AB de Villiers Dainik Gomantak
क्रीडा

AB de Villiers: जेव्हा 'मिस्टर 360' च्या बॅटने केलेली कमाल...! वाचा डिविलियर्सच्या 5 सर्वोत्तम खेळींबद्दल

HBD AB de Villiers: एबी डिविलियर्सने आजपर्यंत केलेल्या सर्वोत्तम 5 खेळींबद्दल जाणून घ्या.

Pranali Kodre

AB de Villiers: दक्षिण आफ्रिकेचा धडाकेबाज क्रिकेटपटू एबी डिविलियर्स याचा आज (17 फेब्रुवारी) 40 वा वाढदिवस आहे. डिविलियर्सने आजपर्यंत अनेक मोठे विक्रम आपल्या नावे केले आहेत. त्याने त्याच्या कारकिर्दीत 114 कसोटी, 228 वनडे आणि 78 आंतरराष्ट्रीय टी20 सामने खेळले आहेत.

त्याने कसोटीत 8765 धावा, वनडेत 9577 धावा आणि आंतरराष्ट्रीय टी20 क्रिकेटमध्ये 1672 धावा केल्या आहेत. विशेष म्हणजे त्याने कसोटी आणि वनडे या दोन्ही क्रिकेट प्रकारात 50 पेक्षा अधिकच्या सरासरीने धावा केल्या आहेत. त्याने आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये 47 शतके केली आहेत.

दरम्यान, त्याच्या वाढदिवसानिमित्त त्याने केलेल्या सर्वोत्तम 5 खेळींबद्दल जाणून घेऊ.

1. विरुद्ध वेस्ट इंडिज 149 धावांची खेळी, 2015

तारीख होती 18 जानेवारी 2015, याच दिवशी एबी डिविलियर्सचं मोठं वादळ वेस्ट इंडिज संघावर येऊन आदळलं होतं. यादिवशी जोहान्सबर्ग येथे दक्षिण आफ्रिका विरुद्ध वेस्ट इंडिज सामना सुरू होता. 39 व्या षटकापर्यंत दक्षिण आफ्रिकेच्या सलामीवीरांनी 1 बाद 247 धावा धावफलकावर लावल्या होत्या.

त्यानंतर डिविलियर्स तिसऱ्या क्रमांकावर खेळायला आला. त्याने आल्यानंतर लगेचच आक्रमक खेळ सुरू केला. त्याने इतके जबरदस्त आक्रमण केले की त्याने केवळ ३१ चेंडूत शतक पूर्ण केले. त्याने या सामन्यात 44 चेंडूत 149 धावांची खेळी करताना 9 चौकार आणि 16 षटकार ठोकले होते.

याच सामन्यात त्याच्या नावावर सर्वात जलद शतक करण्याचा विश्वविक्रमही नोंदवला गेला. त्याच्या या वादळी खेळीमुळे दक्षिण आफ्रिकेने 439 धावा केल्या होत्या. तर वेस्ट इंडिजला 291 धावाच करता आल्या होत्या. त्यामुळे दक्षिण आफ्रिकेने हा सामना 148 धावांनी जिंकला होता.

2. विरुद्ध वेस्ट इंडिज नाबाद 162 धावांची खेळी, 2015 वर्ल्डकप

साल 2015 मध्येच वेस्ट इंडिजला डेविलियर्सच्या वादळाचा दुसरा तडाखा बसला, तोही वर्ल्डकपमध्ये. या सामन्यात डिविलियर्स पाचव्या क्रमांकावर 29 व्या षटकात फलंदाजीला आला. त्याने यानंतर अखेरपर्यंत आक्रमक खेळी करताना 66 चेंडूतच नाबाद 162 धावांची खेळी केली. या खेळीत त्याने तब्बल 17 चौकार आणि 8 षटकार मारले.

विशेष म्हणजे या खेळीदरम्यान त्याने वेस्ट इंडिजचा कर्णधार जेसन होल्डरवर सर्वाधिक आक्रमण केले होते. डेविलियर्सच्या या तुफानी खेळीमुळे दक्षिण आफ्रिकेने 50 षटकात 5 बाद 408 धावा केल्या होत्या. यानंतर वेस्ट इंडिजचा संघ 151 धावांवर सर्वबाद झाला होता.

3. विरुद्ध पाकिस्तान नाबाद 278 धावांची खेळी, 2010

साल 2010 मध्ये अबुधाबीमध्ये दक्षिण आफ्रिका विरुद्ध पाकिस्तान यांच्यात दुसरा कसोटी सामना झाला होता. या सामन्यात प्रथम फलंदाजी करणाऱ्या दक्षिण आफ्रिकेने 33 धावांवरच 3 विकेट्स गमावल्या होत्या.

त्यावेळी डिविलियर्स फलंदाजीसाठी आला. त्यावेळी दुसऱ्या बाजूने फलंदाजीसाठी जॅक कॅलिस होता. या दोघांनी जबरदस्त फलंदाजी करत 179 धावांची भागीदारी केली. दरम्यान कॅलिस शतकानंतर बाद झाल्यानंतरही डिविलियर्सने त्याचा शानदार खेळ केला.

तो जवळपास 10 तास नाबाद राहिला आणि त्याने 278 धावांची मोठी खेळी केली. त्याने 418 चेंडूत 23 चौकार आणि 6 षटकार मारत ही खेळी केली. त्याच्या या खेळीमुळे दक्षिण आफ्रिकेने पहिला डाव 9 बाद 584 धावांवर घोषित केला. हा सामना पुढे जाऊन अनिर्णित राहिला.

4. विरुद्ध ऑस्ट्रेलिया नाबाद 106 धावांची खेळी, 2008

कसोटी क्रिकेटमध्ये चौथ्या डावातील फलंदाजी सर्वात कठीण मानली जाते. कारण चौथा डाव सुरु होईपर्यंत बऱ्याचदा खेळपट्टी खराब झालेली, अशा परिस्थितीत त्यावर तग धरून फलंदाजी करताना फलंदाजांची खऱ्या अर्थाने कसोटी पाहिली जाते. त्यामुळे चौथ्या डावात शतक करणाऱ्या खेळाडूंचे विशेष कौतुकही अनेकदा होते.

असेच कौतुक 2008 साली एबी डिविलियर्सचेही झाले होते. त्याने पर्थवर 2008 साली ऑस्ट्रेलियाविरुद्ध चौथ्या डावात नाबाद 106 धावांची खेळी केली होती. ही त्याच्या कारकिर्दीतील सर्वोत्तम खेळींपैकी एक आहे.

त्यावेळी दक्षिण आफ्रिका ऑस्ट्रेलियाने दिलेल्या 414 धावांचा पाठलाग करत होते. डिविलियर्सने या डावात केलेल्या नाबाद 106 धावांमुळे दक्षिण आफ्रिकेने चौथ्या डावात 120 व्या षटकात 414 धावा करत विजयाला गवसणी घातली होती. डिविलियर्स व्यतिरिक्त ग्रॅमी स्मिथनेही या डावात 108 धावांची शतकी खेळी केली होती.

5. विरुद्ध ऑस्ट्रेलिया 33 धावांची खेळी, 2008

अनेकदा क्रिकेटमध्ये शतकापेक्षाही संघासाठी उपयुक्त ठरणारी खेळी महत्त्वाची असते. अशीच एक खेळी एबी डिविलियर्सने 2008 मध्ये ऑस्ट्रेलियाविरुद्ध ऍडलेडला केली होती. ऍडलेडला झालेल्या कसोटीत ऑस्ट्रेलियाने दक्षिण आफ्रिकेला 430 धावांचे आव्हान दिले होते. या आव्हानाचा पाठलाग करताना दक्षिण आफ्रिकेने 45 धावातच 4 विकेट्स गमावल्या होत्या.

पण यानंतर एबी डिविलियर्स आणि फाफ डू प्लेसिस या दोन मित्रांनी मिळून ऑस्ट्रेलियाच्या गोलंदाजांना प्रचंड दमवले. या दोघांनीही तब्बल 408 चेंडू खेळताना केवळ 89 धावांची भागीदारी केली होती. त्यामुळे दक्षिण आफ्रिकेला हा सामना वाचवण्यात यश आले होते. हा सामना त्यावेळी अनिर्णित राहिला होता.

याच सामन्यात आक्रमक फलंदाजीसाठी ओळखल्या जाणाऱ्या डिविलियर्सने 220 चेंडूत 33 धावांची खेळी केली होती. फाफ डू प्लेसिसने या सामन्यात नाबाद 110 धावा केल्या होत्या.

6. विरुद्ध मुंबई इंडियन्स नाबाद 133 धावांची खेळी, 2015

डिविलियर्सची शानदार फलंदाजी केवळ आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्येच नाही तर आयपीएलमध्येही पाहायला मिळाली आहे. डिविलियर्सने आयपीएलमध्ये केलेल्या सर्वोत्तम खेळींपैकी एक खेळी म्हणजे त्याने रॉयल चॅलेंजर्स बेंगलोरकडून मुंबई इंडियन्सविरुद्ध मुंबईतच 2015 साली केलेली 133 धावांची खेळी.

त्याने तिसऱ्या क्रमांकावर फलंदाजीला येत केवळ 59 चेंडूत 133 धावांची नाबाद 133 धावांची खेळी केली होती. त्याने ही खेळी करताना 19 चौकार आणि 4 षटकार मारले होते. त्याने ही खेळी करताना विराट कोहलीबरोबर नाबाद 215 धावांची भागीदारी केली होती.

विराटने नाबाद 82 धावा केल्या होत्या. या सामन्यान रॉयल चॅलेंजर्स बेंगलोरने 235 धावा उभारल्या होत्या. तसेच 216 धावांच्या आव्हानाचा पाठलाग करताना मुंबई इंडियन्सला 20 षटकात 7 बाद 196 धावाच करता आल्या होत्या.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Goa Government: गोवा सरकारचा मोठा निर्णय; अपघातग्रस्तांना 10 लाखापर्यंत मिळणार नुकसान भरपाई

Sunburn Festival: हा सूर्य हा जाळ

IFFI मध्ये Goan Director's Cut चे आकर्षण! सगळ्या गोमंतकीय सिनेमांची माहिती घ्या एका क्लिकमध्ये

Goa Today's News Live: 'कॅश फॉर जॉब प्रकरण'; काँग्रेस युथ पदाधिकाऱ्यांची म्हार्दोळ पोलिस स्थानकावर धडक!

Nagarjuna At IFFI 2024: नागार्जुन यांचा इफ्फीत जलवा! दाखवली नृत्याची झलक; स्वातंत्र्य सैनिकांच्या बलिदानाबाबत म्हणाले की..

SCROLL FOR NEXT