Gomantak Editorial: ध्येयपूर्ती

विजयातील ही सोनेरी किनार मुख्यमंत्र्यांना नक्कीच सुखावणारी आहे.
CM Pramod Sawant
CM Pramod SawantDainik Gomantak
Published on
Updated on

Gomantak Editorial राजकारणात यशापयशाचा खेळ ऊनपावसासारखा सुरू असतो. जेव्हा यश अनपेक्षितरीत्या मिळते तेव्हा बसणारा सुखद धक्का कल्पनेच्या पलीकडचा असतो. परंतु घरच्या मैदानावर फलंदाजी करताना पहिल्याच चेंडूवर त्रिफळा उडतो तेव्हा मिळणारा धक्का काळीज चिरणारा असतो.

नाकासमोरील साखळी नगरपालिकेवर डौलाने फडकणारा विरोधकांचा झेंडा प्रमोद सावंत यांना सातत्याने वाकुल्या दाखवत होता. हे शल्य उरी घेऊनच ते मुख्यमंत्रिपदाचा कारभार हाकत होते.

यावेळी साखळी पालिका निवडणुकीसाठी ते पूर्ण क्षमतेनिशी उतरले होते, त्यांच्या पाठबळावर भाजप समर्थकांनी विरोधकांचा धुव्वा उडवला, इतकेच नव्हे तर विरोधकांचे नेतृत्व करणाऱ्या धर्मेश सगलानींना धूळ चाखायला भाग पाडलेय.

विजयातील ही सोनेरी किनार मुख्यमंत्र्यांना नक्कीच सुखावणारी आहे. फोंडा पालिकेत पुत्र रितेश व रॉय यांच्या विजयाने रवि नाईक याचे राजकीय वजनही नक्कीच वाढेल. साखळीत 12 पैकी 11 व फोंड्यात 15 पैकी 10 जागांवर विजयी पताका फडकवणाऱ्या भाजपचे इथे अभिनंदन करायलाच हवे!

दुसरीकडे लोकशाहीच्या जाणिवा आणि नेणिवा समृद्ध करण्याची विधायक जबाबदारी असलेल्या विरोधकांचे पूर्णतः झालेले पतन शोचनीय आहे. कोणत्याही पक्षाचा एकछत्री अंमल सुरू होतो तेव्हा लोकशाहीची तत्त्वे भेगाळण्यास सुरुवात होते, हा इतिहास आहे.

दोन नगरपालिकांच्या निकालाने बदलती सामाजिक विचारधारा, राजकीय पोत दाखवून दिला आहे. निकालातून समोर आलेले काही पैलू सामाजिक, राजकीय पातळीवरील घटकांना चिंतन करण्यास जरूर भाग पाडतात.

प्रभावी संघटन कौशल्य, पक्षाचा नेमका अजेंडा तळागाळापर्यंत पोहोचविण्याची हातोटी, हुकमाचे ताबेदार अशा पावित्र्यातील कार्यकर्त्यांची मजबूत फळी ही भाजपची बलस्थाने पुन्हा ठळकपणे समोर आली आहेत. विशेष म्हणजे कधीकाळी संघाच्या आधारावर अवलंबून असलेल्या भाजपने निवडणुका जिंकण्याची एक स्वतंत्र यंत्रणाच उभी केली आहे.

साम-दाम-दंड-भेद या आयुधांचा कुशलतेने वापर करून निवडणूकपूर्व प्रतिकूल वारे अनुकूल करण्याची ताकद भाजपने कमावली आहे. रसातळाला गेलेल्या आणि उरल्यासुरल्या कॉंग्रेससाठी तो एक धडा आहे.

अर्थात असे कितीही धडे गिरवले तरी ‘पाटी कोरीच’ राहते, असा कॉंग्रेसविषयी सार्वत्रिक अनुभव आहे आणि त्यात काही फारसा बदल होईल, अशी सुतराम शक्यता नाही.

CM Pramod Sawant
SCO Summit Goa 2023: झक्कास! पाक, चीन, रशियासह SCO देशांचे मंत्री पडले गोव्याच्या खाद्यपदार्थ, संस्कृतीच्या प्रेमात

महागाईने पिचलेल्या आणि पावलापावलांवर स्वत:च्या अस्तित्वासाठी संघर्ष करणाऱ्या लोकांनीही मतदान प्रक्रियेकडे गांभीर्याने पाहणे सोडून दिले आहे. विचारधारा, मूल्यांऐवजी उगवत्या सूर्याला नमस्कार करण्यात हित असल्याची जाणीव प्रबळ बनते आहे.

सावंत यांच्या मुख्यमंत्रिपदाच्या चार वर्षांच्या कार्यकाळात, दोन टर्ममध्ये मिळून कॉंग्रेसचे 18 आमदार भाजपवासी झाले, हेदेखील त्याचेच द्योतक. सत्तेतील पक्षाला स्थानिक स्वराज्य संस्थांमध्ये मिळणाऱ्या यशाचे गमक त्यातच आहे. आठ महिन्यांपूर्वी झालेल्या जिल्हा पंचायत पोटनिवडणुकीतही तोच अनुभव आला.

सध्या 13 पालिकांपैकी कुंकळ्ळी वगळता १२ पालिका भाजपच्या आधिपत्याखाली आहेत. कुंकळ्ळीत युरी आलेमाव यांची मजबूत पकड भाजपला भेदता आलेली नाही.

मडगावी नगराध्यक्ष निवड प्रक्रियेत स्वकीयांच्या दग्याने तोंड पोळलेल्या भाजपने गुप्त पद्धतीने मतदान करण्याचा लोकशाहीचा मूलाधार नष्ट करून हात उंचावून मतदान करण्याची पद्धत वटहुकमाद्वारे प्रचलित केली, हे मतदारांनाही चांगलेच ठाऊक आहे.

CM Pramod Sawant
Agriculture News: माड बागायतीत 'श्री' पद्धतीच्या शेतीचा प्रयोग यशस्वी

विधानसभा निवडणुकीत भाजपविरोधात मतदान केलेल्या अनेक घटकांना प्रतिशोधाचा फटका बसला होता. ‘पुढच्याला ठेच, मागचा शहाणा’ म्हणत लोकांनी सत्तेला मुजरा केला.

धर्मेश सगलानी यांचा तसा दावाही आहे. अर्थात मुख्यमंत्री म्हणून सावंत यांनी समाजोपयोगी योजनांद्वारे स्वतंत्र ठसा उमटवला आहे, हे नाकारता येणार नाही.

सरकारच्या दुसरी टर्म सुरू होऊन आताच कुठे वर्ष झाले आहे. लोक विरोधात जाण्याची शक्यता कमीच होती. सगलानी यांची प्रचारातही देहबोली आश्‍वासक नव्हती.

तपास यंत्रणांचा ससेमिरा मागे लागल्यानंतर वर्षभर ते राजकारणात फारसे सक्रिय दिसत नव्हते. परंतु त्यांचा पराभव व पॅनलचा ‘सुपडा साफ’ होणे अनपेक्षितच म्हणावे लागेल.

तिसऱ्या निवडून येणाऱ्या रश्मी देसाई ‘जायंट किलर’ ठरल्या. नगराध्यक्षपद महिला राखीव असल्याने त्यांना ‘बक्षीस’ मिळणे स्वाभाविक आहे. फोंड्यातील निकालाने मंत्री रवि नाईक यांना दिलासा मिळाला आहे.

दोन्ही मुलांचे राजकीय उत्थान आणि स्वत:चे वजन आजही कायम असल्याचा संदेश ते देऊ शकले. मंत्रिपद धोक्यात असल्याची वदंता तूर्त तरी थांबेल.

CM Pramod Sawant
Goa Road Accident: वाहनचालकांच्या बेफिकीर वृत्तीमुळेच अपघात

‘रायझिंग फोंडा’ला चार जागा मिळवून देणाऱ्या केतन भाटीकर यांनी नेतृत्वगुणांद्वारे उपयुक्त मूल्यता सिद्ध केली आहे. त्यांच्या दोन उमेदवारांना अवघ्या मतांनी पराभव पत्करावा लागला. भाजपमध्ये जाण्याचा त्यांचा अंतस्थ हेतू आहे, तो लोकसभा निवडणुकीनंतर साध्य होऊ शकतो.

भाजपकडून मंत्रिपद लाभलेल्या सुदिन ढवळीकर यांची तटस्थ भूमिका रविंसाठी फायदेशीर ठरली. पुढील दिवसांत प्रत्यक्ष पालिका कामकाजात नगरसेवक सहभागी होतील. पावसाळा नजीक आला आहे.

भूजल संवर्धनासारखे काम हाती घेऊन लोकप्रतिनिधी या नात्याने नागरी दायित्वाला जागावे. फोंडा व साखळी पालिकांचा निकाल लोकसभेपूर्वी भाजपला सकारात्मक वातावरण निर्माण करणारा ठरला आहे. कॉंग्रेसने आत्मपरीक्षण करण्याची गरज आहे.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Goa News on Dainik Gomantak
dainikgomantak.esakal.com