Education And Stress: शिक्षण जीवघेणे नको, जीवनदायी हवे!

मुलांच्या मानसिक तणावाची दखल घेत आपल्या राज्यात शाळांना मिळालेल्या समुपदेशकांची जबाबदारी या बाबतीत खूप मोठी आहे.
Classroom
ClassroomDainik Gomantak
Published on
Updated on

नारायण भास्कर देसाई

Education And Stress In Student शालेय शिक्षणाचा काळ हा बराचसा अनुकरणाचा, अनुभव आणि आनंद घेण्याचा, आकांक्षा रुजवण्याचा! नवनवीन गोष्टी जाणून घेण्याची उत्सुकता वा कुतूहल, जिज्ञासा, काही ना काही करून पाहाण्याचा.

उत्साह, स्वतःला घडवण्याचे प्रयत्न आणि स्वतःची ओळख तयार करण्याची धडपड हे सारे शाळेच्या माध्यमातून, वय वर्षे पाच-सहा ते पंधरा-सोळा या दहा वर्षांच्या काळात सर्वसाधारणपणे अपेक्षित असते.

या काळात शाळेत शिक्षक आणि घरी पालक वा कुटुंबीय मुलांसाठी बरेच काही करतात. त्यातून व्यक्ती म्हणून मुलाचा विकास व्हावा आणि जीवनातील प्रगतीच्या वाटा मुलाला उपलब्ध व्हाव्यात हाच प्रयत्न असतो. मात्र, हे करताना मुलांच्या मनाचा आणि देहाचा, शारीरिक आणि मानसिक स्वास्थ्याचा विचार दुर्लक्षित होतो की काय, अशी शंका वास्तवाकडे पाहिल्यावर येते.

गेल्या आठवड्यात एक बातमी वाचली – ती होती शाळकरी मुलीच्या वर्गात बसल्या ठिकाणी हृदयविकाराच्या झटक्याने झालेल्या मृत्यूची आणि त्या अनुषंगाने चर्चित, विद्यार्थीवर्गातील ताणतणावाच्या प्रमाणाची. मुलीचे वडील स्वतः महाविद्यालयीन शिक्षक म्हणजे सुशिक्षित, उच्चशिक्षित आणि प्रशिक्षित.

त्यांच्या मुलीच्या बाबतीत घडलेल्या या अनपेक्षित, धक्कादायक घटनेमुळे त्या बातमीतून समोर आलेल्या बाबी म्हणजे मुलांचा सगळा वेळ केवळ अभ्यासात जाणे. शाळेत सात तास, शिकवणी वर्गात तीन-चार तास आणि या दोन्हीकडच्या गृहपाठात किमान चार-पाच तास मिळून एकूण पंधरा तास.

दिवसभरातील बाकी वेळ घर ते शाळा, शाळा ते क्लास आणि क्लास ते घर या प्रवासात आणि देहधर्माच्या अपरिहार्य गरजांमध्‍ये. मग स्वतःसाठी, आपले छंद, आवडी यांच्यासाठी, घरच्यांसोबत घालवण्यासाठी वेळ कुठून आणायचा? समवयस्क वा मित्र-मैत्रिणींसोबत काही विरंगुळा, मौजमजा, शरीरस्वास्थ्य, मनोरंजन यातले काही करायला फुरसत कुठे मिळणार?

ही घटना केवळ अपवाद वा अपघात म्हणून दृष्टिआड करता येत नाही. कारण वाढत्या मुलांच्या वर्तनविषयक समस्या, मानसिक स्वास्थ्य आणि शिक्षण, व्यक्तिविकास, जीवनदृष्टी यांचा जवळचा संबंध आहे. शिक्षणातून नक्की काय साधायचे आहे, याबाबतची स्पष्टता पालकांच्यात असणे आवश्यक आहे.

आपल्या भोवतीच्या मध्यमवर्गीय व निम्न-मध्यमवर्गीय पालकांना आपल्या मुलांच्या करिअरची चिंता नको तितकी सतावते आणि त्यातून वाढत्या वयातील विद्यार्थ्यांच्या डोक्यावरील अपेक्षांचे ओझे वाढत जाते.

मुलाला शाळा प्रतिष्ठित, ‘चांगली’ हवी; क्लास पण ‘यशा’ची हमी देणारे हवेत आणि एकूण शिक्षण हे उत्तम ‘उज्ज्वल भविष्या’ची खात्री देणारे व्हावे यासाठी सगळा आटापिटा पालक करताना दिसतात. पण, या साऱ्यात शिकणाऱ्या मुलाला काय हवे याचा विचार किती होतो, त्याचे अंतर्मन काय सांगते याचा अंदाज कोण आणि किती प्रमाणात घेतात, हा प्रश्नच आहे.

Classroom
Bharatanatyam- Dance Form: प्रतिभासंपन्न अंकिता

ताणतणावामुळे आत्मघाताची प्रवृत्ती वाढणे हे शाळकरी वयात अनपेक्षित, धक्कादायक आहे. राष्ट्रीय अपराध रिकॉर्ड ब्युरोच्या आकडेवारीनुसार २०२१ साली विद्यार्थ्यांमधील आत्महत्यांची रोजची सरासरी ३५च्या वर होती. अर्थात हा कोविड काळ होता हे गृहीत धरले तरी वर्षाकाठी तेरा हजार युवा आपले जीवन संपवतात हे खचितच क्लेशकारक आणि भयावह आहे.

त्या आधीच्या काळातही हे प्रमाण १८ ते ३० वर्षे या शिक्षण आणि अर्थार्जन यांच्या सीमारेषेवरील काळात एकूण आत्महत्यांच्या पस्तीस टक्के होते आणि १८-४५ या वयोगटात हे प्रमाण एकूण ६७ टक्के होते. म्हणजेच शिक्षण घेताना ते पूर्ण केल्यावर आणि त्याच्या आधारे स्थिरस्थावर होण्याच्या काळात नैराश्य, हतबलता, पराभूतता याने पीडित होणाऱ्यांची ही संख्या एका अर्थाने शिक्षण प्रक्रियेवरील मूक भाष्यच ठरते.

एका अभ्यासानुसार, भारतात आत्महत्यांचे प्रमाण सर्वांत जास्त (३८ टक्के) दिसते ते १५ ते २९ वर्षे या वयोगटात म्हणजेच शिक्षण आणि करिअर यांच्या प्रचंड दबावाच्या काळात. तथाकथित प्रतिष्ठित, उज्ज्वल यशाच्या कंत्राटी संस्था आणि केंद्रे यांतून तर पालक लाखांच्या खर्चासह आपली अपत्ये जिवानिशी गमावतात, यात आता नावीन्य राहिलेले नाही. याचसाठी शिक्षणातील विविध घटकांनी यावर गंभीर विचार करणे गरजेचे, महत्त्वाचे आणि तातडीचे वाटते.

Classroom
World Watercolor Month: जागतिक जलरंग महिन्याच्या निमित्ताने...

एका शहरी शाळेतील आपल्या वर्गात बसल्या ठिकाणी प्राण सोडलेल्या एका विद्यार्थिनीचा मृत्यू लौकिकार्थाने आत्महत्या ठरत नाही, हे मान्य. पण अखेर शिक्षणातील ताणाचा तो बळी आहे, हे त्या वृत्ताचे सार नाकारता येईल का?

शिक्षणात आपले मूल उत्तम ठरावे यासाठी समोरासमोर वा प्रत्यक्ष शिकवण्यांचा रतीब, ऑनलाईन क्लासेस आणि सतत सूचनांचा, इशाऱ्यांचा आणि छुप्या वा उघड धमक्यांचा मारा मुलांवरील अपेक्षांचे ओझे वाढवतो.

तणाव आणि आत्मवंचनेत भर घालतो, त्यातून मानसिक स्वास्थ्य बिघडते. खरे तर हे स्वयंविकासाऐवजी इतरांना खूष करण्याच्या अट्टहासापायी घडते. याला मुलांपेक्षा मोठेच जास्त कारणीभूत असतात.

शिक्षणाकडे पाहताना पालक, शिक्षक, शाळाप्रमुख यांची दृष्टी केवळ परीक्षेचा निकाल, उपलब्धी, टक्केवारी एवढीच मर्यादित राहिल्यास मुलांचा विचार कमीच होणार, हे निश्चित. मुलांच्या मानसिक तणावाची दखल घेत आपल्या राज्यात शाळांना मिळालेल्या समुपदेशकांची जबाबदारी या बाबतीत खूप मोठी आहे.

Classroom
Mangroves: आता गरज आहे डोळे उघडे ठेवून पावले उचलण्याची...

पण ती एकूण योजना केवळ नावांपुरतीच असल्याचे जाणवते. त्यातून खरे वैयक्तिक प्रश्न आणि त्यांच्यावरील उपाययोजना करणे प्रत्यक्षात घडणे कठीण आहे.

दिवसेंदिवस हे शिक्षण संबंधित ताणतणाव वाढण्यास अनेक बाबी कारणीभूत आहेत, त्यांच्या मुळाशी जाण्याइतका वेळ आठवड्यात दोन दिवसांचे, फार तर बारा तास एका शाळेला देणारे समुपदेशक कुठून आणणार? या बाबतीत शाळाचालक, पालक, शिक्षक यांना जीवन आणि शिक्षण यांच्या संबंधांबाबत जास्त साकल्याने विचार करून कृती कार्यक्रम ठरवावे लागतील.

Classroom
Gomantak Editorial: मागील पानावरून पुढे

जॉन ड्यूई म्हणतो – ‘शिक्षण ही केवळ जीवनाची तयारी नाही, तेच जीवन आहे’. पण आपल्या भोवती शिक्षण हे जीवन ठरण्याऐवजी मरण ठरत गेल्याचे केवळ आत्महत्यांच्या वरील आकडेवारीतून दिसते. अन्य बाबींचा गुंता तर आहेच.

शिक्षण काळातील बाल, किशोर, युवा वर्गाच्या शारीरिक आणि मानसिक स्वास्थ्यविषयक अधिकृत अभ्यासांची स्थानिक पातळीवर तरी वानवाच असल्याने त्याविषयी काही बोलणे उचित ठरणार नाही. पण, शिक्षण संस्थांना आणि समाजालाही या बाबतीत हातावर हात ठेवून स्वस्थ बसता येणार नाही, हे नक्की.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
var bottom_sticky_ad = googletag .sizeMapping() .addSize([1000, 0], [[728, 90]]) .addSize( [0, 0], [ [320, 50], [300, 50], [320, 100] ] )         .build()
Goa News on Dainik Gomantak
dainikgomantak.esakal.com