

पणजी: सामन्याच्या भरपाई वेळेतील गोल ऑफसाईड ठरला नसता, तर धेंपो स्पोर्टस क्लबला इंडियन फुटबॉल लीग (आयएफएल) स्पर्धेत विजयी सलामी देणे शक्य झाले असते. अखेरीस फातोर्डा येथील पंडित जवाहरलाल नेहरू स्टेडियमवर रविवारी त्यांना रियल काश्मीरविरुद्ध २-२ या गोलबरोबरीवर समाधान मानावे लागले.
सामन्याच्या भरपाई वेळेतील दुसऱ्या मिनिटास मार्कुस जोसेफ याला समोर प्रतिस्पर्धी गोलरक्षक नसताना चेंडूला गोलनेटची आरामात दिशा दाखविण्याची संधी होती, परंतु त्याचा नेम चुकला.
यावेळी गोलपोस्टच्या बाजूने बदली खेळाडू लक्ष्मणराव राणे याने चेंडू नियंत्रित करून तिरकस फटक्यावर गोलरेषा पार करण्यात सफलता मिळविली होती, परंतु ‘लाईनमन’ने ऑफसाईडची झेंडा उंचावल्यामुळे २-२ गोलबरोबरी कायम राहिली व दोन्ही संघांना प्रत्येकी एक गुण मिळाला. समीर नाईक यांच्या मार्गदर्शनाखालील धेंपो क्लबचा पुढील सामना आठ मार्च रोजी डायमंड हार्बर एफसीविरुद्ध पश्चिम बंगालमध्ये खेळला जाईल.
पूर्वार्धाच्या भरपाई वेळेत दोन गोल झाले. महंमद इनाम याने ४५+१ व्या मिनिटास इश्फाक अहमद यांच्या मार्गदर्शनाखालील संघाला आघाडी मिळवून दिली, मात्र लगेच ४५+५ व्या मिनिटास त्रिनिदाद-टोबॅगोच्या मार्कुस जोसेफ याने पेनल्टी फटक्यास अचूक दिशा दाखविल्यामुळे धेंपो क्लबने बरोबरी साधली.
विश्रांतीनंतर ६१व्या मिनिटास कोलंबियन सेबॅस्टियन गुटिएरेझ याच्या फ्रीकिक फटक्यावर आयव्हरी कोस्टच्या ऑबिन कौआकौ याचे हेडिंग भेदक ठरल्यामुळे धेंपो क्लबच्या खाती २-१ अशी आघाडी जमा झाली, पण यजमान संघाचा आनंद फक्त दोनच मिनिटे चकला. प्रतिहल्ल्यावर नायजेरियन खेळाडू शेदराक चार्ल्स याने धेंपो क्लबच्या दोघा बचावपटूंना गुंगारा देत गोलरक्षक आशिष सिबी यालाही चकवा देत रियल काश्मीरला २-२ अशी गोलबरोबरी साधून दिली.
शिलाँग लाजाँग-राजस्थान बरोबरी
आयएफएल स्पर्धेत रविवारी शिलाँग येथे झालेल्या लढतीत शिलाँग लाजाँग एफसी व राजस्थान युनायटेड यांच्यातील सामना १-१ असा गोलबरोबरीत राहिला.
रुग्णवाहिका मैदानात...
विश्रांतीला तीन मिनिटे बाकी असताना धेंपो क्लबचा कर्णधार ॲरिस्टन कॉस्ता याला दुखापत झाली, त्यामुळे उपचारासाठी रुग्णवाहिका थेट मैदानात आणावी लागली. ॲरिस्टनने मैदान सोडले व त्याची जागा बदली खेळाडू क्नेर्कितालांग बुआम याने घेतली.
दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.