प्रसन्न बर्वे
यज्ञ, याग या गोष्टी म्हटले की, आपल्या डोळ्यांसमोर चार दाढीधारी भगवेधारी एका चौकोनी कुंडात काहीतरी जाळत बसल्याचे सामान्यत: डोळ्यांसमोर येते. पण, मूळ यज्ञसंस्थेमागे असेच विकृत चित्र होते का, तर निश्चितच नाही. वेदकाळात निसर्गचक्राचे, अवकाशाचे, गणिताचे प्रगत ज्ञान असताना त्या लोकांनी स्वीकारलेली पद्धती अवैज्ञानिक असूच शकत नाही. मधल्या काळात त्यावर चढलेली भ्रमाची पुटे दूर करून आताच्या काळाशी सुसंगत बनवणे गरजेचे आहे.
आपली प्राचीन संस्कृती निसर्गाशी खूपच जवळीक साधून होती. निसर्गातून तेवढेच घ्यायचे जेवढे आपल्यासाठी उपयुक्त आहे. निसर्गाने जे अयाचित दिले आहे, त्याबद्दल अनेक मार्गांनी कृतज्ञता व्यक्त करणे हा स्थायिभाव होता.
आपले सर्व सण, व्रतवैकल्ये ही या निसर्गचक्राची अभिव्यक्ती आहेत. आपण काळाच्या ओघात हेच विसरून गेलो आणि निसर्गाला ओरबाडू लागलो. निसर्गचक्राप्रमाणे आपले जीवन न व्यतीत करता, आपल्याला हवा तसा निसर्गाचा वापर करू लागलो. प्रचंड वृक्षतोड, डोंगरांची कापाकापी, रासायनिक खतांचा वापर इतका प्रचंड वाढला की, त्यामुळे निसर्गाचा समतोलच बिघडला. आपण निसर्गाचे काही देणे लागतो, ही भावनाच माणूस विसरून गेला. (Som Yag Yadnya 2023)
निसर्गावर आपणच केलेल्या बलात्कारांचे निर्लज्ज समर्थन करण्यासाठी सर्व निसर्गपूजक विधींना भ्रष्ट केले, त्यांना दूषणे दिली. यातुविधीतून निसर्गाला धन्यवाद देण्यासाठी निर्माण झालेली यज्ञसंस्थाही यातून सुटली नाही.
बळी देणे वगैरे हिंसक यज्ञाला विरोध करताना अहिंसक यज्ञाची पुनर्स्थापनाही करणे टाळले. यज्ञाला कर्मकांडाशी जोडताना पर्यावरण संतुलन, संरक्षण हा त्यामागचा हेतू जाणीवपूर्वक दुर्लक्षिला. समाजाला अंधश्रद्ध बनवणाऱ्या गोष्टी जोपासल्या आणि श्रद्धापूर्वक निसर्ग संवर्धनाच्या सर्व गोष्टी त्याज्य ठरवल्या.
निसर्ग हा माणसाच्या उपभोगासाठी नाही. उलट माणूस हा निसर्गाच्या अनेक घटकांपैकी एक घटक आहे. या सगळ्या निसर्गचक्रावर, व्यवस्थेच्या साखळीवर मानवाचे अस्तित्व अवलंबून आहे, हेच माणूस मान्य करायला तयार होईना.
अगदी, आपल्या घरातले उदाहरणच द्यायचे झाले तर आपण आपल्या घरात हवा शुद्ध राहावी, म्हणून ‘एअरफ्रेशनर’ वापरतो. पण, वातावरणात हवा शुद्ध राहावी म्हणून नैसर्गिक पद्धतींचा अवलंब करत नाही. इतकेच नव्हे तर त्याचे आपल्याला काही पडलेलेही नसते.
विज्ञानातील शोधांनी आपले जीवन सुविधाजनक व सोयीस्कर बनवले आहे, पण हेच शोध निसर्गाचा पर्याय ठरू शकत नाहीत. बांध, बंधारे, धरणे बांधून आपल्याला हवे तसे आपण पाणी वळवू लागलो. पण, हे करताना त्याचा नैसर्गिक प्रवाह बदलून त्यावर अवलंबून असलेली निसर्गसृष्टीच पणाला लावली.
राजकारण आणि विज्ञान यांचा वापर निसर्गाच्या रक्षणासाठी करायचे सोडून त्याच्या विनाशाच्याच योजना आखू लागलो. जे विज्ञानाच्या कक्षेबाहेर आहे त्याचे अस्तित्व नाकारू लागलो. जे राजकारणाच्या सोयीचे नाही, त्याला निष्ठुरपणे संपवू लागलो.
प्रचंड प्रमाणात झालेल्या जंगलतोडीमुळे आपण दुर्मीळ वनस्पती गमावल्या आहेत. आज त्यांची फक्त नावे, उल्लेख व संदर्भ शिल्लक आहेत. यागात आहुती देण्यासाठी म्हणून देण्यासाठी ‘सोम’ ही वनस्पती वेदकाळातही फार दुर्मीळ होती.
या अशा वनस्पतींचे औषधी महत्त्व, निसर्गचक्रातील घटकांसाठी असलेले महत्त्व आपण आधुनिक काळातील वैज्ञानिक कसोट्यांवर, संशोधनावर तपासून समोर आणले नाही. आपल्या परसदारी असलेल्या वनस्पतींची लागवड आपण बंद केली. सहज व विनामूल्य उपलब्ध असणाऱ्या वनस्पती आपण ‘आयुर्वेदिक’ नावाचे लेबल चिकटवलेल्या बाटलीतून भरमसाठ किमतीला विकत घेऊ लागलो.
आपल्याकडे जे चांगले आणि जतन करण्यासारखे ज्ञान होते ते आपण ते आपण आधुनिक कसोटीवर घासून पाहिले नाही. फक्त आणि फक्त त्यावर टीका करत राहिलो. यज्ञ म्हणजे केवळ चार लोकांनी कापट्या जाळून केलेली तुपाची नासाडी नव्हे.
वैदिक यज्ञसंस्था प्राचीन भारतातील निसर्गचक्राच्या आणि मानवी जीवनाच्या जवळपास प्रत्येक अंगांना स्पर्श करीत असल्यामुळे भारताचा नैसर्गिक, सामाजिक व सांस्कृतिक इतिहास समजून घेण्यासाठी यज्ञसंस्थेचा अभ्यास करणे आवश्यक आहे. व्याप्ती, वैविध्य, हेतू अशा दृष्टींनी यज्ञाच्या तोडीचा विधी जगात अन्यत्र कोठेही आढळत नाही, यावरून यज्ञयागांचे महत्त्व व मोठेपण अधोरेखित होते.
आपण विज्ञाननिष्ठ आहोत हे सिद्ध करण्यासाठी प्राचीन संस्कृतीतील प्रत्येक चांगल्या व उदात्त गोष्टींना विरोध केलाच पाहिजे ही धारणाच मुळात चुकीची आहे.
आजच्या काळातही पर्यावरण संतुलनाच्या मूळ हेतूला अनुसरून कुणी यज्ञयाग करत असेल तर त्याला विरोध करणे, अवैज्ञानिक किंवा प्रतिगामी ठरवणेही योग्य होणार नाही. त्याचबरोबर विज्ञानाच्या निकषांवर मूळ हेतूसह यज्ञयागांना पडताळून त्यांचे वैज्ञानिक निष्कर्ष स्वीकारणेही तितकेच आवश्यक आहे.
दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा
Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.