देशांतर्गत क्रिकेटमधील धावांचे मशीन मानल्या जाणाऱ्या सरफराज खानने पुन्हा एकदा आपल्या बॅटची जादू दाखवली आहे. रणजी ट्रॉफी २०२५-२६ च्या दुसऱ्या टप्प्यातील सामन्यात मुंबईचा सामना हैदराबादशी झाला. या सामन्यात सरफराजने हैदराबादच्या गोलंदाजांना पाणी पाजत एक ऐतिहासिक खेळी साकारली. या द्विशतकी खेळीने त्याने केवळ मुंबईला मजबूत स्थितीत नेले नाही, तर भारतीय संघात पुनरागमन करण्यासाठी निवड समितीचे दरवाजे जोराने ठोठावले आहेत.
हैदराबादचा कर्णधार आणि टीम इंडियाचा प्रमुख वेगवान गोलंदाज मोहम्मद सिराज याच्या उपस्थितीत सरफराजने हे द्विशतक झळकावले, जे अत्यंत महत्त्वाचे मानले जात आहे. सरफराजने अवघ्या २१९ चेंडूंत १०३.६५ च्या स्ट्राईक रेटने २२७ धावांची खेळी खेळली. त्याचं फर्स्ट क्लास क्रिकेटमधील हे पाचवं द्विशतक आहे.
या खेळीत त्याने १९ चौकार आणि ९ उत्तुंग षटकार ठोकले. मुंबईने १२३.२ षटकांत ५६० धावांचा डोंगर उभा केला, ज्यामध्ये कर्णधार सिद्धेश लाडच्या १०४ आणि सुवेद पारकरच्या ७५ धावांचाही मोठा वाटा होता.
या खेळीदरम्यान सरफराजने प्रथम श्रेणी क्रिकेटमध्ये (First Class Cricket) आपल्या ५,००० धावा पूर्ण करण्याचा बहुमान मिळवला आहे. विशेष म्हणजे, ६० हून अधिक सरासरीने धावा करणारा तो सध्याच्या काळातील मोजक्या फलंदाजांपैकी एक ठरला आहे.
देशांतर्गत क्रिकेटमध्ये सातत्याने धावा करूनही भारतीय संघात स्थान मिळवण्यासाठी त्याला करावी लागलेली प्रतीक्षा आता संपण्याची चिन्हे आहेत. मुख्य प्रशिक्षक गौतम गंभीर आणि निवड समितीचे अध्यक्ष अजित आगरकर यांच्यासाठी सरफराजने एक मोठा पेच निर्माण केला आहे.
सध्या भारतीय कसोटी संघाची कामगिरी चढ-उताराची राहिली आहे. मधल्या फळीत एका आक्रमक आणि स्थिर फलंदाजाची गरज भासत असताना सरफराजची ही खेळी 'टाईमली' मानली जात आहे.
आगामी कसोटी मालिकांसाठी तो कर्णधार शुभमन गिल आणि प्रशिक्षक गंभीर यांची पहिली पसंती ठरू शकतो. ज्या पद्धतीने त्याने हैदराबादच्या अनुभवी गोलंदाजीवर आक्रमण केले, त्यावरून त्याची मानसिक प्रगल्भता आणि फॉर्म स्पष्टपणे दिसून येतो.
दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.