आतापर्यंत दक्षिण भारत आणि गोव्यातील प्रवासावरून या देशात फुटबॉलची आश्वासक गुणवत्ता असल्याचे जाणवले, हे चित्र सकारात्मक आहे. भविष्यात भारत विश्वकरंडक फुटबॉल स्पर्धेत खेळण्याबाबत आशावादी आहे, असे मत फ्रान्सचा माजी आंतरराष्ट्रीय फुटबॉलपटू विकास धोरासू याने सोमवारी व्यक्त केले.
मॉरिशियन-भारतीय वंशाच्या विकासने 2006 मधील विश्वकरंडक स्पर्धेत फ्रान्सचे प्रतिनिधित्व केले, तेव्हा फ्रेंच संघ उपविजेता ठरला होता. क्लब पातळीवर त्याने पॅरिस सेंट जर्मेन, एसी मिलान या प्रमुख संघांचे प्रतिनिधित्व केले आहे. 1999 ते 2006 या कालावधीत तो फ्रान्स फुटबॉल संघातर्फे आंतरराष्ट्रीय फुटबॉल खेळला.
‘‘भारत लवकरच विश्वकरंडक स्पर्धेत खेळू शकतो अथवा ही प्रतिष्ठेची स्पर्धा या देशात होऊ शकते. आतापर्यंत मी दक्षिण भारतात, तसेच गोव्यात प्रवास केला. त्यावेळी या भागात भरपूर मुलगे व मुली फुटबॉल खेळताना मी पाहिले, हे चित्र सकारात्मक आहे,’’ असे विकास म्हणाला म्हणाला.
फ्रेंच भाषा शिक्षण आणि सांस्कृतिक संस्थेने पणजीत आयोजित केलेल्या कार्यक्रमात तो बोलत होता. यावेळी दिग्गज भारतीय फुटबॉलपटू ‘पद्मश्री’ ब्रह्मानंद शंखवाळकर, विकासच्या चरित्राचे प्रकाशक व्हिन्सेंट बर्निए, सॅम्यूएल बेर्थे, अनुराधा वागळे, पुरस्काचे लेखक अनिरुद्ध सेन गुप्ता यांची उपस्थिती होती.
खेळात निश्चितच वंशवाद
आपल्या कारकिर्दीत फ्रान्समधील फुटबॉलमध्ये वंशवादास सामोरे गेल्याची कबुली विकासने दिली. तो म्हणाला, ‘‘आमच्या खेळात वंशवाद प्रचलित असल्याचे मला खेदाने नमूद करावे लागले. सुदैवाने त्याविरोधात खूप लोक लढा देत आहेत आणि साहजिकच आशेचा किरण दिसतोय.’’
दुखापतींवर मात करून कारकीर्द
दुखापतीमुळे आपली कारकीर्द संकटात होती, असे 49 वर्षीय विकासने नमूद केले. ‘‘दुखापतींमुळे माझ्यावर शस्त्रक्रिया झाल्या, पण त्या फुटबॉल प्रेमाच्या आड येणार नाहीत याची दक्षता घेतली. या खेळात यशस्वी होण्यासाठी मानसिकदृष्ट्या कणखर असणे अत्यावश्यक आहे,’’ असे मध्यफळीत खेळलेला माजी फुटबॉलपटू म्हणाला.
युवा दशेत असताना विकासला हर्निया, तसेच पाठदुखीच्या शस्त्रक्रियेस सामोरे जावे लागले होते. गोवा भेटीत त्याने एफसी गोवाच्या 14 वर्षांखालील मुलींच्या संघातील खेळाडूंशी संवाद साधून त्यांना प्रेरित केले.
Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.