Sourav Ganguly appointed head coach of Delhi Capitals Dainik Gomantak
क्रीडा

Sourav Ganguly Head Coach: दिल्ली कॅपिटल्सचा मोठा निर्णय! सौरव गांगुली बनले नवे हेड कोच; 'दादा' आता 'DC'ला मिळवून देणार पहिली IPL ट्रॉफी?

Sourav Ganguly appointed head coach of Delhi Capitals: आयपीएल २०२७च्या हंगामाला सुरुवात होण्यास अजून काही महिने बाकी असतानाच दिल्ली कॅपिटल्सने संघाच्या नेतृत्व व्यवस्थेत मोठा बदल केला आहे.

Sameer Amunekar

Sourav Ganguly appointed head coach of Delhi Capitals for IPL 2027 season

आयपीएल २०२७च्या हंगामाला सुरुवात होण्यास अजून काही महिने बाकी असतानाच दिल्ली कॅपिटल्सने संघाच्या नेतृत्व व्यवस्थेत मोठा बदल केला आहे. फ्रँचायझीने भारताचा माजी कर्णधार आणि दिग्गज क्रिकेटपटू सौरव गांगुली यांची संघाच्या नव्या हेड कोचपदी नियुक्ती केली आहे. दिल्ली कॅपिटल्सने सोशल मीडिया पोस्टद्वारे या निर्णयाची अधिकृत माहिती दिली. फ्रँचायझीने गांगुलींच्या नियुक्तीची घोषणा करताना ‘दादा’ या त्यांच्या लोकप्रिय टोपणनावाचाही खास अंदाजात वापर केला आहे.

हेमंग बदानींच्या जागी आता ‘दादा’

गेल्या हंगामापर्यंत दिल्ली कॅपिटल्सच्या मुख्य प्रशिक्षकाची जबाबदारी माजी भारतीय क्रिकेटपटू हेमंग बदानी यांच्याकडे होती. आता त्यांच्या जागी सौरव गांगुली संघाच्या कोचिंगची प्रमुख जबाबदारी सांभाळणार आहेत.

दिल्ली कॅपिटल्सला अद्याप आयपीएलची ट्रॉफी जिंकता आलेली नाही. त्यामुळे आगामी हंगामात संघाला विजेतेपदाच्या दिशेने घेऊन जाण्याचे मोठे आव्हान गांगुलींसमोर असेल. यापूर्वी फ्रँचायझीने अनेक दिग्गज प्रशिक्षकांसोबत काम केले आहे. ग्रेगरी शिपर्ड, एरिक साइमन्स, गॅरी कर्स्टन, पॅडी अप्टन, रिकी पाँटिंग आणि हेमंग बदानी यांनी यापूर्वी संघाचे मुख्य प्रशिक्षक म्हणून काम पाहिले आहे.

दिल्ली कॅपिटल्सशी गांगुलींचे जुने नाते

सौरव गांगुली यांचे दिल्ली कॅपिटल्सशी नाते नवीन नाही. मार्च २०१९मध्ये त्यांची फ्रँचायझीच्या सल्लागारपदी नियुक्ती झाली होती. मात्र, त्याच वर्षी ऑक्टोबरमध्ये बीसीसीआयच्या अध्यक्षपदाची जबाबदारी स्वीकारल्यानंतर त्यांना फ्रँचायझीपासून दूर व्हावे लागले.

बीसीसीआयमधील कार्यकाळ पूर्ण केल्यानंतर गांगुली पुन्हा दिल्ली कॅपिटल्सशी जोडले गेले. यावेळी त्यांनी ‘डायरेक्टर ऑफ क्रिकेट’ म्हणून फ्रँचायझीमध्ये महत्त्वाची भूमिका बजावली. आयपीएलसोबतच वुमन्स प्रीमियर लीगमधील संघबांधणी आणि विविध क्रिकेटविषयक ऑपरेशन्समध्येही त्यांचा सहभाग राहिला.

प्रिटोरिया कॅपिटल्सलाही पोहोचवले होते फायनलमध्ये

दिल्ली कॅपिटल्सच्या मालकीच्या दक्षिण आफ्रिकेतील फ्रँचायझी प्रिटोरिया कॅपिटल्ससोबतही गांगुली यांनी काम केले आहे. SA20च्या २०२५च्या हंगामात त्यांनी प्रिटोरिया कॅपिटल्सच्या मुख्य प्रशिक्षकाची भूमिका सांभाळली होती. त्यांच्या मार्गदर्शनाखाली संघाने अंतिम फेरीपर्यंत मजल मारली होती.

आता दिल्ली कॅपिटल्सने त्यांच्यावर आयपीएलमधील हेड कोचपदाची जबाबदारी सोपवली आहे. त्यामुळे गांगुलींचा संघबांधणी आणि कोचिंगमधील अनुभव दिल्लीसाठी महत्त्वाचा ठरणार आहे.

दिल्ली कॅपिटल्ससमोर मोठे आव्हान

गेल्या काही आयपीएल हंगामांमध्ये दिल्ली कॅपिटल्सला सातत्यपूर्ण कामगिरी करता आलेली नाही. २०२१मध्ये संघाने प्लेऑफमध्ये स्थान मिळवले होते. त्यानंतर मात्र २०२२पासून दिल्लीला प्लेऑफच्या पुढे जाता आलेले नाही. २०२०मध्ये संघाने अंतिम फेरी गाठली होती; मात्र मुंबई इंडियन्सकडून पराभव झाल्याने त्यांचे पहिले आयपीएल विजेतेपदाचे स्वप्न अधुरे राहिले.

त्यामुळे आता गांगुलींच्या नेतृत्वाखालील कोचिंग टीमसमोर संघाची कामगिरी सुधारण्याचे तसेच योग्य संघबांधणी करण्याचे आव्हान असेल. आयपीएल २०२७पूर्वी खेळाडूंची निवड, रणनीती आणि संघातील भूमिकांचे नियोजन याकडेही लक्ष असेल.

‘दादा’च्या एन्ट्रीने चाहत्यांमध्ये उत्सुकता

दिल्ली कॅपिटल्सने गांगुलींच्या नियुक्तीची घोषणा खास व्हिडिओद्वारे केली. ‘दिल्ली, यह दादागिरी का समय है’ अशा अंदाजात फ्रँचायझीने त्यांचे स्वागत केले. त्यामुळे सोशल मीडियावरही या नियुक्तीची चर्चा सुरू झाली आहे.

भारतीय क्रिकेटमध्ये कर्णधार म्हणून आक्रमक नेतृत्वासाठी ओळखले जाणारे गांगुली आता दिल्ली कॅपिटल्सला पहिल्या आयपीएल विजेतेपदापर्यंत घेऊन जाण्यासाठी कोणती रणनीती आखतात, याकडे क्रिकेट चाहत्यांचे लक्ष लागले आहे.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Harmanpreet Kaur Captaincy: हरमनप्रीत कौरने अचानक कर्णधारपद का सोडलं? एशियन गेम्समध्ये गोल्ड जिंकूनही निर्णय; BCCIच्या 'त्या' बैठकीत काय चर्चा झाली?

Aadhaar Card New Rule: UIDAI ने बदलले आधार कार्डमधील नाव सुधारण्याचे नियम, नागरिकांना मोठा दिलासा; नवीन गाइडलाईन्स जारी

Shadashtak Yog 2026: कामाच्या ठिकाणी वाद आणि आर्थिक फटका! जीवनात खळबळ माजवणार षडाष्टक योग; 'या' 5 राशींच्या आयुष्यात येणार मोठं तुफान

Gujrat Road Accident: भावनगरमध्ये रक्ताचा सडा! भरधाव बोलेरोची ट्रेलरला जोरदार धडक, 6 जणांचा मृत्यू; एकजण देतोय मृत्यूशी झुंज VIDEO

SIR Guidelines: 'एसआयआर'च्या मार्गदर्शक तत्त्वांना सुप्रीम कोर्टाची कायदेशीर मान्यता? निवडणूक आयोगाच्या वकिलांचा दावा; गोवा खंडपीठात आजही सुनावणी सुरु

SCROLL FOR NEXT