Blog: गोवा : सर्व पापे करण्याची मुक्तनगरी

गोव्याचा विकास दिशाहीन बनला आहे. आपला चेहरा हरवून बसला आहे.
Blog |Goa
Blog |GoaDainik Gomantak

Blog |Goa

कमलाकर द. साधले

खाणींनी उद्ध्वस्त झालेल्या पहाडातून रोरावत चाललेल्या खनिज ट्रकांच्या फलटणी, लाल मातीने माखलेली झाडे हे चित्र आता पुन: दिसणार आहे. हे कमी म्हणून की काय कर्नाटकातील खनिज गोव्याच्या रस्त्यांवरूनच जाणार आहे. यात विविधता म्हणून काळ्या कोळशाची धुळवडही गोव्याच्या रस्त्यांतून रंगणार आहे. गोव्याचा विकास दिशाहीन बनला आहे. आपला चेहरा हरवून बसला आहे.

गेल्या आठवड्यात गोव्याच्या पर्यावरणीय इतिहासात एक नव्या अध्यायाच्या लेखनास सुरुवात झाली. काकोडा येथील नंदा तळ्याच्या परिसराला ’रामसर वॅटलँड’ हे जागतिक मानांकन प्राप्त झाले. त्यात पर्यावरणमंत्री श्री. नीलेश काब्राल यांचे प्रयत्न फळाला आले. गोवा सरकारचे अभिनंदन. विशेष करून काब्राल यांचे!

पाणथळी (वॅटलँडस्) या सृष्टीत पर्यावरणीय समृद्धीच्याबाबतीत बऱ्याच भूमिका बजावत असल्याचे आढळून आल्याने त्यांच्या संवर्धनाला, रक्षणाला हल्ली बरेच महत्त्व प्राप्त झाले आहे. पाणथळींची व्याख्या म्हणजे ‘जेथे पायाचे तळवे ओले होतील, पण पोहता येणार नाही एवढे पाणी असलेला भूभाग’. हा भूभाग जैवविविधतेने अतिशय समृद्ध असतो. त्याला ‘हॉट स्पॉट ऑफ बायोडायव्हर्सिटी’ म्हटले जाते.

ओल्या दलदलीच्या भूमीत एक समृद्ध जैव-शृंखला नांदत असते. स्थलांतरित पक्ष्यांना येथे विपुल अन्नसामग्री व दलदलीमुळे सुरक्षित जागा मिळत असल्याने दरवर्षी ते येथेच उतरतात. हा आजूबाजूच्या परिसराच्या मानाने खालसर भाग असल्याने पावसाचे पाणी पहिल्यांदा येथेच स्थिरावते. तेथील भूगर्भ जलसंपन्न होतो.

Blog |Goa
Goa Tourism : आपण पर्यटकांना गोवा कसा दाखवतोय? याचा परिणाम इथल्या संस्कृतीवर तर होत नाही? वाचा सविस्तर

आजूबाजूची भूपृष्ठावरील सुपीक माती (टॉपसॉईल) येथेच साठते. एकदम पाऊस पडून नदीला पूर येतो तेव्हा हे पुराचे पाणी पोटात घेऊन वॅटलँड पुराची तीव्रता कमी करते. आजकाल मोठमोठ्या शहरांमध्ये वारंवार पूर येणे सुरू झाले आहे. याला कारण शहरातील व शहराबाहेरील तळी, पाणथळी, नदीकाठची पूरमैदाने बुजवून इमारती उभ्या झाल्या आहेत. पुराचे पाणी साठवून ठेवणारी सरोवरे, पाणथळी व मैदाने लुप्त झाली आहेत.

कर्बवायू हा वातावरणाच्या हवामान बदलाचे अरिष्ट आणणारा, तर पाणथळ हा कर्बवायू शोषून घेणारा घटक. त्यामुळे गावच्या हवेचेही शुद्धीकरण आणि जलसंवर्धन करणारा घटक बनून राहतो. जैवविविधता समृद्ध बनते, त्याचा प्रत्यक्ष फायदा दिसून आला नाही तरी ते सृष्टीने घडवून आणलेले पर्यावरणीय भांडवल असते.

Blog |Goa
Mahadayi Water Dispute : गोव्याच्या जीवनदायिनीचे वाळवंटीकरण होण्याआधीच आपण जागे होणे महत्त्वाचे!

पाणथळीचा उपयोग मत्स्यसंवर्धनासारख्या अनेक योजनांतून कसा करून घ्यावा हा मानवी कल्पकतेचा, उद्योजकतेचा भाग आहे. बऱ्याच ठिकाणी पाणथळींमध्ये भातशेतीही चालते. गोव्यात बऱ्याच ठिकाणी डोंगरमाथ्यावर, दऱ्यांमध्ये बांध घालून तळी बनविलेली असतात.

पावसाळ्यात बांधाचे दार उघडून पाणी वाहून जाऊ दिले जाते व पावसाळ्यात पावसाचे, झऱ्यांचे पाणी बांधाच्या दरवाजातून बाहेर सोडून दिले जाते आणि भाताचे पावसाळी (सर्द) पीक घेतले जाते. ऑक्टोबरच्या दरम्यान बांधाचा दरवाजा बंद करून झऱ्यांचे पाणी साठवले जाते. ते डोंगरउतारावरील कुळागरांना पुरविले जाते.

बऱ्याचशा पाणथळींमध्ये हिवाळ्यात फ्लेमिंगोसारख्या स्थलांतरित पक्ष्यांचे थवेच्या थवे उतरतात आणि हजारोच नव्हे तर लाखलाख पक्ष्यांनी परिसर गजबजून जातो. तेव्हा मानवी पर्यटनही तेथे जोरात चालते.

Blog |Goa
School Education: पायाभूत शिक्षण : शालेय शिक्षणाचा कणा

वैश्विक समाजाने पाणथळींच्या संवर्धनाचा कार्यक्रम गांभीर्याने हाती घेतला तो रामसर येथील जागतिक - सीओपी (कॉन्फरन्स ऑफ पार्टीज)च्या संमेलनात. म्हणून जगभरात संमेलनाने निर्धारित केलेल्या मानकांनुसार रक्षण व संवर्धन आवश्यक असलेल्या पाणथळींना ‘रामसर’ हे नामांकन बहाल केले जाते.

भारतीय स्वातंत्र्याच्या पंचाहत्तरीच्या निमित्ताने सरकारने भारतात ७५ रामसरी पाणथळी विकसित करण्याचे कार्य हाती घेतले आहे. सध्या हा आकडा आशिया खंडात सर्वोच्च आहे. काश्मीरपासून तामिळनाडू, केरळपर्यंत, निरनिराळ्या पाणथळींचे संरक्षण-संवर्धन चालू आहे. परवाच्या काकोड्याच्या नंदा पाणथळी ’रामसर’ नामांकन घोषित करण्याच्या कार्यक्रमाला आलेल्या निरनिराळ्या राज्यांतील रामसर पाणथळींच्या अधिकाऱ्यांना केंद्रीय मंत्री भूपेंद्र यादव यांनी बोलते केले.

त्यातून त्या पाणथळींची, त्यांच्या वैशिष्ट्यांची, व्यवस्थापनाच्या कार्यपद्धतीची बरीच माहिती मिळाली. काही पाणथळी एकूण गोव्याच्या आकाराहून मोठ्या आहेत. केरळमधील ‘वेंबनाद - कोल’ ही पश्चिम किनाऱ्यावरील - सर्वांत मोठी, एकूण गोवा राज्याच्या निम्म्याने आहे.

Blog |Goa
Blog: ‘स्मार्ट’ कोंडी

केंद्र सरकारने पाणथळींच्या संरक्षणविषयीचा कायदा चालू शतकाच्या पहिल्या दशकातच (कागदोपत्री) जारी केला होता. पण अंमलबजावणीच्या संदर्भात काहीच केले नव्हते. मला आठवते त्याप्रमाणे कोणीतरी त्या कायद्याच्या आधारे न्यायालयात गेल्यानंतर जवळजवळ एक दशकानंतर त्याविषयीची अधिकारिणी संस्थापित करून अंमलबजावणीला सुरुवात केली.

गोव्यात अधिकारिणीची निर्मिती दोन वर्षांपूर्वीच झाली. या उपक्रमाने खरा जोर पकडला तो आंतरराष्ट्रीय ‘कोप’च्या रामसर ठरावानंतर. 2022साली भरघोस कार्य झालेले दिसते. भारत सरकारने 75 रामसर पाणथळींची घोषणा गेल्या नोव्हेंबरमध्ये जीनिव्हा संमेलनात केली. आता सरकारी यंत्रणा याविषयी गंभीर असल्याचे दिसते.

कारण हरित लवादाने कर्नाटकातील चंद्रपूर तळ्याचे संरक्षण करण्यात हयगय केल्याबद्दल राज्य सरकारला 500 कोटी रुपयांचा दंड ठोकला. तसेच कर्नाटकाच्या विजयपूर व रायचूर येथे पाणथळींतील गाळ काढण्याच्या सबबीखाली रेती उपसण्याच्या खाणी चालू दिल्याबद्दल राज्य सरकारची/ सज्जड कानउघाडणी केली.

याविरुद्ध कृतिदल स्थापण्याची फर्माईश केली. याशिवाय भारत सरकारने ‘अमृत सरोवर’ योजनेखाली 25 हजारांहून जास्त पाणथळींच्या विकासाची घोषणा केली आहे. ही सर्व उद्दिष्टे भव्य दिव्य दिसतात. पण ती प्रत्यक्षात उतरताना काय होते ते पणजी स्मार्ट सिटीचे काय होते त्यावरून दिसत आहे. तसे मात्र होऊ नये.

परवाच्या रामसर पाणथळीच्या कार्यक्रमात ‘इको टूरिझम’ला वाव आहे, असे कोणीतरी म्हणाले. गेल्या महिन्यातील एका कार्यक्रमात मुख्यमंत्री म्हणाले की गोव्यात सांस्कृतिक-आध्यात्मिक पर्यटनाला वाव आहे. वाव होता, तो पूर्वी. आता कुठे आहे? आता ‘कॅसिनो टूरिझम’, ‘रेव्ह पार्टी टूरिझम’, हे प्रकार आलेले आहेत. जाईल तेथे मद्याचे बार चालवायला मुभा देऊन गोवा ‘दारुड्यांचे नंदनवन’ बनविले.

आता अमली पदार्थांचा जागतिक अड्डा बनला आहे. गोवा म्हणजे भारतातील सर्व राज्यांतील ‘वेश्या पुरविण्याचे केंद्र’, असे चित्र अधूनमधून पडलेल्या पोलिसांच्या धाडीतून दिसते.

चोऱ्या, खून, पकडलेले चोर, गुन्हेगार त्यांचा एक सँपल सर्वे केला तर गोवा हा जगातील गुन्हेगारांचा स्वर्ग बनून राहिला आहे, असे दिसेल. त्यात सांस्कृतिक व आध्यात्मिक पर्यटनही गुण्या-गोविंदाने नांदू शकेल का? तेही एवढ्याशा भूभागात ! गोव्याला, येथील पर्यटनाला एक चेहरा द्या ना! बहुरूपी सोंगे, नकोत.

Blog |Goa
Som Yag Yadnya 2023 : सण, व्रतवैकल्ये निसर्गचक्राची अभिव्यक्ती, अखंड सुरु ठेवू यज्ञयाग...

गोव्यातील भूमीची सुंदर, समृद्ध अशी एक प्राकृतिक घडण आहे. जगात मौल्यवान मानलेली पश्चिम घाटाची जैवविविधता आहे. हत्ती व वाघ या सारख्या भूचरांच्या शिखरस्थानी मानलेल्या जीवजाती आहेत. समुद्र, खाऱ्या पाण्यातील, गोड्या पाण्यातील मत्स्यसंपदा आहे. प्रवाळ आहेत. याशिवाय नाट्य- गायन - वादन-नृत्य देवळांच्या प्रांगणात, धालांच्या मांडावर आदिवासींच्या पाड्यांतून विकसित झालेली सूर-लय प्रधान कलासमृद्धी हा सर्व वारसा आहे.

हे सर्व टाकून आपण हिडिस चेहऱ्याचा, कानठळ्या बसणाऱ्या आवाजाच्या, बेताल धिंगाण्याच्या, माणुसकी विसरायला लावणाऱ्या नशेचा वेगळा ‘वारसा’ पुढच्या पिढीकडे देत आहोत. सत्ता आणि पैसा यांच्या नशेच्या अभद्र संकरांतून जन्मलेला हा अभद्र नशेचा वारसा.

खाणींनी उद्ध्वस्त झालेल्या पहाडातून रोरावत चाललेल्या खनिज ट्रकांच्या फलटणी, लाल मातीने माखलेली झाडे हे चित्र आता पुन: दिसणार आहे. हे कमी म्हणून की काय कर्नाटकातील खनिज गोव्याच्या रस्त्यांवरूनच जाणार आहे. यात विविधता म्हणून काळ्या कोळशाची धुळवडही गोव्याच्या रस्त्यांतून रंगणार आहे.

गोव्याचा विकास दिशाहीन बनला आहे. आपला चेहरा हरवून बसला आहे. गेल्या 2-3 दशकांतील सरकारे हा विवेक गमावून बसली आहेत. गोव्याच्या संस्कृती-प्रकृतीच्या पांचालीलाच सत्ता-पैशाच्या जुगारात पणाला लावली गेली आहे. सातशे-आठशेे वर्षांपूर्वी संपत्तीबरोबरच वेदविद्या, अध्यात्म यातून बनलेली गोव्याची एक ओळख होती,

गोकर्णात उत्तरे भागे सप्तयोजनपर्यंत।

तत्र गोवापुरी नाम नगरी पापनाशिनी ॥

(गोकर्ण तीर्थक्षेत्राच्या उत्तरेला सात योजने अंतरावर गोवापुरी नावाची एक पापनाशिनी पुण्यनगरी आहे.)

ती आता सर्व प्रकारची पापे करण्याची मुक्तनगरी का बनावी?

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Goa News on Dainik Gomantak
dainikgomantak.esakal.com