ICC Cricket World Cup 2023 Points Table:
शुक्रवारी (27 ऑक्टोबर) वनडे वर्ल्डकप 2023 स्पर्धेत दक्षिण आफ्रिका आणि पाकिस्तान यांच्यात चेन्नईला सामना झाला. या सामन्यात दक्षिण आफ्रिकेने 1 विकेटने रोमांचक विजय मिळवला. हा दक्षिण आफ्रिकेचा सहा सामन्यातील पाचवा विजय ठरला.
दक्षिण आफ्रिकेने सहापैकी पाच सामने जिंकले असल्याने त्यांचे आता 10 गुण झाले आहेत. त्यामुळे दक्षिण आफ्रिका गुणतालिकेत अव्वल क्रमांकावर आले आहेत. दरम्यान, भारतीय संघाचे देखील सध्या 10 गुण आहेत.
मात्र, दक्षिण आफ्रिकेचा नेट रनरेट चांगला असल्याने त्यांनी भारताला मागे टाकत अव्वल क्रमांक मिळवला आहे. भारताने आत्तापर्यंत या स्पर्धेत पाच सामने खेळले असून पाचही सामने जिंकले आहेत.
पाकिस्तान संघ मात्र पराभवामुळे सहाव्या क्रमांकावर राहिला आहे. त्यांचा हा सहा सामन्यातील सलग चौथा पराभव होता. त्यामुळे सध्या त्यांच्या खात्यात 2 विजयांसह अवघे 4 गुण आहेत.
पाकिस्तानच्या खालोखाल सातव्या क्रमांकावर असलेल्या अफगाणिस्तानचे आणि पाकिस्तानच्या वर पाचव्या क्रमांकावर असलेल्या श्रीलंका संघाचे देखील 4 गुण आहेत. अफगाणिस्तान आणि श्रीलंका या दोन्ही संघांनी आत्तापर्यंत पाच सामन्यांपैकी दोन सामने जिंकले आहेत, तर तीन सामने पराभूत झाले आहेत.
मात्र, नेट रनरेटच्या फरकामुळे श्रीलंका, पाकिस्तान आणि अफगाणिस्तान अनुक्रमे पाचव्या, सहाव्या आणि सातव्या क्रमांकावर आहेत.
दक्षिण आफ्रिका आणि भारत यांच्यानंतर गुणतालिकेत तिसऱ्या क्रमांकावर सध्या न्यूझीलंड आहे. त्यांचे पाच सामन्यातील चार विजयांसह सध्या 8 गुण आहेत. तसेच चौथ्या क्रमांकावर ऑस्ट्रेलिया असून त्यांचे पाच सामन्यांतील तीन विजयांसह 6 गुण आहेत.
ऑस्ट्रेलिया आणि न्यूझीलंड संघात 28 ऑक्टोबर रोजी धरमशाला येथे सामना होणार आहे. या सामन्याचाही गुणतालिकेवर परिणाम होऊ शकतो.
जर या सामन्यात न्यूझीलंडने विजय मिळवला, तर ते गुणतालिकेत नेट रनरेटच्या जोरावर भारताला मागे टातत अव्वल क्रमांकावर येतील. पण जर ऑस्ट्रेलियाने विजय मिळवला, तर न्यूझीलंड तिसऱ्या क्रमांकावरच आणि ऑस्ट्रेलियाही चौथ्याच क्रमांकवर राहू शकतात.
दरम्यान, गुणतालिकेत आठव्या, नवव्या आणि दहाव्या क्रमांकावर अनुक्रमे बांगलादेश, इंग्लंड आणि नेदरलँड्स हे संघ आहेत. या तिन्ही संघांनी पाच सामन्यांपैकी एकच सामना जिंकला आहे. त्यामुळे या तिन्ही संघांचे 2 गुण आहेत. मात्र नेट रनरेटच्या फरकामुळे त्यांचे स्थान ठरले आहे.
Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.