Nagesh Karmali: एक न विझणारे यज्ञकुंड

कोकणी चळवळीचे एक खंदे कार्यकर्ते, कवी आणि स्वातंत्र्यसैनिक नागेश करमली यांनी काल 90व्या वर्षी या गोमंतभूमीत शेवटचा श्वास घेतला.
Nagesh Karmali
Nagesh KarmaliDainik Gomantak
Published on
Updated on

Nagesh Karmali: कोकणी चळवळीचे एक खंदे कार्यकर्ते, कवी आणि स्वातंत्र्यसैनिक नागेश करमली यांनी काल 90व्या वर्षी या गोमंतभूमीत शेवटचा श्वास घेतला. चार दिवसांपूर्वीच 5 फेब्रुवारी रोजी त्यांनी 91व्या वर्षात पदार्पण केले होते.

या आठवड्यात सर्वप्रथम मुंबईस्थित जयमाला दणायत या साहित्य अकादमीच्या अनुवाद पुरस्कारप्राप्त कोकणी लेखिका आणि त्यानंतर ज्येष्ठ कोकणी कार्यकर्ते नारायण मावजो यांनी जगाचा निरोप घेतला आणि त्यांच्या पाठोपाठ नागेश करमली यांच्या निधनाची बातमी आल्याने संवेदनशील मनाला सुन्न करून गेली.

कोकणी चळवळ ही नुसती चळवळ नव्हती तर ती कोकणी कुटुंबाच्या जीवन मरणाचे स्पंदन होते. त्यामुळे कोकणी चळवळीत ज्या ज्या लोकांनी आपले योगदान दिले ते सर्व हातात हात घेऊन, खांद्याला खांदा लावून एकजुटीने वावरले. म्हणूनच या चळवळीतील प्रत्येक कार्यकर्त्याचे जात, धर्म, ज्येष्ठत्व, श्रेष्ठत्व विसरून एक कोकणी कुटुंब होऊन गेले होते.

Nagesh Karmali
Blog: गोवा : सर्व पापे करण्याची मुक्तनगरी

त्याचमुळे कोकणी समाज एखाद्याच्या सुखाने प्रफुल्लित होत असतो आणि दुःखद घटनेने मलूल होताना दिसतो. आदर्श समाजाचे एक सुंदर उदाहरण म्हणजे कोकणी समाज असे त्याचमुळे म्हणावे लागते.

अशा या समाजाची स्वप्ने रंगवून त्याच्या उभारणीच्या कार्याला आपल्या कृतीतून, आवाजातून आणि कवितेतून योगदान देणारे नागेश करमली होते आणि त्याचमुळे त्यांच्या देहावसानामुळे फक्त गोव्याच्याच खेडोपाड्यातील नव्हे तर महाराष्ट्र, कर्नाटक आणि केरळमधील कोकणी समाज नक्कीच हळहळत असेल.

आजच्या पिढीस बहुतेक नागेश करमली यांच्या कार्याची कल्पना नसेल. पण, आज साहित्य आणि चळवळीतून पुढे येऊन ज्यांनी आपले कर्तृत्व सिद्ध केले आहे त्यांच्या घडणीत नागेश करमली यांचा महत्त्वाचा हातभार आहे. कारण करमलींनी गोव्याच्या मुक्तीसाठी योगदान दिले, त्यांनी क्रांतीची पताका उंच धरली, त्यांनी कोकणीसाठी आपले संपूर्ण आयुष्य वेचतानाच त्या भाषेतून उच्च प्रतीची काव्य रचना केली.

ते करतानाच आपल्यानंतरची पिढी त्यांच्याच मार्गाने पुढे यावी हे ध्येय मनात बाळगून त्याच्या हातास लागलेल्या प्रत्येक युवकास दीक्षा दिली. ते युवक गोव्यासाठी, कोकणीसाठी योगदान देतानाच आपलेही जीवन घडवतील याकडे कटाक्षाने लक्ष दिले. म्हणूनच कोकणी चळवळीतील तीन पिढ्या त्यांना ‘भाऊ’ म्हणत, आदराने त्यांच्यासमोर नतमस्तक झालेल्या आहेत.

नागेश करमली यांची पहिली भेट झाली ती 1975च्या काळात. कोकणी चळवळीत आणि कवितेत उमेदवारी करताना झालेल्या ओळखीचे नंतरच्या काळात घनिष्ठ संबंधांत रूपांतर झाले. गेली 48 वर्षे हा संबंध त्यांच्या अखेरपर्यंत घनिष्ठच राहिला. या काळात त्यांनी आपल्या घराला एका गुरुकुलाचे रूप दिले होते.

कोकणी चळवळीच्या दिशा ठरवल्या जायच्या, कवितेचे वाचन आणि रसग्रहण, समीक्षात्मक आस्वाद घेण्याचे अग्निहोत्र त्यांच्या घरात कायम सुरू असायचे. करमली आरंभीच्या काळात पणजीतील मळा भागात राहायचे. त्यांच्या त्या दोन खोल्यांच्या लहानशा घरात त्यांची दोन मुले आणि शिक्षिका असलेल्या त्यांच्या पत्नी असे एक आटोपशीर कुटुंब कित्येक काळ वावरले.

Nagesh Karmali
Som Yag Yadnya 2023 : सण, व्रतवैकल्ये निसर्गचक्राची अभिव्यक्ती, अखंड सुरु ठेवू यज्ञयाग...

धड बसण्यास जागा नसूनही त्यांच्या बैठकीच्या खोलीत गोवा आणि गोव्याबाहेरचे कित्येक साहित्यिक येऊन चहा-जेवणाचा आस्वाद घेऊन गेलेले आहेत. त्यांच्याशी कवितेवर चर्चा करताना आणि काव्यवाचन करताना रंगलेले आहेत. कवी रमेश वेळुस्कर, पुंडलीक नायक, प्रकाश पाडगावकर, चित्रकार, लेखक आणि नाट्यदिग्दर्शक दिगंबर सिंगबाळ यांसारखे नंतरच्या काळातील दिग्गज त्या काळात करमलींच्या त्या घरात त्यांच्या मार्गदर्शनाखाली घडत होते.

कवित्व काय असते, साहित्य काय असते आणि साहित्याचा दर्जा राखण्यासाठी वाचन किती महत्वाचे असते यावर सातत्याने त्या घरात चर्चा चालायची. करमली हे सर्वांसाठी भाऊ झाले आणि त्यांच्या धर्मपत्नी मोहिनी भाभी. या कुटुंबाने त्या काळात कोकणी चळवळीतील कित्येक युवक युवतींना आपल्या मायेची पाखर घालून सावरलेले आहे. मी त्या कुटुंबाचा घटक होण्याचा तोच काळ होता.

नागेश करमली यांचा जन्म 5 फेब्रुवारी 1933रोजी झाला. त्यांचा जन्म केपे तालुक्यातील काकोडे या गावात झाला आणि त्यांचे प्राथमिक शिक्षण मराठी, तसेच पोर्तुगीजमधून झाले. उच्चशिक्षण घेण्याची त्यांच्या घरची परिस्थिती नव्हती. तरी त्यांना साहित्याची आवड होती. त्याच भागात त्या काळी बा. भ. बोरकर शाळेत शिकवायचे. त्यांच्याशी त्यांची ओळख झाली आणि त्यांनीच करमलींना साहित्याची आणि वाचनाची गोडी लावली.

त्यांच्या मार्गदर्शनामुळे त्यांना कोकणी भाषेचे महत्त्व कळून चुकले. कोकणीचे महापुरुष शणै गोंयबाब यांचे साहित्य वाचून त्यांना कोकणीचा साक्षात्कार झाला आणि त्यांनी कोकणीच्या कार्यास आरंभ केला. तो काळ पोर्तुगीजकालीन 1952 चा होता. पोर्तुगीज सत्तेचे आपण गुलाम आहोत आणि त्यातून मुक्त होण्यासाठी लढा देण्याची आवश्यकता आहे, याची कल्पना त्यांना याच वयात आली.

त्या काळात त्यांची भेट बाकीबाब बोरकर आणि टोनी द सौझसारख्या स्वातंत्र्यसैनिकांशी झालीच होती. ते दक्षिण गोव्यात राष्ट्रीय काँग्रेस-गोंय संघटनेच्या अंतर्गत गोवा मुक्ती चळवळीचा प्रचार करायला लागले. भूमिगत कार्य करताना 16 सप्टेंबर 1954 रोजी त्यांना अटक झाली आणि लष्करी न्यायालयाने त्यांना 10 वर्षे सश्रम कारावास आणि 15 वर्षांसाठी त्यांचे राजकीय हक्क काढून घेण्यात आले.

रेईश मागुश तुरुंगात असताना त्यांनी कोकणीचे कार्य चालूच ठेवले. त्यांनी तुरुंगात स्वातंत्र्यसैनिकांचे अभ्यास मंडळ स्थापन केले. ‘जोत’ नावाचे साहित्यिक हस्तलिखित नियतकालिक सुरू केले. चार वर्षे आणि आठ महिने शिक्षा भोगल्यानंतर त्यांची 17 मे 1959रोजी सुटका झाली. तरी गोवा मुक्तीपर्यंत त्यांनी वेगवेगळ्या चळवळीत आपले योगदान सुरूच ठेवले.

Nagesh Karmali
School Education: पायाभूत शिक्षण : शालेय शिक्षणाचा कणा

गोवा मुक्तीनंतर त्यांना खाण उद्योगात नोकरी करावी लागली. त्याच काळात त्यांची विचारसरणी कम्युनिझमकडे वळली आणि डाव्या विचारसरणीचा पगडा त्यांच्या मनात खोलवर रुजला. त्यांनी 1962साली कामगार चळवळीत भाग घेतला. कामगारांच्या न्यायासाठी लढा सुरू केला. नंतरच्या काळात ती नोकरी सोडून ते 1966 साली पणजी आकाशवाणीवर ‘स्टाफ आर्टिस्ट’ म्हणून रुजू झाले.

आकाशवाणीवर त्यांच्या कवी मनाला आणि साहित्यिक वृत्तीला खतपाणी मिळाले. ते जरी सरकारी नोकरी करत असले आणि त्यांच्यावर लालफितीतील बंधने आली तरी त्यांचा मुळचा चळवळ्या स्वभाव काही त्यांना स्वस्थ बसायला देत नव्हता. नोकरी आणि सरकारी बंधनाच्या चौकटीत राहून त्यांनी कोकणीचे कार्य चालूच ठेवले.

त्याकाळी मनोरंजनाची आणि अभिव्यक्तीची साधने मर्यादित होती. काही दैनिके आणि आकाशवाणीच्या माध्यमातून विचार समाजापर्यंत जात होते. अधिकतर लोक अशिक्षित असल्याने त्यांना आकाशवाणीसारख्या श्राव्य माध्यमावर अवलंबून राहावे लागायचे. करमली यांनी त्या संधीचा फायदा घेतला.

आकाशवाणी जरी निरनिराळ्या भाषांसाठी होती, तरी माध्यमाची भाषा म्हणजे लोकभाषा कोकणी होती. त्याच भाषेला प्राधान्य होते. त्याचाच फायदा उठवत त्यांनी कोकणी लेखक कवींना आकाशवाणीवरून अभिव्यक्त होण्याची संधी दिली.

खेड्यापाड्यातून कित्येक सर्जनशील कवी लेखक त्यांनी कोकणीतून पुढे आणले. कोकणी चळवळ गावोगावी नेण्याचे त्यांचे हे कार्य अत्यंत महत्त्वाचे होते. ते आकाशवाणीवर नसते तर कोकणी सर्वसामान्य लोकांपर्यंत पोहोचणे शक्य नव्हते.

कोकणीची चळवळ जरी राजकीय होती आणि सरकारी नोकरांना त्या चळवळीपासून चार हात दूर राहावे लागायचे, तरी करमलींनी साहित्याचा आधार घेऊन साहित्यिक चळवळ पुढे नेली. त्यांनी आपल्या कल्पक डोक्यातून ‘लळितक’ हा कार्यक्रम सुरू केला. निवडक लेखक कवींना घेऊन ते गोवाभर फिरले. गावागावांतून हा ‘लळितक’चा कार्यक्रम सादर केला.

ज्यांची नावे आपण रेडिओवर ऐकत असतो त्यांना प्रत्यक्ष पाहणे म्हणजे गावातल्या लोकांसाठी एक वेगळाच अनुभव होता. शिवाय त्या कार्यक्रमात स्थानिक कवींनाही सहभाग घ्यायला मिळायचा आणि त्यांची नावे दुसऱ्या दिवशी वृत्तपत्रातून वाचायला मिळायची.

त्यामुळे हा कार्यक्रम म्हणजे चळवळीचा भागच झाला आणि कित्येक युवा कोकणी चळवळीत सहभागी झाले. त्यातले आज कित्येकजण लेखक होऊन साहित्य अकादमीचा पुरस्कार पटकावू शकले.

नागेश करमली हे उत्तम अनुवादक होते. त्यांनी इतर भाषांतील कित्येक नाटके कोकणीत आणून त्यांचे सादरीकरण नाट्यस्पर्धेत झालेले आहे. त्यांनी खलील जिब्रान कोकणीत आणलेला आहे. ते स्वतः कवी असल्याने त्यांच्या कविता काव्यरसिकांना भुलवत राहिल्या. त्यांच्या पाच कविता संग्रहातल्या ‘वंशकुळाचें देणें’ या काव्य संग्रहास साहित्य अकादमीने पुरस्कार देऊन करमलींना राष्ट्रीय कवी म्हणून मान्यता दिली.

Nagesh Karmali
Mahadayi River: म्हादईबाबत न्यायालयीन नव्हे, राजकीय तोडगा हाच उपाय

करमली यांनी आपले संपूर्ण जीवन कोकणी भाषा, तिचा विकास, कोकणी साहित्य, कविता, वाचन आणि गझल या काव्य प्रकाराची कोकणीस ओळख देऊन कोकणी गझलांची निर्मिती केलेली आहे. कोकणीच नव्हे तर करमली मराठी, पोर्तुगीज, हिंदी, इंग्रजी या भाषांतील दर्जेदार पुस्तके आणून त्यांचे वाचन करायचे आणि आमच्यासारख्यांना वाचनास उद्युक्त करायचे.

त्यांच्याकडे पुस्तकांचा प्रचंड साठा आहे आणि आजपर्यंत कोकणीत जेवढी पुस्तके प्रकाशित झालेली आहेत, ती सर्वच्या सर्व त्यांच्या वाचनालयात आहेत. असे हे वाचस्पती आणि पुस्तकप्रेमी म्हणजे गोव्यातील एक आश्चर्यच म्हणावे लागेल.

गेल्या 48 वर्षांचा त्यांचा सहवास माझ्यासारख्या कित्येकांना लाभला आणि त्यांनी आम्हा लोकांना आपल्या घरकुलातून दीक्षा देऊन समाजात पाठवले. करमली आज जरी नसले तरी त्यांचे कार्य नक्कीच प्रेरणादायक आहे आणि त्यांच्या मुशीत आमच्यासारखे जे कोणी अव्वल सोने होऊन बाहेर आले ते पुढच्या काळात गोव्याच्या संरक्षणार्थ त्यांच्या प्रेरणेतून कार्यरत असतील यात शंकाच नाही.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
var bottom_sticky_ad = googletag .sizeMapping() .addSize([1000, 0], [[728, 90]]) .addSize( [0, 0], [ [320, 50], [300, 50], [320, 100] ] )         .build()
Goa News on Dainik Gomantak
dainikgomantak.esakal.com