नोव्हेंबर 19, 1667 रोजी शिवप्रभूंचा पदस्पर्श गोमंतभूमीला पोर्तुगीजावरील बार्देश स्वारीच्या निमित्ताने झाला. बार्देशवर शिवाजी महाराजांनी (Chhatrapati Shivaji Maharaj) स्वारी का केली, याविषयी मागील रविवारी आपण माहिती घेतली आहे. 19 नोव्हेंबर 1676 रोजी बार्देशमधील कोलवाळ गावातील किल्ला शिवाजी महाराजांनी जिंकून घेतला. कोलवाळ गावांत शिवाजी महाराजांच्या राज्यातील कुडाळ, पेडणे, मणेरी, डिचोली येथील बंडखोर देसाई पोर्तुगीजांच्या आश्रयाला येऊन राहिले होते. शिवाजी महाराजांची स्वारी होणार याचा सुगावा आधीच या देसायाना लागला होता. किल्ल्यात पोर्तुगीजांच्या आश्रयाला रहाणारे देसाई आणि कोलवाळमधील काही श्रीमंत कुटुंबे अगोदरच रेईश मागूश आणि आग्वाद किल्ल्यांच्या आश्रयाला पळालीं. कोलवाळच्या किल्ल्याच्या संरक्षणासाठी असणारे पोर्तुगीज सैन्यही पळून गेले. शिवाजी महाराजांच्या सैन्याला सशस्त्र विरोध केला तो फिरंगी भटांनी म्हणजे पाद्र्यांनी. सतराव्या शतकात फिरंग्यांचे भट म्हणजे पोर्तुगीज पाद्री हे बंदुका हाताळणारे उत्तम निशाणेबाज आहेत अशी मराठा सैनिकांमध्ये ख्याती होती. सशस्त्र विरोध करणाऱ्या चार पाद्रीबुवांचा व्यवस्थित समाचार शिवाजी महाराजांच्या मावळ्यांनी घेतला व त्यांना स्वर्गाचे द्वार उघडून दिले.
कोळवाळ गावात घडलेल्या पाद्री प्रकरणाच्या समकालीन गोव्यातील इंग्रज प्रतिनिधीने दिलेल्या वृत्तांत युद्धात कैद झालेल्या चार पाद्रींना शिवाजी महाराजानी हिंदूधर्म स्वीकारण्यास सांगितले; पाद्रींनी हिंदू धर्मास नकार दिल्यामुळे शिवाजी महाराजांनी चार पाद्र्यांचा शिरच्छेद केला, असा उल्लेख आहे. याशिवाय शिवाजी महाराजांनी बार्देश स्वारी केली ती पोर्तुगीजांच्या हिंदू विरोधी हकूमनाम्यामुळे, असाही उल्लेख इंग्रज प्रतिनिधी करतो. मात्र पोर्तुगीज कागदपत्रात याविषयी एकही उल्लेख मिळत नाही. पोर्तुगीजांच्या इतिहासात त्यांच्या रोमन कॅथोलिक धर्माला कमीपणा येईल अशा कोणत्याही गोष्टीचा उल्लेख कटाक्षाने टाळला जाई. पुढे सन 1738 मध्ये वसई मोहिमेमध्ये मराठ्यांच्या अनेक महत्त्वाच्या व्यक्तींच्या पत्रांमध्ये वसई मोहिमेतील विजयामुळे हिंदू धर्म किंवा महाराष्ट्र धर्म राखला गेला, याचा उल्लेख मिळतो. परंतु पोर्तुगीजांनी वसईच्या पराभवाचे कारण त्यांचे कडवट धार्मिक धोरण होते याचा कुठेही पुसटसा उल्लेख केलेला आढळत नाही. शिवाजी महाराजांच्या बार्देश स्वारीची माहिती संपूर्णपणे पोर्तुगीज संदर्भातून मिळते. बार्देश स्वारीची मराठी कागदपत्रे अजूनपर्यंत उपलब्ध झालेली नाहीत. एकमेव मराठी कागद म्हणजे शिवाजी महाराज आणि पोर्तुगीजांच्या दरम्यान 6 डिसेंबर 1667 रोजी डिचोली येथे झालेल्या तहाचा करारनामा उपलब्ध असून तोही पोर्तुगालच्या पुराभिलेखात आहे.
19 ते 22 नोव्हेंबर दरम्यान शिवाजी महाराजांच्या सैन्याने बार्देशमधून पोर्तुगीजांकडून पुरेपूर वसुली करत शेकडो ख्रिस्ती पुरुष, स्त्रिया आणि मुले आणि जनावरे पकडून कैदी म्हणून ताब्यात घेतले. पोर्तुगीज गव्हर्नरने रेईश मागुश आणि आग्वाद किल्ला सोडून संपूर्ण बार्देश महालाला वाऱ्यावर सोडले होते. 22 नोव्हेंबर रोजी शिवाजी महाराज आपल्या सैन्यासह डिचोली येथे मुक्कामाला गेले. डिचोली हा त्याकाळी त्यांच्या राज्याचा भाग होता. तेथे पोर्तुगीज गव्हर्नरने आपले वकील रामजी शेणवी कोठारी यास शिवाजी महाराजांकडे तहाची बोलणी करण्यास पाठविले. डिचोली येथे शिवाजी महाराज आणि पोर्तुगीज वकील यांच्यात बोलणी होऊन 6 डिसेंबर 1667 रोजी तहाचा मसुदा लिहिला गेला. या तहामध्ये पोर्तुगीजांच्या आश्रयाला आलेल्या लखमसावंत, नार सावंत, केशव नाईक, केशव प्रभु, मलशेणवी या देसायांना पोर्तुगीजांनी हद्दीबाहेर घालवून देण्याचे वचन दिले. तसेच काससुवच्या नदीतील दोन्ही बाजूच्या व्यापाराला संरक्षण देण्याचे मान्य केले. बार्देशमध्ये शिवाजी महाराजांच्या सैन्याने पकडलेले पोर्तुगीजांचे प्रजाजन शेकडो स्त्री- पुरुष, मुलें यांच्या बदल्यात शिवाजी महाराजांनी एक रुपयाही न घेता त्याना पाद्री गोसाल याच्या हवाली केले. या संदर्भात पुढे शिवाजी महाराजांचा पोर्तुगीज चरित्रकार कोस्मी- द- ग्वार्द 'युद्धात कैद केलेल्या स्त्रियांना शिवाजी महाराजांकडून सन्मानाची वागणूक मिळते,' असा उल्लेख करतो. पोर्तुगीजांच्या गोव्यातील सोळाव्या आणि सतराव्या शतकातील इतिहासात एका भारतीय राजाकडून सामाजिक आणि राजकीय कारणासाठी पोर्तुगीजांवर स्वारी होण्याची ती पहिलीच घटना होती.
शिवाजी महाराज डिचोली येथे मुक्कामाला असताना त्यांना पोर्तुगीजांच्या धार्मिक छळाचा आणि लष्करी ताकदीचा अंदाज आला असावा. पोर्तुगीजांना गोव्यातून आता कायमचे हुसकावले पाहिजे असे शिवाजी महाराज म्हणतात याचा उल्लेख समकालीन इंग्रज आणि डचांच्या वृत्तांतामध्ये मिळतो. पोर्तुगीजाना गोव्यातून कायमचे उखडून टाकायचे असेलतर शक्तीपेक्षा युक्तीने कार्यभाग साधणे आवश्यक होते. पोर्तुगीजांचे गोव्यातील समुद्रात असलेले नाविक तळ मजबूत होते. सर्व बाजूंनी पाण्याने वेढलेल्या गोवा बेटावर जमिनीवरून सैन्य घेऊन आक्रमण करणे शक्य नव्हते. त्यासाठी शिवाजी महाराजांनी त्यांच्या गुप्त सैनिकांवर कामगिरी सोपवली. महाराजांचे सैनिक वेगवेगळ्या वेशभूषा व सोंगे धारण करून जुन्या गोव्यात कामाला लागले. महाराज गुप्त सैनिकांवर मोहीम सोपवून परत राजगडावर गेले. गुप्तचर सैनिकांची तयारी पूर्ण झाल्यावर महाराज एका वर्षाने पुन्हा गोव्याकडे येण्यास निघाले. जुन्या गोव्यात गुप्त वेशात वावरणाऱ्या मावळ्यांनी ओहोटीच्या वेळी मांडवी नदीतून चालत जात नदी ओलांडण्याच्या जागा ताब्यांत घेऊन आणि सैन्याने मोठ्या प्रमाणात जुन्या गोव्यात शिरून अचानक पोर्तुगीजावर हल्ला करत गोवा बेट ताब्यात घेण्याचा महाराजांचा विचार निश्चित होता. परंतु कुठेतरी गडबड होऊन जुन्या गोव्यात वर्षभर वावरणारे गुप्त सैनिक पकडले गेले. गव्हर्नर कोंद दी साविसेंती याला गुप्त सैनिकांची बातमी कळताच तो भयंकर हादरला. त्याने शिवाजी महाराजांच्या वकिलास बोलावून रागाने दोन थपडा दिल्या आणि पकडलेल्या सर्व गुप्त सैनिकांस सोडून गोवा बेटाबाहेर घालवून दिले. ही घटना घडली तेव्हा शिवाजी महाराज गोव्याच्या वाटेवर असताना वेंगुर्ला येथे मुक्कामास होते. या घटनेनंतर महाराज नोव्हेंबर १९६८च्या पहिल्या आठवड्यात डिचोली येथे आले. तेथे त्यानी अजून एका मोठ्या योजनेची जय्यत तयारी केली होती. ती तयारी होती कदंब राजांचे कुलदैवत असलेल्या श्री सप्तकोटेश्वर मंदिराच्या पुनर्निर्माणाची. १३ नोव्हेंबर १६६८ रोजी कार्तिक कृष्ण पंचमीच्या दिवशी महाराजांनी सप्तकोटेश्वर मंदिराच्या पुनर्निर्माणास प्रारंभ केला. या दैवताचे मंदिर त्याआधी तिसवाडीतील दिवाडी बेटावर होते. पोर्तुगीजांनी आपल्या धार्मिक हैदोसाचा आरंभ दिवाडी बेटावरील मंदिरांपासून केला होता. कदंब राज्याच्या कुलदैवताला त्याचे वैभव प्राप्त करून देणे हे आपले कर्तव्य मानून तेथील जनतेला पोर्तुगीजांच्या धार्मिक भयाच्या मानसिकतेतून बाहेर काढण्याच्या उद्देशानेच हे पुनर्निर्माणाचे काम महाराजांनी हाती घेतले असावे. बार्देश स्वारी आणि सप्तकोटेश्वर मंदिराचे पुनर्निर्माण या दोन महत्त्वाच्या घटनांमुळे पोर्तुगीजांच्या धार्मिक आणि राजकीय अहंकाराला खऱ्या अर्थाने उतरती कळा लागली.
-सचिन मदगे
दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.