भारतीय क्रिकेट संघाने इंग्लंडविरुद्ध धरमशाला येथे झालेल्या कसोटी मालिकेतील पाचव्या सामन्यात एक डाव आणि 64 धावांनी विजय मिळवला. या विजयासह भारतीय संघाने रोहित शर्माच्या नेतृत्वाखाली मालिकेतही 4-1 अशा फरकाने विजय मिळवला.
महत्त्वाचे म्हणजे या मालिकेतील पहिला सामना गमावल्यानंतर भारतीय संघाने पुनरागमन करत नंतरचे चारही सामने जिंकले आणि मालिका आपल्या नाववर केली.
दरम्यान, या विजयानंतर भारतीय संघाचा प्रशिक्षक राहुल द्रविड आणि कर्णधार रोहित शर्मा यांनी ड्रेसिंग रुममध्ये प्रोत्साहनपर भाष्य केले. याचा व्हिडिओही बीसीसीआयने सोशल मीडियावर शेअर केला आहे.
या व्हिडिओमध्ये सर्व खेळाडू आणि सपोर्ट्स स्टाफ ड्रेसिंग रुममध्ये बसले आहेत. यावेळी द्रविड म्हणाला, 'सर्वात पहिले संघ, खेळाडू, सपोर्ट स्टाफ तुमच्या सर्वांचे एका शानदार मालिकेसाठी अभिनंदन.'
'मालिकेत अनेकदा अशी परिस्थिती आली, ज्यामुळे आपल्याला आव्हान मिळाले, आपल्याला मागे ढकलले, पण आपण पुन्हा पुनरागमन करण्याचा मार्ग शोधला, यातून आपल्याकडे कोणते कौशल्य आहे, आपल्यातली लवचिकता आणि आपली ओळख कळते.
मालिकेत अशी अनेकदा वेळ आली की कदाचीत सामना आपल्या हातून निसटू शकला असता, पण आपल्याला या ड्रेसिंग रुममध्ये नेहमीच असे खेळाडू सापडले, जे मैदानात जाऊन जबाबदारी घेऊन खेळतील आणि सामन्याला वेगळे वळण देतील. मला वाटते ते विशेष होते.'
द्रविड पुढे या मालिकेतून खूप गोष्टी शिकायला मिळाल्या असंही म्हणाला. तो म्हणाला, 'तुम्हाला नेहमीच जेव्हा तुम्ही पुनरागमनाचा प्रयत्न करत असता तेव्हा सामना फक्त जिंकायचा नसतो, तर पुन्हा लढाईही करावी लागते, जे आपण खूप चांगले केले.'
'परंतु, जेव्हा आपण पुढे असू तेव्हा आपण सामना जिंकू याची काळजी घ्यायची असते, प्रतिस्पर्ध्याला पुनरागमनाची कोणतीच संधी द्यायची नसते. त्यामुळे त्यासाठी तुमच्या सर्वांचे खूप कौतुक.'
द्रविड म्हणाला, 'विजय किंवा पराभवापलिकडेही या मालिकेतून खूप शिकायला मिळणार आहे, हे मी म्हणालो होतो. पाच सामन्यांती मालिका होती, त्यामुळे तुम्हाला अनेक चढ-उतार पाहायचे होते. ही मोठी मालिका होती. त्यामुळे तुमची कसोटी पाहिली जाणार आणि त्यातून तुम्हाला एक खेळाडू म्हणून, संघ म्हणून आणि माणूस म्हणून खूप शिकायलाही मिळणार होते.'
'मला वाटते की आपण हा प्रवास खूप चांगल्याप्रकारे केला. आपण मैदानात आणि मैदानाबाहेर आव्हानांचा सामना केला, पण एक संघ म्हणून आपण एकत्र राहिलो, हे अफलातून होते. संघातील युवा खेळाडूंना एक लक्षात घ्यावे लागेल, तुम्हाला यशस्वी होण्यासाठी एकमेकांची गरज लागणार आहे.'
द्रविड पुढे म्हणाला, 'तुम्ही फलंदाज किंवा गोलंदाजी किंवा कोणीही असाल, तुमचे यश इतर खेळाडूंच्या यशाशी बांधले गेले आहे. तुम्हाला सर्वांना एकमेकांच्या यशात योगदान द्यावे लागते आणि मला वाटते पुढे जाण्यासाठी ही खूप महत्त्वाची गोष्ट आहे.'
'ही गोष्ट फक्त तुम्ही यशस्वी होण्याबद्दलच नाही, तर तुम्ही एकमेकांना यशस्वी होण्यासाठी कशी मदत करता याबद्दल आहे, कारण त्यामुळे तुम्हालाच यश मिळवण्यासाठी मदत होणार आहे. हे देखील तुम्ही योग्यप्रकारे केले, त्याबद्दल तुमचे अभिनंदन.'
द्रविड संघातील युवा खेळाडूंना सल्ला देताना म्हणाला, 'संघातील युवा खेळाडू, पुढे जाताना मला आशा आहे की तुमच्यापैकी बरेचजण बराचकाळ एकत्र खेळतील आणि खेळाडू म्हणून आणि माणून म्हणून घडवण्यात एकमेकांना मदत करतील.'
द्रविड पुढे असेही म्हणाला की कसोटी क्रिकेट कठीण आहे. त्यात सर्वांची मानसिक शारिरीक कसोटी पाहिली जाते.
त्याचबरोबरच द्रविड असंही म्हणाला की भारतीय संघाने ज्याप्रकारे मालिका जिंकली, त्यातून शेवटी समाधान मिळते. पराभवानंतर पुनरागमन करत पुढील चार सामने जिंकणे अभूतपूर्व होते. तसेच द्रविडने असंही सांगितले की पुढे अनेक आव्हानं आणखी येतील, पण त्यातून आपण सुधारणा करत राहू.'
याशिवाय द्रविडने सपोर्ट स्टाफचेही कौतुक केले. तो म्हणाला, 'सपोर्ट स्टाफचेही कौतुक. सपोर्ट स्टाफमधील सर्वांसाठी हा मोठा हंगाम होता, पण आता आम्ही सर्वच विश्रांतीवर जाणार आहोत.' त्याने म्हटले आहे की या कालावधीत सपोर्ट स्टाफ, रुम स्टाफ सर्वांनीच मेहनत घेतली आहे. त्याचबरोबक त्याने त्यांच्याबरोबर काम करण्याचा आनंद असल्याचेही सांगितले.
यानंतर रोहित शर्मानेही भाष्य केले. तो म्हणाला, 'मी सर्वांचे आभार मानेल. दबावाखाली प्रतिसाद देणे शक्य झाले नसते, तर तशी विचारप्रक्रिया आपण ठेवली नसती तर. त्याबद्दल मी खूप आनंदी आहे.'
दरम्यान, आयपीएल 2024 पूर्वीची ही भारताची अखेरची कसोटी मालिका होती. 22 मार्चपासून आयपीएलच्या 17 व्या हंगामाला सुरुवात होणार असून त्यानंतर भारतीय संघ पुन्हा टी20 वर्ल्डकपसाठी एकत्र येईल.
दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा
Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.