Sachin Tendulkar Advice On Vaibhav Sooryavanshi Vice Captaincy: भारताचा विस्फोटक फलंदाज वैभव सूर्यवंशी सध्या क्रिकेट जगतात चर्चेचा केंद्रबिंदू ठरला आहे. न्यूझीलंड दौऱ्यावर भारतीय टी-20 संघाचा भाग असलेल्या वैभवला दोन सामन्यांत खेळण्याची संधी मिळाली, ज्यातील एका सामन्यात त्याने आपल्या उत्कृष्ट फलंदाजीची चुणूक दाखवली. आता आगामी 19 नोव्हेंबरपासून कतार येथे सुरु होणाऱ्या इमर्जिंग एशिया कप स्पर्धेत तो इंडिया-ए संघाकडून खेळताना दिसणार आहे. या स्पर्धेत अभिषेक शर्मासोबत तो डावाची सुरुवात करताना दिसेल, ज्यामुळे सीनियर संघातील आपल्या स्थानावर अधिक मजबूत दावा सांगण्याची त्याच्याकडे सुवर्णसंधी आहे.
दरम्यान, वैभवच्या या झंझावाती प्रगतीसोबत मिळालेल्या जबाबदाऱ्यांवर क्रिकेटचा देव सचिन तेंडुलकर (Sachin Tendulkar) ने एक महत्त्वाची प्रतिक्रिया दिली. नुकत्याच पार पडलेल्या एका सोशल मीडियावरील प्रश्न-उत्तराच्या सत्रात चाहत्यांच्या प्रश्नांना उत्तर देताना सचिनने, वैभवला दुलीप ट्रॉफीसारख्या महत्त्वाच्या स्पर्धेत उप कॅप्टन्सीची जबाबदारी देणे थोडे घाईचे ठरल्याचे स्पष्ट केले. रेड बॉल क्रिकेटमध्ये त्याला अजून अधिक सामने खेळू द्यायला हवे आणि प्रत्येक पाऊल अतिशय विचारपूर्वक व हळूहळू पुढे टाकायला हवे, असे मत त्याने व्यक्त केले.
वैभवने आतापर्यंत आपल्या कारकिर्दीत 10 आंतरराष्ट्रीय टी-20 सामने आणि 11 प्रथम श्रेणी सामने खेळले आहेत. दुलीप ट्रॉफी 2026 चे विजेतेपद पटकावणाऱ्या ईस्ट जोनच्या संघात तो उप कॅप्टन म्हणून सहभागी झाला होता, ज्यावर सचिनने ही टिप्पणी केली. याशिवाय, मैदानावर लक्ष विचलित होण्यापासून कसे वाचावे, यावर बोलताना सचिन म्हणाला की, काही वेळ डोळे बंद करुन फक्त आपल्या श्वासावर लक्ष केंद्रित केल्यास सर्व डिस्टट्रॅक्शन दूर होते आणि योग्य फोकस मिळण्यास मदत होते. आता कतारमध्ये होणाऱ्या इमर्जिंग एशिया कप स्पर्धेत वैभव सूर्यवंशी कशी कामगिरी करतो आणि या मिळालेल्या संधीचे सोने कसा करतो, याकडे संपूर्ण क्रीडा विश्वाचे लक्ष लागले आहे.
दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.