Ricky Ponting Son Video: भारतात सध्या इंडियन प्रीमियर लीगचा 16 वा हंगाम सुरू आहे. या हंगामात दिल्ली कॅपिटल्सचे प्रशिक्षकपद रिकी पाँटिंग सांभाळत आहे. त्यामुळे तोही दिल्ली कॅपिटल्स संघाबरोबर भारतात आहे. त्याच्याबरोबर त्याचा लहान मुलगा फ्लेचर विल्यम पाँटिंग हा देखील आहे. नुकताच या बाप-लेकांचा एक व्हिडिओ व्हायरल झाला असून त्यावर ऋषभ पंतनेही कमेंट केली आहे.
दिल्ली कॅपिटल्सचा त्यांचा या हंगामातील पाचवा सामना रॉयल चॅलेंजर्स बेंगलोरविरुद्ध शनिवारी एम चिन्नास्वामी स्टेडियमवर खेळायचा आहे. या सामन्यासाठी दिल्लीचा संघ पाँटिंगच्या मार्गदर्शनाखाली तयारी करत आहे.
याचदरम्यान, पाँटिंगबरोबर त्याचा मुलगा फ्लेचरही नेटमध्ये सराव करताना दिसला असून त्यांच्या सरावाचा व्हिडिओ दिल्ली कॅपिटल्सने सोशल मीडियावर शेअर केला आहे. या व्हिडिओमध्ये दिसते की फ्लेचर नेट्समध्ये सुरेख फटकेबाजी करत आहे.
त्याला पाहून नंतर पाँटिंग विचारतो की 'तू उद्या निवडीसाठी उपलब्ध असणार आहेस की नाही? तू शनिवारी आमच्यासाठी सामना खेळशील असे तुला वाटते का?' यावर फ्लेचरही त्याला काहीतरी म्हणतो.
दरम्यान, या गोड व्हिडिओवर दिल्लीचा कर्णधार ऋषभ पंत याने कमेंट करताना म्हटले आहे की 'हाहाहा, निवडीसाठी तो खूपच लहान आहे. कदाचीत एक दिवस तो दिल्लीसाठी खेळेल.' या व्हिडिओवर अन्य युजर्सच्याही अनेक कमेंट्स आल्या असून लाखो युजर्सने या व्हिडिओला पसंती दिली आहे.
लक्षात घेण्यासारखी गोष्ट म्हणजे सध्या पंत अपघातात झालेल्या दुखापतीतून सावरत आहे, त्यामुळे तो आयपीएल 2023 मध्ये सहभागी झालेला नाही. त्याच्याऐवजी डेव्हिड वॉर्नर दिल्लीचे नेतृत्व करत आहे.
काही दिवसांपूर्वीच पाँटिंगबरोबर त्याच्या मुलाची विराट बरोबरील भेटीचा व्हिडिओही व्हायरल झाला होता. दिल्ली कॅपिटल्सनेच शेअर केलेल्या या व्हिडिओमध्ये दिसते की पाँटिंग त्याच्या मुलाची विराटशी ओळख करून देत आहे. त्यावेळी विराट सांगतो की तो त्याला बाहेर भेटला आहे. त्यानंतर पाँटिंग आणि विराट हलकी फुलकी चर्चा करताना दिसतात. यावेळी फ्लेचरही पाँटिंगच्याच्या शेजारी उभा असलेला दिसतो.
आयपीएल 2023 बद्दल बोलायचे झाल्यास दिल्ली कॅपिटल्सने आत्तापर्यंत चार सामने खेळले असून एकाही सामन्यात अद्याप त्यांना विजय मिळवता आलेला नाही. तसेच आरसीबीने तीन सामने खेळले असून त्यांनी पहिला सामना जिंकला होता, मात्र त्यांनतरच्या दोन्ही सामन्यात त्यांना पराभवाचा सामना करावा लागला आहे. त्यामुळे शनिवारी दोन्ही संघ विजयीपथावर परतण्यासाठी प्रयत्नशील असतील.
दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा
Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.