

US F-15 Jet Crash Kuwait: मध्य पूर्वेमध्ये सुरु असलेल्या युद्धाचा आज (2 मार्च) तिसरा दिवस असून परिस्थिती अत्यंत भयानक बनली आहे. इस्रायल आणि अमेरिकेने इराणवर जोरदार बॉम्बहल्ले सुरु ठेवले असतानाच, एक धक्कादायक बातमी समोर आली. कुवेतमध्ये अमेरिकेचे अत्यंत आधुनिक आणि घातक मानले जाणारे F-15 लढाऊ विमान कोसळले.
या घटनेचा एक व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल झाला असून त्यामध्ये विमानाला हवेतच आग लागल्याचे आणि ते गोल फिरत जमिनीवर कोसळताना दिसत आहे. इराणशी संबंधित अनेक गटांनी असा दावा केला की, हे विमान तांत्रिक बिघाडामुळे नाही तर क्षेपणास्त्राने पाडण्यात आले. सुदैवाने, या विमानाचा पायलट सुरक्षित असल्याचे सांगण्यात येत आहे, मात्र अमेरिका किंवा कुवेतच्या लष्कराने अद्याप या वृत्ताला अधिकृत दुजोरा दिलेला नाही. या घटनेचा तपास सध्या युद्धपातळीवर सुरु आहे.
दुसरीकडे, इराणमधील लष्करी तळांवर अमेरिका आणि इस्रायलचे हल्ले थांबण्याचे नाव घेत नाहीत. गेल्या 48 तासांत उभय देशांनी इराणमधील 2000 हून अधिक लक्ष्यांवर भीषण मारा केला आहे. अमेरिकन लष्कराने जारी केलेल्या व्हिडिओंमध्ये इराणचे क्षेपणास्त्र साठा, एअर डिफेन्स सिस्टिम, नौदलाच्या मालमत्ता आणि महत्त्वाच्या लष्करी पायाभूत सुविधा क्षेपणास्त्रांनी उद्ध्वस्त करताना दिसत आहेत.
विशेष म्हणजे, सर्वोच्च नेते खामेनी यांच्या निवासस्थानाजवळच्या परिसरालाही लक्ष्य करण्यात आले आहे. इराणने देखील या हल्ल्यांना प्रत्युत्तर देण्यासाठी इस्रायलमधील तेल अवीव, येरुशलम आणि किर्याद ओनो या शहरांवर क्षेपणास्त्रे डागली. या युद्धात केवळ इस्रायलच नव्हे, तर बहरीन आणि इराक मधील अमेरिकन लष्करी तळांनाही इराणने लक्ष्य केले असून तिथे मोठ्या नुकसानीचे वृत्त आहे.
काल रात्री इस्रायलने इराणची राजधानी तेहरानवर जबरदस्त बॉम्बवर्षाव केला, ज्यामध्ये इराणच्या स्टेट टीव्हीच्या कार्यालयाचेही नुकसान झाले आहे. इराण आणि इस्रायलमधील हे थेट युद्ध आता पूर्णपणे अनियंत्रित झाले असून, अमेरिका यात सक्रियपणे उतरल्याने जागतिक स्तरावर चिंतेचे वातावरण आहे. आखाती देशांमधील अमेरिकन तळांवर होणारे हल्ले आणि अत्याधुनिक विमाने कोसळण्याच्या घटनांमुळे युद्धाची तीव्रता आणखी वाढण्याची शक्यता वर्तवली जात आहे. हे युद्ध नेमके कधी थांबेल, हे सांगणे सध्या कठीण झाले असून संपूर्ण जगाचे लक्ष आता मिडल इस्टमध्ये घडणाऱ्या पुढील घडामोडींकडे लागले आहे.
दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.