऱ्या सुकाणू बैठकांमधून नागेशबाबशी माझा परिचय वाढला. त्यानंतर गोव्यात घडणाऱ्या व अराष्ट्रीयत्वाचे प्रदर्शन करणाऱ्या प्रत्येक घटनांवरील प्रतिक्रियेच्या चळवळींमध्ये नागेशबाबचे सहकार्य, प्रोत्साहन आणि मार्गदर्शन मला लाभलेले आहे.
पोर्तुगीज साम्राज्यवादी महाकवी लुईश द सिमॉईश यांची त्रिशताब्दी साजरी करण्याचा डाव असो किंवा पोर्तुगीजधार्जिण्यांना खूष करण्यासाठी पणजीतील मळा भागाला प्रतिपोर्तुगाल स्वरूप देणारा व भाजप सरकाने सुरू केलेला ‘फोंताईन्यश फेस्टिवल’ असो, नागेशबाब हिरीरिने व दुर्दम्य उत्साहाने या अराष्ट्रीय कृत्यांविरोधात उभे ठाकले.
गोवा मुक्तीसाठी सुमारे 6 वर्षे तुरुंगवास भोगलेल्या नागेशबाब व इतर तिघा तरुणांवर फोताईन्यश फेस्टिवलसाठी रस्त्यांना दिलेले पोर्तुगीज नामफलक हातोड्याने फोडून टाकल्याबद्दल पर्रीकर सरकारने एकदा आणि काँग्रेस सरकारने एकदा असे दोनदा खटले चालविण्यात आले.
अनैतिक धंद्यातून मिळविलेल्या पोर्तुगीज आमदनीतून गोव्यात पोर्तुगीजधार्जिणेपणा वाढण्यासाठी स्थापन झालेली फुदांसाव ओरिएंतसारखी संस्था असो किंवा दुहेरी नागरिकत्वाचा प्रश्न असो, नागेशबाबचे ज्वलंत लेख आणि प्रतिक्रियात्मक मोहीम सदैव पुढे सरसावलेली आहे.
आपल्यासारख्या तरुणांना अग्रेसरस्थानी राहून सदैव स्फूर्ती देण्याचे धडाडीचे कार्य नागेशबाबनी केलेले आम्ही पाहिले आहे.
2011-12 पासून प्रथम काँग्रेसविरोधात आणि नंतर 2015 पासून भाजपविरोधात आजतागायत अथकपणे कोकणी-मराठी या मातृभाषांच्या रक्षणार्थ उभ्या राहिलेल्या भारतीय भाषा सुरक्षा मंचच्या आंदोलनात प्रदीर्घ काळ एकत्र काम करण्याची आणि त्यांना सतत भेटून स्फूर्ती व मार्गदर्शन घेण्याची संधी मला लाभली हे मी माझे भाग्य मानतो.
आपल्या जुन्या खटाऱ्या लॅब्रेटा स्कूटरवर बसून नियमितपणे पणजीत येऊन आझाद मैदानाच्या बाजूच्या टी. बी. कुन्हा ट्रस्टच्या ऑफिसवजा सभागृहात येण्याचे वयस्क तरुण नागेशबाब डोळ्यासमोर आले की मनाला कशी कार्य-प्रवणतेची ऊर्जा मिळते ते मी अनुभवलेले आहे.
सवडीने नागेशबाबवर लिहिण्यासारखे अथांग आहे. या दुःखद प्रसंगी त्यांच्या प्रेरक स्मृतींना एवढाच उजाळा आयुष्यभर पुरणारा आहे. हे गोमंतकीय राष्ट्रवादाच्या रक्षणार्थ सदैव लढणाऱ्या तत्पर, निधड्या छातीच्या राष्ट्रवीरा, तुला कोटी कोटी वंदना, कोटी कोटी वंदना!
दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा
Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.