Maharashtra Crime: प्रेमसंबंधातील टोकाचा छळ आणि विश्वासघातामुळे एका 21 वर्षीय तरुण एअर होस्टेसने आपले आयुष्य संपवल्याची धक्कादायक घटना महाराष्ट्रातून समोर आली. ठाणे जिल्ह्यातील कल्याण परिसरात हा संतापजनक प्रकार घडला. प्रेमात मिळालेल्या धक्क्यातून सावरणे कठीण झाल्याने तिने मृत्यूला जवळ करणे पसंत केले. याप्रकरणी कल्याणच्या कोळसेवाडी पोलिसांनी मृत तरुणीच्या माजी प्रियकराविरुद्ध आत्महत्येला प्रवृत्त केल्याच्या आरोपाखाली गुन्हा दाखल केला असून पोलीस आता या प्रकरणाचा सखोल तपास करत आहेत.
दरम्यान, ही दुर्दैवी घटना 28 डिसेंबर 2025 रोजी घडली, जेव्हा या तरुणीचा मृतदेह तिच्या राहत्या घरी गळफास घेतलेल्या अवस्थेत आढळला. घटनेच्या दिवशी एअर होस्टेसच्या आईने तिला वारंवार फोन केला होता, मात्र तिने कोणताही प्रतिसाद दिला नाही. सततच्या दुर्लक्षामुळे काळजी वाटलेल्या आईने शेजाऱ्यांना घरी जाऊन पाहण्यास सांगितले. कल्याण येथील 'अनुसूया निवास' मधील तिच्या घरी जेव्हा शेजाऱ्यांनी धाव घेतली, तेव्हा ती छताच्या हुकला लटकलेल्या अवस्थेत दिसून आली. तिला तातडीने रुक्मिणीबाई रुग्णालयात (Hospital) दाखल करण्यात आले, परंतु तिथे पोहोचण्यापूर्वीच तिची प्राणज्योत मालवली.
पोलिसांनी (Police) या प्रकरणाचा तपास करताना मृत तरुणीचा मोबाईल फोन आणि तिच्या बँक खात्यांचा तांत्रिक तपशील तपासला. या तपासातून अनेक खळबळजनक बाबी समोर आल्या. मृत तरुणी आणि तिचा 23 वर्षीय प्रियकर हे 2020 पासून एकमेकांच्या संपर्कात होते आणि त्यांच्यात घनिष्ठ प्रेमसंबंध होते. मात्र, आरोपीने गेल्या काही काळापासून तिला मानसिक आणि शारीरिकदृष्ट्या खच्ची करण्यास सुरुवात केली होती. त्याने तिला लग्नाचे खोटे आमिष दाखवून तिच्याकडून वेळोवेळी लाखो रुपये उकळले होते. तपासादरम्यान असे दिसून आले की, त्यांच्यातील शेवटचा आर्थिक व्यवहार 16 डिसेंबर 2025 रोजी झाला होता.
केवळ आर्थिक फसवणूकच नाही, तर आरोपीने तिला मानसिकरित्या जेरीस आणले होते. त्याने तिचे काही खाजगी फोटो सार्वजनिक करण्याची धमकी दिली होती आणि नुकतेच त्याने दुसऱ्या एका महिलेशी संबंध जोडले होते. इतकेच नाही तर आरोपी तिला अनेकदा मारहाणही करत असे. पोलिसांना तरुणीच्या मोबाईलमधील चॅट रेकॉर्ड्स आणि तिच्या शरीरावरील जखमांच्या खुणांवरुन या क्रूर छळाचे पुरावे मिळाले आहेत. लग्नास नकार आणि सततच्या धमक्यांमुळे नैराश्यात गेलेल्या या तरुणीने अखेर टोकाचे पाऊल उचलले.
मृत तरुणीच्या आईने दिलेल्या तक्रारीच्या आधारे कोळसेवाडी पोलिसांनी 10 जानेवारी रोजी आरोपी माजी प्रियकराविरुद्ध भारतीय न्याय संहिता (BNS) च्या कलम 108 अंतर्गत आत्महत्येसाठी प्रवृत्त केल्याचा गुन्हा नोंदवला. एका उमद्या तरुणीचा अशा प्रकारे अंत झाल्याने परिसरात हळहळ व्यक्त केली जात असून पोलीस आता आरोपीच्या अटकेसाठी चक्रे फिरवत आहेत.
दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.