Master Blaster Sachin Tendulkar सचिन तेंडुलकरने हल्लीच आपला वाढदिवस कोकणातल्या एका समुद्र किनाऱ्यावर, आपल्या कुटूंबीयांसमवेत साजरा केला. सचिन आपला वाढदिवस साजरा करत असताना, जगभर त्याच्या फॅननी देखील वेगवेगळ्या पद्धतीने त्याचा वाढदिवस साजरा केला असेल.
काही वेडेपणाला भावनांची, आपलेपणाची, भक्तीची, निष्ठेची अतिशय सुंदर किनार लाभलेली असते. ह्रदयातून स्फूरणाऱ्या आनंदी भुईनळ्यांनी त्यांचे ते वेडे आकाश व्यापून गेलेले असते.
आपल्या गोव्यातही असा वेडेपणाचा उजळलेला मणी घेऊन सचिनचा वाढदिवस साजरा करणारे अनेकजण असतील पण मडगांव येथील बासील सिल्वेस्टर पिंटो हा त्या सर्व सचिनप्रेमींचा मुकूटमणी असेल.
त्याने ‘हॅपी फिफ्टीएथ बर्थ डे सचिन’ अशी अक्षरे असलेला केक स्वत: कापून सचिनचा वाढदिवस साजरा केला. त्यापूर्वी स्वतः बनवलेल्या 10 लिफाफ्यांमधून त्याने सचिनला वाढदिवसाच्या शुभेच्छा पाठवल्या होत्या. तशाच लिफाफ्यांचा एक सेट त्याने स्वतःला देखील पाठवला होता.
बरोब्बर एका वर्षापूर्वी, सचिनच्या वाढदिनी बासीलला एक अनपेक्षित अशी भेट मिळाली होती. रात्रीचे 1.50 वाजले होते. सचिनचा बालमित्र अनुप कुडचडकर याचा बासीलला फोन आला. अनुप बासीलला फोनवर म्हणला, ‘तुझ्याशी कुणाला तरी बोलायचे आहे.
’ बासील फोन कानाशी लावून होता आणि त्याच्या कानात शब्द आले. ‘हॅलो, मी सचिन बोलतोय!’ आपल्या वाढदिवशी सचिनने बासीलला फोन करुन बासीलला त्यांच्या आयुष्यातली एक उत्तम भेट जणू दिली होती.
आश्चर्य म्हणजे बासीलच्या सचिन प्रेमाची सुरुवात त्याची फलंदाजी पाहून झालेली नाही तर गोलंदाजी पाहून झाली आहे. बासील त्यावेळी 12 वर्षाचा होता पण तो क्षण त्याला अजून आठवतो.
दक्षिण आफ्रिकेविरुद्धची हिरो कप स्पर्धेतली ती उपांत्य फेरी होती. शेवटची ओव्हर होती आणि जिंकण्यासाठी दक्षिण आफ्रिकेला या ओव्हरमध्ये 6 धावांची गरज होती.
ती शेवटची ओव्हर आपल्याला टाकायला मिळावी म्हणून कप्तान अझरुद्दीनकडे सचिन निग्रहाने आर्जव करत होता. शेवटी अझरुद्दीनने बॉल त्याच्या हाती सोपवला आणि आत्मविश्वासाने बॉलिंग करायला आलेल्या सचिनने त्या शेवटच्या ओव्हरमध्ये फक्त तीन धावा दिल्या.
भारत 2 धावांनी ती मॅच जिंकला होता. बासीलच्या हृदयात सचिनबद्दलचे प्रेम त्या क्षणांमध्ये रुजू झाले होते.
बासीलने तेव्हापासून सचिन संबंधी वेगवेगळ्या वस्तू जमवायला सुरुवात केली. त्याच्या बेडरुमच्या भिंती सचिनचे छायाचित्र असलेल्या पोस्टरनी भरुन गेल्या आहेत. त्यात चार वर्षांपूर्वी सचिन आणि त्याच्या झालेल्या भेटीच्या छायाचित्रांचे ‘ब्लो-अप’ केलेले कोलाजही आहे.
सचिनचे छायाचित्र कव्हरवर असलेल्या अनेक भाषांमधली 110 मासिके त्याच्या संग्रही आहेत. सचिन जाहिरात करत असलेल्या अनेक उत्पादनांची कार्डे, सचिनचे चित्र असलेली बॉलपेने त्याच्यापाशी आहेत.
सचिनवर लिहिली गेलेली 27 चरित्रात्मक पुस्तके त्याने जमा केली आहेत. त्यापैकी एका पुस्तकावर सचिनने स्वतः स्वाक्षरी केली आहे.
या व्यतिरिक्त सचिनची प्रतिमा असलेल्या किती गोष्टी त्याच्यापाशी आहेत याचा हिशेब नाही. त्यात टी-शर्ट, गेम सेट, पोस्टकार्ड, तिकीट संग्रह, मोबाईल, उशा अशा सर्व प्रकारच्या वस्तूंचा समावेश आहे. सचिनवरच्या लेखांची वर्तनामपत्रीय कात्रणे तर तो जपून ठेवतच असतो.
त्याची अशी इच्छा आहे की सचिनच्या विषयावर त्याने गोळा केलेल्या प्रत्येक पुस्तकावर सचिनने स्वाक्षरी करावी व सचिनच्या किमान 100 स्वाक्षऱ्या त्याच्यापाशी गोळा व्हाव्यात. त्याची आस पाहिल्यास त्याची त्या इच्छेलाही सचिनचे पेन कधीतरी नक्कीच येऊन बिलगेल.
दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा
Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.