Goa Politics: विरोधकांची पिछाडीवरुन पीछेहाट

Goa Politics: पोटनिवडणुका ही विरोधकांना चालून आलेली संधी असते. ती ते कशा पद्धतीने घेतात, यावर बरेच काही अवलंबून आहे.
Goa BJP Politics
Goa BJP PoliticsDainik Gomantak

Goa Politics: पोटनिवडणुका ही विरोधकांना चालून आलेली संधी असते. ती ते कशा पद्धतीने घेतात, यावर बरेच काही अवलंबून आहे. राज्यातल्या तिन्हीही जागा भाजपने जिंकल्या असल्या तरी दुसरीकडे विरोधकांची झालेली धूळधाण ही खूपच विदारक मानावी लागेल. लोकशाही प्रणालीमध्ये निवडणुकांना अनन्यसाधारण महत्त्व असते. मात्र, पोटनिवडणुका या सत्तांतर किंवा सत्ता बदलासाठी खूप महत्त्वाच्या नसल्या तरी त्या, त्या स्तरावरील सत्ताधारी सरकारचे काम आणि लोकमानसाचा कानोसा घेण्यासाठी त्या महत्त्वाच्याच आहेत.

बहुतांशवेळा त्या सत्ताधाऱ्यांकडे झुकलेल्याही दिसतात. सत्ताधाऱ्यांनी आपल्या हातातील प्रशासकीय यंत्रणेचा दुरुपयोग करून या पोटनिवडणुका जिंकल्याचा आरोप बऱ्याचदा विरोधक करतात. लोकसभा आणि विधानसभा वगळता स्थानिक स्वराज संस्थांच्या निवडणुका या राज्य पातळीवरचे सरकार हाताळत असल्याने ‘जिसकी लाठी, उसकी भैस’ याप्रमाणे या निवडणुकीवर सत्ताधाऱ्यांचाच अंकुश असतो, असेही अनेकवेळा सिद्ध झाले आहे.

Goa BJP Politics
Konkani Language : कोंकणीत रुजलेले पोर्तुगीज शब्द

राज्यातल्या जिल्हा पंचायतींच्या दवर्ली आणि कुठ्ठाळी या दक्षिण गोव्यातील दोन तर, रेईश-मागूश या उत्तर गोव्यातील एका अशा तीन रिक्त जागांसाठी रविवारी मतदान झाले आणि आज मंगळवारी मतमोजणी झाली. यापैकी दोन जागांवरील यापूर्वीचे जिल्हा पंचायत सदस्य आता आमदार बनले आहेत, तर एका जागेवरील सदस्याने आपल्या पदाचा राजीनामा दिला होता. अपेक्षेप्रमाणे दवर्ली आणि रेईश-मागूश या जागा भाजपने आपल्याकडे राखण्यात यश मिळवले तर कुठ्ठाळीची जागा भाजपचा पाठिंबा असलेल्या अपक्ष उमेदवाराने जिंकली आहे.

राज्यात उत्तर आणि दक्षिण अशा दोन्ही जिल्हा पंचायतींकरिता प्रत्येकी 25, 25 अशा 50 सदस्यांच्या जागा आहेत. 5 जानेवारी 2020 रोजी झालेल्या या निवडणुकीत दोन्ही जिल्हा पंचायती मुख्यमंत्री डॉ. प्रमोद सावंत यांच्या नेतृत्वाखाली भाजप सरकारने मोठ्या फरकाने जिंकल्या होत्या. त्यावेळी उत्तर गोव्यातल्या 25 जागांपैकी भाजपने 19, अपक्ष 5 तर काँग्रेसला केवळ एका जागेवर यश मिळाले होते. त्यामुळे उत्तर गोव्याची जिल्हा पंचायत निवडणूक भाजपने एकतर्फी जिंकली होती, असेच मानावे लागेल.

Goa BJP Politics
Politics: एक डाव माघारीचा!

दक्षिणेची जिल्हा पंचायत भाजपने आपल्याकडे ठेवली असली तरी उत्तरेप्रमाणे दक्षिणेत भाजपला एकतर्फी यश मिळाले नव्हते. तरीही 25 सदस्यांच्या या जिल्हा पंचायतीमध्ये भाजपकडे 14 सदस्य होते. काँग्रेस, मगोप आणि अपक्षांनी प्रत्येकी तीन तर राष्ट्रवादी काँग्रेस आणि आम आदमी पक्षाने प्रत्येकी एक जागा जिंकली होती. एकूणच काय, तर राज्यातील दोन्हीही जिल्हा पंचायतींवर भाजपची सत्ता आहे.

त्यामुळे 2, 3 पोटनिवडणुकांमुळे सत्ताबदलाचा प्रश्‍नच उदभवत नाही. मात्र, दोन वर्षांनंतर या जागा नव्याने कोण जिंकतो, यालाही विशेष महत्त्व होते. अपेक्षेप्रमाणे भाजपने त्या जागा आपल्याकडे खेचून घेतल्या आहेत. पोटनिवडणुकांना वेगळ्या अर्थानेही महत्त्व असते. सत्ताधाऱ्यांच्या कामाचा तो ‘लिटमस पेपर’ असतो तर विरोधकांना आपली ताकद दाखवण्याची चालून आलेली संधी असते.

Goa BJP Politics
Goa: गोव्याची माहिती-तंत्रज्ञान उद्योगासाठी निवड होऊ शकते का?

कोणत्याही सदस्याच्या निधनाने रिक्त झालेल्या जागांवर सहानुभूतीने संबंधितांचे नातेवाईक निवडून येत असले तरी लोकशाही प्रणालीमध्ये याबाबत काही विशेष संकेत नाहीत. त्या केवळ भावनिक पातळीवर लढवल्या जातात आणि मतदारांकडून निवडूनही दिल्या जातात, हा अनुभव आहे. मात्र, अन्य कारणांनी रिक्त झालेल्या जागांवर ती परिस्थिती नसते. राज्यातही आता झालेल्या पोटनिवडणुकांच्या जागा या सदस्यांनी दिलेल्या राजीनाम्यामुळे रिक्त झालेल्या आहेत.

त्यामुळे त्या सरकारने केलेल्या कामामुळे जिंकल्या आहेत, असा सत्ताधाऱ्यांचा दावा मानावा लागेल. पोटनिवडणुका ही विरोधकांना चालून आलेली संधी असते. ती ते कशा पद्धतीने घेतात, यावर बरेच काही अवलंबून आहे. राज्यातल्या तिन्हीही जागा भाजपने जिंकल्या असल्या तरी दुसरीकडे विरोधकांची झालेली धूळधाण ही खूपच विदारक मानावी लागेल.

कारण राज्यात अनेक वर्षे सत्तेत राहिलेल्या काँग्रेसचे उमेदवार हे तिसऱ्या-चौथ्या स्थानावर फेकले गेले आहेत. त्यांची कामगिरी अनामत रक्कम जप्त करण्याइतकी वाईट आहे. 2020 च्या जिल्हा पंचायतींच्या सार्वत्रिक निवडणुकीमध्येही काँग्रेसची कामगिरी चांगली नव्हती. मात्र, नव्याने चालून आलेली पोटनिवडणुकीची संधीही त्यापेक्षा वाईट असावी, हे मात्र भयावह मानावे लागेल.

Goa BJP Politics
Life: ''एक धागा सुखाचा, शंभर धागे दुःखाचे''

2014 च्या लोकसभा निवडणुकांमध्ये पंतप्रधान नरेंद्र मोदी सत्तेवर आले आणि त्यांनी देशातल्या सर्वच निवडणुकांचे निकष बदलून टाकले, असेच मानावे लागेल. निवडणुका लढवणे हे एक विशेष तंत्र आहे आणि ते सध्या भाजपने पुरेपूर आत्मसात केले आहे, अशीच स्थिती आहे. पूर्वीच्या भावनिक आवाहनावरच्या निवडणुका आता राहिलेल्या नाहीत.

त्यासाठी बूथ, पन्ना, (मतदारयादीतील पान) शक्ती कार्यकर्ता इतक्या सूक्ष्म पद्धतीवर भाजपने नेले आहेत आणि त्याच्या सशक्तीकरणाचा अनुभव देशभरातल्या अनेक निवडणुकांमध्ये वारंवार येत आहे. दुसरीकडे विरोधक कोसो दूर विखुरलेले आहेत आणि त्याचा फायदा कसा उठवायचा, हे भाजपने पक्के हेरले आहे. त्याचाच अनुभव या पोटनिवडणुकीत नव्याने आला आहे.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Goa News on Dainik Gomantak
dainikgomantak.esakal.com