Shreyas Iyer: भारतीय संघाने न्यूझीलंडविरुद्ध ऑकलंड येथे वनडे मालिकेतील पहिला सामना खेळला. या सामन्यात भारताने न्यूझीलंडला 307 धावांचे आव्हान दिले होते. भारताकडून श्रेयस अय्यरने सर्वाधिक 80 धावा केल्या. याबरोबरच त्याने मोठ्या विक्रमालाही गवसणी घातली आहे.
श्रेयसने न्यूझीलंडविरुद्ध सलग चौथ्यांदा वनडेत 50 किंवा त्यापेक्षा अधिक धावांची खेळी केली आहे. त्याने यापूर्वी 2020 मध्ये न्यूझीलंड दौऱ्यात सलग तीन वनडे सामन्यात 50 पेक्षा अधिक धावांची खेळी केलेली.
श्रेयस अय्यरचा विक्रम
विशेष म्हणजे श्रेयसने आत्तापर्यंत न्यूझीलंडविरुद्ध चारच वनडे सामने (ODI Cricket) खेळले आहेत आणि या चारही सामन्यांमध्ये त्याने 50 धावांचा टप्पा ओलांडला आहे. त्याने न्यूझीलंडविरुद्ध खेळलेल्या चार वनडेत अनुक्रमे 103, 52, 62 आणि 80 अशा खेळी केल्या आहेत.
त्यामुळे तो न्यूझीलंडमध्ये वनडेत सलग चार किंवा त्यापेक्षा अधिकवेळा 50 धावांचा टप्पा ओलांडणारा दुसरा परदेशी खेळाडू ठरला आहे. यापूर्वी असा पराक्रम पाकिस्तानचे माजी क्रिकेटपटू रमीज राजा यांनी केला होता. त्यांनी न्यूझीलंडमध्ये वनडेत सलग 5 वेळा 50 पेक्षा अधिक धावा केल्या होत्या.
भारताकडून तीन खेळाडूंचे अर्धशतक
शुक्रवारी भारताकडून (Team India) पहिल्या वनडेत न्यूझीलंडविरुद्ध श्रेयस अय्यर व्यतिरिक्त कर्णधार शिखर धवन आणि शुभमन गिल यांनीही अर्धशतके झळकावली. शिखरने 72 आणि गिलने 50 धावांची खेळी केली. याशिवाय संजू सॅमसन (36) आणि वॉशिंग्टन सुंदर (37) यांनीही छोटेखानी महत्त्वपूर्ण खेळी केल्या.
त्यामुळे भारताने प्रथम फलंदाजी करताना 50 षटकांत 7 बाद 306 धावा धावफलकावर लावल्या. न्यूझीलंडकडून टीम साऊथी आणि लॉकी फर्ग्यूसन यांनी प्रत्येकी 3 विकेट्स घेतल्या.
दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा
Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.