Vaibhav Suryavanshi Crying Video IPL 2026: आयपीएलच्या रणधुमाळीत रविवारी (19 एप्रिल) ईडन गार्डन्स मैदानावर कोलकाता नाईट रायडर्स आणि राजस्थान रॉयल्स यांच्यात झालेला सामना क्रिकेट चाहत्यांच्या कायम स्मरणात राहील. मात्र, या सामन्यानंतर विजयाच्या जल्लोषापेक्षा एका 15 वर्षांच्या मुलाच्या आसवांची चर्चा अधिक रंगली. राजस्थान रॉयल्सचा युवा सलामीवीर वैभव सूर्यवंशी याचा एक भावूक व्हिडिओ सोशल मीडियावर तुफान व्हायरल होत असून त्यात तो एकटाच बसून रडताना दिसत आहे. अवघ्या 15 वर्षांच्या या खेळाडूची जिद्द आणि पराभवाचे दुःख पाहून क्रिकेटप्रेमींचे डोळेही पाणावले.
राजस्थानने विजयासाठी दिलेल्या 156 धावांच्या लक्ष्याचा पाठलाग करताना कोलकात्याची स्थिती एकवेळ 85 धावांवर 6 बाद अशी केविलवाणी झाली होती. राजस्थानचा विजय निश्चित मानला जात होता, पण रिंकू सिंह आणि अनुकूल रॉय यांनी सातव्या विकेटसाठी 37 चेंडूत 76 धावांची अभेद्य भागीदारी करत राजस्थानच्या हातातून विजय खेचून आणला. शेवटच्या षटकात पराभव समोर दिसू लागताच डगआऊटमध्ये बसलेला वैभव सूर्यवंशी स्वतःवर नियंत्रण ठेवू शकला नाही. व्हायरल व्हिडिओमध्ये वैभव मैदानात एकटाच बसून कधी टोपीने तोंड लपवताना, तर कधी डोळे पुसताना दिसत आहे. कोलकाता नाईट रायडर्सच्या एका खेळाडूने खिलाडूवृत्ती दाखवत वैभवजवळ जाऊन त्याच्या खांद्यावर हात ठेवत त्याला सावरले, मात्र वैभवचे रडू थांबत नव्हते.
या सामन्यात कोलकात्याचा रिंकू सिंह पुन्हा एकदा आपल्या जुन्या फिनिशरच्या अवतारात परतलेला दिसला. खराब फॉर्ममुळे टीकेचा धनी ठरलेल्या रिंकूने 34 चेंडूत नाबाद 53 धावांची मॅचविनिंग खेळी खेळली. शेवटच्या षटकात 9 धावांची गरज असताना रिंकूने पहिल्या दोन चेंडूवर चौकार ठोकून धावसंख्या बरोबरीवर आणली आणि चौथ्या चेंडूवर षटकार खेचून केकेआरला या हंगामातील पहिला विजय मिळवून दिला. राजस्थानसाठी हा सलग दुसरा पराभव ठरला असून तो पचवणे वैभव सूर्यवंशी सारख्या युवा खेळाडूसाठी कठीण झाले.
केकेआरच्या (KKR) वरुण चक्रवर्ती आणि राजस्थानच्या कार्तिक त्यागी यांनी प्रत्येकी 3 बळी घेत उत्कृष्ट गोलंदाजी केली, परंतु रिंकूच्या झुंजार वृत्तीने बाजी मारली. राजस्थानचा संघ विजयाच्या उंबरठ्यावर असताना पराभूत झाल्यामुळे वैभव सूर्यवंशी ज्या प्रकारे मैदानात कोसळला आणि रडला, त्याने चाहत्यांच्या मनात घर केले आहे. 'हार-जीत हा खेळाचा भाग आहे, पण 15 वर्षांच्या मुलाची ही खेळाप्रती असलेली निष्ठा कौतुकास्पद आहे', अशा प्रतिक्रिया सोशल मीडियावर उमटत आहेत.
दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.