Goa Congress Rebel: त्या आठही आमदारांना गोमंतविभूषण पुरस्कार द्यावा!!

Goa Politics: मार्च 2022 मध्ये संपन्न झालेल्या विधानसभा निवडणुकीत गोमंतकीय मतदाराने एक घोडचूक केली होती
Goa Congress Rebel
Goa Congress RebelDainik Gomantak
Published on
Updated on

Goa Congress dispute: मार्च 2022 मध्ये संपन्न झालेल्या विधानसभा निवडणुकीत गोमंतकीय मतदाराने एक घोडचूक केली होती; महाप्रमादच म्हणा ना! तत्पूर्वी दहा वर्षे सत्तेवर असलेल्या भारतीय जनता पक्षाला दणदणीत बहुमत नाकारण्याची ती घोडचूक होती. सेवेचा अभूतपूर्व आलेख उभा करणाऱ्यांची अशी संभावना!! पण नियती उदार असते. ती माणसे मारणाऱ्या वाल्या कोळ्यालाही वाल्मिकी होऊन मुनीपदी जाण्याची संधी देते.

तद्वतच गोमंतकियांच्या महाप्रमादाचे परिमार्जन करण्याची सुवर्णसंधी आज अकल्पितपणे आली. काँग्रेसचे एक-दोन नव्हे तर तब्बल आठ आमदार दाती तृण घेऊन भाजपच्या दारी उभे ठाकले आणि त्यानी गोमंतकीय मतदारांच्या घोडचुकीसाठी प्रायश्‍चित घेतले. आता समस्त गोव्यात पापक्षालनाचा अत्यानंद पसरत असल्याचे आम्हाला दिसते आहे. गोमंतविभुषण या प्रतिष्ठेच्या पुरस्कारासाठी या आठही आमदारांची एकगठ्ठा शिफारस करण्याचा अनावर मोह आम्हाला या क्षणी होतो आहे. बिचारे गेले दोन महिने कोणत्या दिव्यातून जात होते, याची आम्हाला पूर्ण कल्पना आहे.

Goa Congress Rebel
Goa Congress Rebel : काँग्रेस आमदारांच्या भाजप विलिनीकरणाला विधानसभा सभापतींची मंजुरी

दुष्काळातून आलेल्या बुभुक्षितांचे हात-पाय बांधले आणि समोर पंचपक्वान्नांनी वाढलेले ताट ठेवून दिले तर त्यांना ज्या वेदना होतील, तेच हे आठजण सहन करत होते. त्यांचे मतदारसंघ विकासावाचून अक्षरशः तडफडत होते. आपल्या परमप्रिय मतदारांची ती ससेहोलपट या आठहीजणांना सहन होत नव्हती, रात्रीची झोपही पडत नव्हती. अहोरात्र आपल्या मतदारांचा आणि मतदारसंघाच्या विकासाची चिंता सतावत असल्याने बिचाऱ्यांची वजने उतरली आणि पोटे खपाटीला गेली होती.

आज त्यानी उपसलेल्या कष्टांना गोड फळ आले आहे. पाप क्षालनासाठी त्यांनी महालयाचा कालावधी निवडला आहे. गोव्यात याला म्हाळ महिना म्हणतात. ‘गावार म्हाळ आणि सुण्याक बोवाळ’, अशी म्हणही कोकणीत आहे, पण तिचा इथे काहीच संबंध जोडू नये, अशी गोमंतकियांना या आनंदाच्या प्रसंगी विनंती. आठही आमदारांनी लोकशाहीचाच म्हाळ घातल्याची कुत्सिक टीका कुणी करताना दिसते आहे, पण त्याकडे दुर्लक्ष करणेच योग्य ठरेल. विकासाचा ऐरावत डुलत डुलत जातो आहे आणि श्‍वानसंप्रदाय तेवढा भुंकतो आहे, असे म्हणत टीकेकडे गोव्याने दुर्लक्ष करावे आणि आठही जणांना गोमंतभुषण भेटवण्याच्या राज्यव्यापी सोहळ्याच्या तयारीला लागावे.

खांद्यावर भगवा आणि हरित पट्टा ल्यालेल्या या अष्टग्रहांची भाजप कार्यालयात घेतलेली हसरी छबी एव्हाना गोव्यात सर्वदूर गेली असेल. त्या दणकट कतारीमागून स्वर्गीय अटल बिहारी वाजपेयी आणि स्वर्गीय मनोहर पर्रीकर झाकोळल्यासारखे दिसताहेत खरे, पण हयात असते तर आपण घामाकष्टांच्या शिंपणाने वाढवलेला पक्ष अकल्पितपणे इतका सुदृढ झाल्याचे पाहून तेही प्रचंड सुखावले असते. जे निवडणुकीतून साध्य होत नाही, जे मतदाराच्या तुष्टीकरणातून जमत नाही ते केवळ नदगनारायणाच्या दर्शन सोहळ्याच्या आधारे सहजपणे प्राप्त करता येते, हे पाहून कुणाचा हुरूप वाढणार नाही? आठ आमदारांना दुषणे देणाऱ्यांना आता देव-देवतांसमोर घेतलेल्या शपथा आठवत आहेत, हा तर विनोदच झाला. आजकाल देवांनाही समोरच्या भक्ताच्या कलाने घेतल्याशिवाय गत्यंतर नसते. नंगेसे खुदा भी डरता है, याचे स्मरण निंदकांनी ठेवावे.

Goa Congress Rebel
Goa Politics: BJP सोडून काँग्रेसचा हात धरणारे दिगंबर कामत पुन्हा भाजपात

मठग्रामाच्या आमदारांनी तर आपण पावन होण्याआधी आपल्या देवाला राजी करून घेतल्याचे स्पष्ट सांगितले आहे. आपण शपथ घेतलीच नव्हती तर उगाच ओठ हलवत होतो, असे सांगतही आता काहीजण पुढे येतील. भाजप हा गंगेहून पवित्र अशा पक्ष असून त्यात गेल्याने सर्व पापांचे परिशीलन होते, हे तर वेगळे सांगायची आवश्यकताच नाही. आपल्या पापांची नोंद होणार नाही, याची ग्वाही प्रसाद-पाकळीतून मिळवूनच अष्टग्रहांनी ही वाट निवडली आहे. तिच्यामागे असिम त्यागाचे वलय आहे, गोव्याच्या सर्वकालिन कल्याणाचे तेजोमय ध्येय आहे. या आठही जणांसाठी भाजपात कोणती तजवीज केलीय, हे आम्हा पामरांना कळणे कठीण. मंत्रिपदांची संख्या चाळीस असती तर गोव्याचा स्वर्ग बनणेच बाकी राहिले असते, याची जाणिव आम्हाला याक्षणी होते आणि काळीज तीळ तीळ तुटते. काही असो, प्रत्येकाच्या रित्या ओंजळीत वर्षाकाठी किमान आठ आकडी अनुग्रह जावा, याची खातरजमा माननीय मुख्यमंत्र्यांनी करायला हवी. नव्या शिक्षण धोरणाला पुरक अशी पुस्तके अजून छापून झालेली नाहीत. पूर्वप्राथमिक वर्गासाठीची पुस्तके तयार करताना या अष्टग्रहांच्या उदात्त कृतीवर बेतलेला एक धडा त्यात समाविष्ट करावा. त्यातून राजकीय नैतिकतेचा वस्तुपाठ कोवळ्या मनांवर रुजेल आणि भविष्यांत अष्टग्रहांचे अधिक कल्पक अनुकरण करणारे पुढारी गोव्याला मिळतील. आठही जणांचे पुन्हा एकवार अभिष्टचिंतन करून आम्ही पुनश्‍च आम्हाला वाटणाऱ्या अत्यानंदाची नोंद करत आहोत! जय गोवा!!

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
var bottom_sticky_ad = googletag .sizeMapping() .addSize([1000, 0], [[728, 90]]) .addSize( [0, 0], [ [320, 50], [300, 50], [320, 100] ] )         .build()
Goa News on Dainik Gomantak
dainikgomantak.esakal.com