मुंबई : ज्येष्ठ अभिनेत्री मौसमी चटर्जी यांनी आपल्या वैयक्तिक आयुष्यातील अनुभव आणि लग्नाबाबतचे विचार नुकतेच मांडले आहेत. विशेष म्हणजे स्वतःचे लग्न अगदी कमी वयात झाल्यानंतरही त्या आपल्या मुलीला मात्र लग्नाचा निर्णय घाईघाईने न घेण्याचा सल्ला देतात. नातेसंबंध आणि लग्न या दोन वेगळ्या गोष्टी असून, जीवनसाथी निवडताना तरुणींनी स्वतःच्या इच्छा आणि भवितव्याचा विचार करावा, असे मौसमी चटर्जी यांचे मत आहे.
जागरण फिल्म फेस्टिव्हल 2026 मधील संवादादरम्यान मौसमी चटर्जी यांनी मुलगी मेघा मुखर्जीला त्या कोणता सल्ला देतात, याबाबत सांगितले. त्यांच्या मते, एखाद्या व्यक्तीसोबत रिलेशनशिपमध्ये असणे म्हणजे त्याच व्यक्तीसोबत लग्न करणे आवश्यक नाही.
मौसमी यांनी मुलीला आपल्या आयुष्याचे निर्णय केवळ समाज किंवा इतर लोकांच्या अपेक्षांनुसार घेऊ नयेत, असे सांगितले. लग्नाचा निर्णय हा वैयक्तिक असतो आणि त्यासाठी स्वतःच्या आनंदासोबतच भविष्यातील परिस्थितीचाही विचार करणे गरजेचे असल्याचे त्यांनी म्हटले.
आजच्या तरुण पिढीवर सतत काहीतरी सिद्ध करण्याचा दबाव असल्याचेही मौसमी यांनी नमूद केले. इतर लोक काय म्हणतील किंवा आपल्याकडून त्यांच्या काय अपेक्षा आहेत, याचा सतत विचार करत राहिल्यास स्वतःच्या आयुष्यातील आनंद कमी होऊ शकतो, असे त्यांचे म्हणणे आहे.
आपल्या आवडी आणि गरजांना महत्त्व देत आयुष्य जगणे आवश्यक आहे, असा संदेश त्यांनी तरुणांना दिला. मात्र, स्वातंत्र्य म्हणजे कोणत्याही गोष्टीचा अतिरेक नव्हे, तर स्वतःच्या निर्णयांसोबत योग्य समतोल राखणेही तितकेच महत्त्वाचे आहे, असे त्यांनी स्पष्ट केले.
मौसमी चटर्जी यांनी कुटुंबातील स्त्री-पुरुषांच्या भूमिकांवरही भाष्य केले. अनेक कुटुंबांमध्ये मुलींना लग्नानंतर घर सांभाळण्यासाठी तयार केले जाते. घरकाम, कुटुंबाची जबाबदारी आणि सासरच्या अपेक्षा यासाठी मुलींना लहानपणापासून शिकवले जाते. मात्र, मुलांनाही घरातील जबाबदाऱ्या समानपणे पार पाडण्यासाठी तयार केले पाहिजे, अशी भूमिका त्यांनी मांडली. घर आणि नातेसंबंध टिकवण्याची जबाबदारी केवळ महिलांवर असू नये, असेही त्यांनी सांगितले.
स्वतःच्या आयुष्याकडे पाहताना मौसमी यांनी आपणही काही चुका केल्याचे मान्य केले. मात्र, एखादी गोष्ट चुकीची असल्याचे लक्षात आल्यानंतर ती पुन्हा न करण्याचा प्रयत्न केला, असे त्यांनी सांगितले.
त्यांच्या मते, आयुष्यात चुका होणे स्वाभाविक आहे. महत्त्वाचे म्हणजे त्या अनुभवातून धडा घेणे आणि त्याच चुका पुन्हा टाळणे. तरुणांनी स्वतःच्या आयुष्याचे निर्णय घेताना अनुभवातून शिकावे आणि कोणाच्याही दबावाखाली येऊ नये, असा त्यांचा सल्ला आहे.
मौसमी चटर्जी यांचा अभिनय प्रवास अगदी लहान वयात सुरू झाला. 1967 मध्ये प्रदर्शित झालेल्या ‘बालिका बधू’ या बंगाली चित्रपटातून त्यांनी सिनेसृष्टीत पदार्पण केले. त्यानंतर बंगाली तसेच हिंदी चित्रपटसृष्टीत त्यांनी आपली स्वतंत्र ओळख निर्माण केली.
‘अनुराग’, ‘रोटी कपड़ा और मकान’, ‘बेनाम’, ‘स्वर्ग नरक’, ‘मंजिल’, ‘अंगूर’ आणि ‘स्वयंवर’ यांसारख्या चित्रपटांमधून त्यांच्या अभिनयाची दखल घेतली गेली. अमिताभ बच्चन, राजेश खन्ना, धर्मेंद्र, जितेंद्र, विनोद खन्ना आणि संजीव कुमार यांसारख्या लोकप्रिय कलाकारांसोबतही त्यांनी काम केले.
मौसमी चटर्जी यांचे लग्नही त्यांच्या तरुण वयातच झाले होते. हेमंत कुमार यांचे पुत्र जयंत मुखर्जी यांच्यासोबत त्यांचा विवाह झाला. एका जुन्या मुलाखतीत त्यांनी आपल्या लग्नामागची कौटुंबिक पार्श्वभूमी सांगितली होती.
‘बालिका बधू’च्या यशानंतर त्यांच्यासाठी लग्नाचे प्रस्ताव येऊ लागले होते. त्याच काळात त्यांच्या मोठ्या आत्यांची प्रकृती गंभीर होती आणि मौसमी यांच्याशी त्यांचे विशेष भावनिक नाते होते. मौसमी यांचे लग्न पाहण्याची त्यांची इच्छा होती. कुटुंबाने ही इच्छा लक्षात घेऊन लग्नाचा निर्णय घेतला आणि मौसमी यांचा विवाह झाला.स्वतःच्या आयुष्यातील या अनुभवांमुळेच कदाचित आज त्या मुलीला लग्नाचा निर्णय घेताना घाई न करण्याचा आणि स्वतःच्या आनंदाचा विचार करण्याचा सल्ला देताना दिसतात.
दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.