Rohit Sharma & Virat Kohli: भारतीय संघाचा सध्याचा कर्णधार रोहित शर्मा आणि स्टार फलंदाज विराट कोहली हे क्रिकेटच्या इतिहासातील सर्वात यशस्वी खेळाडूंपैकी एक आहेत. दोघेही 2008 पासून भारतीय संघाकडून खेळत आहेत. दोघांमध्ये उत्तम बाँडिंग आहे. पण एकेकाळी दोघांमध्ये बरेच मतभेद होते. टीम इंडिया दोन गटात विभागली गेली होती. असा खुलासा आता एका पुस्तकात करण्यात आला आहे.
दरम्यान, या दोन्ही क्रिकेटपटूंमध्ये मतभेद असल्याच्या बातम्याही आल्या होत्या. पण रोहित आणि विराटने याला कधीच दुजोरा दिला नाही. मात्र, आता टीम इंडियाचे (Team India) फिल्डिंग कोच आर श्रीधर यांनी त्यांच्या 'कोचिंग बियॉन्ड- माय डेज विथ द इंडियन क्रिकेट टीम' या पुस्तकात याचा खुलासा केला आहे.
तसेच, रोहित आणि विराट यांच्यातील मतभेदाची बातमी 2019 मध्ये खेळल्या गेलेल्या एकदिवसीय विश्वचषकादरम्यानही आली होती. यानंतर 2021 च्या अखेरीस कोहलीला भारताच्या वनडे कर्णधारपदावरुन हटवल्यानंतरही अशा बातम्या येऊ लागल्या होत्या.
श्रीधर यांनी आपल्या पुस्तकात सांगितले आहे की, रोहित आणि विराट यांच्यातील संबंध खूपच ताणले होते, परंतु तत्कालीन मुख्य प्रशिक्षक रवी शास्त्री यांनी त्यावेळी दोघांची समजूत घातली होती.
दुसरीकडे, 2019 च्या विश्वचषकानंतरची एक घटना आठवत श्रीधर यांनी त्यांच्या पुस्तकात लिहिले की, “2019 विश्वचषकानंतर प्रेसमध्ये ड्रेसिंग रुमबद्दल बरेच काही बोलले गेले. आम्हाला सांगण्यात आले की, संघात रोहित कॅम्प आणि विराट कॅम्प आहे. विश्वचषकानंतर आम्ही जेव्हा टी-20 मालिकेसाठी वेस्ट इंडिज (West Indies) दौऱ्यावर गेलो होतो, तेव्हाही रवी यांनी दोघांना आपल्याकडे बोलावले होते.''
श्रीधर पुढे लिहितात, “शास्त्रींनी दोघांना सांगितले की, सोशल मीडियावर जे काही सुरु आहे ते चालू द्या, परंतु तुम्ही दोघेही या संघातील सर्वात ज्येष्ठ खेळाडू आहात, त्यामुळे हे प्रकार थांबले पाहिजेत. तुम्ही हे सर्व मागे सोडून एकत्र पुढे जावे असे मला वाटते.''
Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.