

पणजी: इंडियन सुपर लीग (आयएसएल) फुटबॉल स्पर्धेतील सहा सामने अपराजित असलेल्या एफसी गोवाच्या मागील काही लढतीत सातत्याचा अभाव दिसून आलेला आहे. संघाचे मुख्य प्रशिक्षक मानोलो मार्केझ यांनीही आपल्या संघाने स्वतःच्या कामगिरीवर लक्ष एकवटण्याची गरज प्रतिपादली आहे.
या पार्श्वभूमीवर एफसी गोवा संघ शनिवारी (ता. ४) घरच्या मैदानावर महिनाभरानंतर सामना खेळेल. यावेळी ताकदवान प्रतिस्पर्धी बंगळूर एफसीचे आव्हान त्यांच्यासमोर असेल. सामना फातोर्डा येथील पंडित जवाहरलाल नेहरू स्टेडियमवर खेळला जाईल.
दोन्ही संघांत सध्या फक्त एका गुणाचा फरक आहे. बंगळूर एफसीने सहा लढतीतून तीन विजय, दोन बरोबरी व एका पराभवासह ११ गुणांची नोंद केली आहे. एफसी गोवा संघ मार्च महिन्यातील तिन्ही सामने अवे मैदानावर खेळला आणि सर्व सामने बरोबरीत राहिले. सध्या त्यांचे सहा सामन्यांतून दोन विजय व चार बरोबरींसह १० गुण झाले आहेत.
एफसी गोवा फातोर्ड्यात अखेरचा सामना २६ फेब्रुवारी रोजी स्पोर्टिंग क्लब दिल्लीविरुद्ध खेळला होता व त्यावेळी १-० फरकाने विजयाची नोंद केली होती. आमच्या संघात फक्त दोघेच परदेशी खेळाडू असले तरी दर्जेदार भारतीय खेळाडू आहेत. संघ समतोल आहे, मात्र सदोष नेमबाजी आमच्यासाठी समस्या आहे. संघाला स्वतःच्या कामगिरीवर जास्त लक्ष केंद्रित करणे आवश्यक आहे, असे मार्केझ यांनी सांगितले.
आयुष, ईशान सामन्यातून बाहेर
संघातील हुकमी बचावपटू आयुष छेत्री याला चेन्नईयीन एफसीविरुद्धच्या मागील लढतीत दुखापतग्रस्त झाल्यानंतर इस्पितळात दाखल करावे लागले होते, तो अजून खेळण्यास स्थिर नसून त्याच्यासह आघाडीपटू ईशान पंडिताही जायबंदी आहे.
हे दोघेही बंगळूर एफसीविरुद्धच्या लढतीत अनुपलब्ध असल्याची माहिती मार्केझ यांनी दिली. शस्त्रक्रियेनंतर तंदुरुस्त झालेला मध्यरक्षक मुहम्मद नेमिल संघासोबत सराव करत असून तो चेहऱ्यावरील मास्कसह खेळू शकतो, असेही प्रशिक्षकाने नमूद केले.
दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.