Bicholim Rice Farming Damaged Due To Post Monsoon Rain
परतीच्या वाटेवर असलेल्या पावसाने कहर केल्याने डिचोलीतील काही भागात भातपीक आडवे झाले असून, भातशेती पीक नासाडीच्या मार्गावर आहे. रात्री उशिरापर्यंत जोरदार पर्जन्यवृष्टी होऊन बोर्डे, मये, पिळगाव आदी भागात काही प्रमाणात भातशेती आडवी झाली आहे. यामुळे बळीराजा हताश तेवढाच चिंताग्रस्त बनला आहे. त्यातच हवामान खात्याने आज ‘यलो अलर्ट’ जाहीर केल्याने शेतकरी पुरते हवालदील झाले आहेत. दुसऱ्याबाजूने गेल्या दोन दिवसांपासून तडाखा दिलेल्या पावसामुळे डिचोलीतील काही भागात भातशेती आडवी झाली असली तरी आतापर्यंत मोठीशी हानी झालेली नाही. मात्र, पुढील दोन-तीन दिवस पावसाचा जोरदार तडाखा बसल्यास भातपीक धोक्यात येऊन मोठी नुकसानी होण्याची शक्यता आहे, असा दावा कृषी खात्याने केला आहे.
दरम्यान, शेतकऱ्यांनी कृषी खात्याच्या अधिकाऱ्यांकडून शेतीची पाहणी करून नासाडीचा अहवाल तयार करण्यात येणार असल्याची माहिती मिळाली आहे. गेल्या सलग दोन दिवसांपासून पावसाने कहर केला असून, काल बुधवारी तर पावसाने रात्रभर तडाखा दिला. कालच्या तुलनेत आज (गुरुवारी) सायंकाळपर्यंत पावसाचा कहर दिसून आला नसला, तरी हवामान ढगाळ होते. पावसाच्या तडाख्यात डिचोलीतील मयेसह काही भागात भातशेती आडवी झाली असून, भातशेती धोक्यात आली आहे. पावसामुळे काही भागात भाताची कापणी, मळणीची कामेही लांबणीवर पडण्याची भिती व्यक्त होत आहे. डिचोली विभागीय कृषी कार्यक्षेत्रात यंदा जवळपास पावणे सहाशे हेक्टर शेतजमीन भात लागवडीखाली आली आहे, अशी माहिती मिळाली आहे.
डिचोलीतील विविध भागातील बहुतेक भातशेती पिकली आहे. पुढील आठवड्यापर्यंत काही भागात कापणी आणि मळणीची कामे सुरू होण्याची चिन्हे आहेत. मात्र, परतीच्या पावसाचा कहर सुरू झाला आहे. त्यामुळे शेतकरी पुरते हताश बनले आहेत. पावसाचा कोप सुरूच राहिल्यास उरल्यासुरल्या आशेवरही पाणी फेरले जाण्याची भीती आहे, अशी खंत शेतकरी व्यक्त करीत आहेत. शेतीची आणखी नासाडी टळण्यासाठी पावसाने एकदाची माघार घ्यावी, असे साकडे सध्या शेतकरी वरुणराजाला अर्थातच पावसाला घालत आहेत.
दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा
Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.