Venkatesh Prasad slams Hardik Pandya led Indian Cricket Team:
भारतीय क्रिकेट संघाला रविवारी वेस्ट इंडिज विरुद्ध पाच टी20 सामन्यांच्या मालिकेतील शेवटच्या सामन्यात 8 विकेट्सने लाजिरवाणा पराभव स्विकारावा लागला. या पराभवामुळे भारताने 5 सामन्यांची टी20 मालिकाही 2-3 अशा फरकाने गमावली.
वेस्ट इंडिजविरुद्ध भारताने 2016 नंतर पहिल्यांदाच टी20 मालिका गमावली आहे. तसेच सलग 12 टी20 मालिकांमधील विजयांनंतर भारताला पराभव स्विकाराला लागला आहे. भारताच्या या पराभवानंतर संघव्यवस्थापनावरही मोठ्या प्रमाणात टीका झाली.
भारताचा माजी क्रिकेटपटू वेंकटेश प्रसादने देखील सडकून टीका भारतीय संघावर केली आहे. प्रसादने म्हटले आहे की भारतीय संघाची गेल्या काही काळापासून वनडे आणि टी20 क्रिकेटमधील कामगिरी अत्यंत साधारण राहिली आहे. तसेच त्याने म्हटले आहे की भारतीय संघात विजयाच्या भूकेची आणि जिद्दीची कमतरता आहे.
प्रसादने त्याच्या ट्वीटमध्ये लिहिले आहे की 'मर्यादीत षटकांच्या क्रिकेटमध्ये गेल्या काही काळापासून भारतीय संघ खूपच साधारण राहिला आहे. त्यांना वेस्ट इंडिजने पराभूत केले आहे, जे काही महिन्यांपूर्वी टी20 वर्ल्डकपसाठी पात्र ठरू शकले नव्हते.'
'आपण बांगलादेशविरुद्ध वनडे मालिका पराभूत झालो. आशा आहे की ते मुर्खासारखी विधाने करण्यापेक्षा आत्मपरिक्षण करतील.'
तसेच त्याने काही युजर्सच्या ट्वीटलाही उत्तर देताना भारतीय संघ व्यवस्थापनावर टीका केली आहे.
प्रसादने युजर्सच्या ट्वीटवर उत्तर देताना लिहिले 'फक्त 50 षटकांच्याच नाही, तर वेस्ट इंडिज गेल्या ऑक्टोबर-नोव्हेंबर दरम्यान झालेल्या टी20 वर्ल्डकपसाठीही पात्र ठरू शकले नव्हते.'
'भारतीय संघाला खराब कामगिरी करताना आणि त्यावर प्रक्रियेचे कारण देऊन पडदा टाकताना पाहून वाईट वाटते. आग आणि भूकेची कमतरता आहे आणि आपण भ्रमात जगत आहोत.'
तसेच प्रसादने असेही म्हटले की वर्ल्डकपसाठी नेदरलँड्स, आयर्लंड, झिम्बाब्वे, अफगाणिस्तान असे संघही वेस्ट इंडिजला मागे टाकत पात्र ठरत आहेत. वेस्ट इंडिजला भारतात होणाऱ्या वनडे वर्ल्डकप 2023 स्पर्धेची पात्रता मिळवता आलेली नाही. तसेच 2022 टी20 वर्ल्डकपमध्येही सुपर 12 फेरीसाठी वेस्ट इंडिज संघ पात्र ठरला नव्हता.
तसेच एका युजरने भारतीय टी20 कर्णधार आणि संघ व्यवस्थापनाबद्दल काय मत आहे असे प्रसादला विचारले होते. त्यावर प्रसादने लिहिले की 'ते पराभवासाठी जबाबदार आहेत आणि त्यांना जबाबदार असायला हवे. प्रक्रिया (Process) आणि अशा शब्दांचा आता गैरवापर होत आहे.'
'एमएस (धोनी) याला प्रक्रियेचे महत्त्व कळत होते, पण आता खेळाडू फक्त त्या शब्दाचाच उपयोग करतात. निवड प्रक्रियेत कोणतेही सातत्य नाही. गोष्टी कशाही घडत आहेत.'
54 वर्षीय प्रसादने भारतीय संघाला कौशल्य वाढवण्याची गरज असल्याचेही म्हटले. त्याने लिहिले, 'भारताला कौशल्य विकसीत करण्याची गरज आहे. भूक आणि जिद्दीची कमतरता आहे आणि बऱ्याचदा कर्णधाराला काय करायचे हे कळत नाही. गोलंदाज फलंदाजी करू शकत नाहीत, फलंदाज गोलंदाजी करू शकत नाही.
हे महत्त्वाचे आहे की तुम्ही तुमच्या हो ला हो म्हणणाऱ्या खेळाडूच्या शोधात राहू नये आणि आंधळे होऊन खेळाडूंना पसंती देऊ नये. त्यापेक्षा चांगल्या खेळाडूचा विचार करावा.'
दरम्यान, वेंकटेश प्रसादने पहिल्यांदाच भारतीय संघावर निशाणा साधलेला नाही. त्याने यापूर्वी अनेकदा भारतीय संघ तसेच संघव्यवस्थापनावर टीकास्त्र सोडले आहे.
Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.