मंगेश बोरकर
हल्लीच कुंकळये, म्हार्दोळ येथील श्री गजानन मंदिराच्या 26 व्या वर्धापनदिनी, घोडकिरे भक्ती परंपरा भजन महोत्सवाचे आयोजन करण्यात आले होते.
गोव्यातील भजन परंपरेला वाहून घेतलेले 80 वर्षीय रामदास उर्फ सुरेंद्र बोरकर यांच्या नेतृत्वाखाली, या महोत्सवात बोरी येथील सदगुरू संगीत साधनातर्फे भजनाचा कार्यक्रम सादर करण्यात आला.
या महोत्सवाचे औचित्य साधून डॉ. मधू घोडकिरकर यानी सुरेंद्र बोरकर यांची खास मुलाखत घेतली. बोरकर या वेळी भजनाची व्याख्या सांगताना म्हणाले, ‘देवाची सेवा, आर्त सुरांत देवाची केलेली स्तुती म्हणजे भजन.’
रामदास हे त्यांचे मूळ नाव असले तरी सुरेंद्र या नावाने सुपरिचीत असलेल्या या भजनी कलाकाराचा जन्म 26 जानेवारी 1944 साली बोरी येथे झाला. पाच वर्षाचे असताना त्यानी प्रथम टाळ हातात घेतला व गेल्या 70 वर्षात हजारापेक्षा अधिक भजनी कार्यक्रम त्यानी गोव्यात सादर केले आहेत.
त्यांचे निवासस्थान नवदुर्गा मंदिराच्या जवळच असल्याने व घरातील सर्वच मंडळी भजनात रमणारी असल्याने सुरेंद्रबाबसुद्धा साहजिकच भजनाच्या प्रेमात पडले.
अभ्यास, नोकरी व कौटुंबीक जबाबदारीतील समतोल साधुन, त्यानी आपल्या भजनाचे कार्यक्रम सांगे, पेडणे, काणकोण, मडगाव तसेच गोव्यातील इतर भागातही सातत्याने केले.
1956-57 च्या सुमारास फोंडा येथील कापडी यांच्या घरी त्यांचा भजनाचा प्रथम जाहीर कार्यक्रम झाला हे त्यांना आठवते.
त्यांचे एसएससी पर्यंतचे शिक्षण आल्मेदा हायस्कुलात व महाविद्यालयीन शिक्षण धेंपे महाविद्यालयातुन पुर्ण झाले. पणजी येथील विवेकानंद संगीत विद्यालयातुन पंडित भावे व पंडित देशपांडे यांच्या मार्गदर्शनाखाली त्यांनी शास्त्रीय संगीताचे धडे घेतले.
गोवामुक्तीनंतर गोव्यात अनेक संगीत शिक्षण संस्था सुरु झाल्या. भजनाचा प्रसार मोठ्या प्रमाणात झाला असला व गावोगावी पुरुष व महिलांची भजनी मंडळे स्थापन झाली असली तरी जितेंद्र अभिषेकी, श्रीपाद नेवरेकर, अजीत कडकडे, सुरेश हळदणकर, प्रसाद सावकर यांच्या तोडीचे भजनी कलाकार आज दिसत नाहीत व पुर्वीच्या व आताच्या भजनी प्रस्तुतीमध्ये अनेक फरक जाणवतात असे त्यांचे म्हणणे आहे.
भजनातील भावपूर्णता कुठेतरी हरवली आहे व भजनातील शब्दांपेक्षा वाद्यवृंदाचा आवाज जास्त ऐकु येतो असे त्यांना वाटते. भजन हे आपल्या मर्यादा जपून गायले पाहिजे, तिथे अतिरेक होता कामा नये असा सल्ला ते देतात.
आपल्या भजनी प्रवासात त्यांना नाना शिरगावकर, सोमनाथ च्यारी, वामन पिळगावकर, नंदकुमार पर्वतकर, नरहरी वळवईकर, दत्ताराम वळवईकर, काशिनाथ शिरोडकर यांची साथसंगत व मार्गदर्शन लाभले.
तसेच वेगवेगळ्या भजनी स्पर्धांमध्ये त्याना अनेक पारितोषिके लाभली. त्यांचे १०० पेक्षा जास्त गौरव व सत्कार समारंभ झाले आहेत. 2004 साली, कला अकादमीच्या ‘कलासन्मान पुरस्कारा’ने त्यांना सन्मानित करण्यात आले आहे.
गेल्या वर्षी, सोमनाथबुवा च्यारी स्मृतिप्रित्यर्थ त्यांच्या निवास्थानी तसेच तपोभुमी कुंडई येथे वामनराव बुवा पिळगावकर स्मृतिप्रित्यर्थ त्यांचा सत्कार करण्यात आला.
त्यांची भजनी सेवा, होतकरु विद्यार्थ्यांना मार्गदर्शन करत वयाच्या ८०व्या वर्षी अजुनही अखंडीतपणे सुरु आहे. वर्षभरात अनेक स्पर्धा होतात.
त्यातुन अनेक गुणी भजनी कलाकार गाताना दिसतात. त्यामुळे भविष्यात गोव्यातील भजनी परंपरेला उज्वल भवितव्य असल्याचा विश्वास ते व्यक्त करतात.
दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा
Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.