R Ashwin revealed Why Australia bat first in ICC ODI Cricket World Cup 2023 Final against India at Ahmedabad :
वर्ल्डकप 2023 स्पर्धेचा अंतिम सामना 19 नोव्हेंबर रोजी भारत विरुद्ध ऑस्ट्रेलिया संघात अहमदाबादमधील नरेंद्र मोदी स्टेडियममध्ये पार पडला. या सामन्यात ऑस्ट्रेलियाने 6 विकेट्सने विजय मिळवत सहाव्यांदा वर्ल्डकपवर नाव कोरले.
या सामन्यात ऑस्ट्रेलियाने नाणेफेक जिंकून प्रथम गोलंदाजीचा निर्णय का घेतला होता, याबद्दल आर अश्विनने ऑस्ट्रेलियन संघाचा निवडकर्ता जॉर्ज बेलीबरोबर झालेल्या चर्चेबद्दल खुलासा केला आहे.
दरम्यान, या सामन्यात ऑस्ट्रेलियाचा कर्णधार पॅट कमिन्सने नाणेफेक जिंकून प्रथम गोलंदाजी करण्याचा निर्णय घेतला होता. त्याच्या या निर्णयाने अनेक आजी-माजी दिग्गजांनाही आश्चर्याचा धक्का बसला होता. कारण अनेक क्रिकेट तज्ञांनी अंतिम सामन्यातील खेळपट्टी धीम्या गतीची असण्याची अंदाज वर्तवले होते.
अशात अनेकांना अपेक्षा होती की जो संघ नाणेफेक जिंकेल, तो प्रथम फलंदाजी निवडेल. अगदी नाणेफेक झाल्यानंतर जेव्हा कमिन्सने गोलंदाजी निवडल्यानंतर भारताचा कर्णधार रोहित शर्माने म्हटले होते की त्यांना प्रथम फलंदाजीच करायची होती. मात्र, जसजसा सामना पुढे गेला, तसा कमिन्सने घेतलेला निर्णय योग्य ठरताना दिसला.
याचबद्दल आता आर अश्विनने त्याच्या युट्यूब चॅनेलवर मोठा खुलासा केला आहे. अश्विनने सामन्याच्या पहिल्या डावानंतर जॉर्ज बेलीबरोबर झालेल्या चर्चेबद्दल सांगितले आहे.
त्याने म्हटले, "ऑस्ट्रेलियाने वैयक्तिकरित्या मला फसवले. मी पहिल्या डावानंतर खेळपट्टी पाहात होतो, त्याचवेळी मीऑस्ट्रेलियाच्या निवड समीतीचा अध्यक्ष जॉर्ज बेलीला धडकलो. मी त्यावेळी त्याला विचारले की 'तुम्ही प्रथम फलंदाजी का केली नाही?'
'त्यावेळी त्याने मला सांगितले 'आम्ही येथे बराच काळापासून आयपीएल आणि द्विपक्षीय मालिका खेळत आहोत. लाल मातीची खेळपट्टीला लवकर तडे पडतात, पण काळ्या मातीच्या खेळपट्टीबाबत असे होत नाही, ही खळपट्टी संध्याकाळी (लाईट्समध्ये) आणखी चांगली होत जाते. लाल मातीच्या खेळपट्टीवर दवाचा परिणाम होत नाही, पण काळ्या मातीच्या खेळपट्टीवर दुपारी चेंडूला चांगले वळण मिळते आणि रात्री ही खेळपट्टी क्राँक्रिटसारखी बनते. हाच आमचा अनुभव आहे.'"
अनेक रिपोर्टनुसार अंतिम सामन्यातील खेळपट्टी काळ्या मातीची होती.
दरम्यान, या सामन्यात ऑस्ट्रेलियाने भारताला प्रथम फलंदाजीला बोलावले होते. भारताकडून कर्णधार रोहित शर्माने 31 चेंडूत 4 चौकार आणि 3 षटकारांसह 47 धावांची खेळी करत चांगली सुरुवात करून दिली होती.
मात्र तो बाद झाल्यानंतर विराट कोहली (54) आणि केएल राहुल (66) यांनी अर्धशतके केली. मात्र भारताला धावगती वाढवता आली नव्हती. तसेच या तिघांव्यतिरिक्त कोणालाही फलंदाजी फार काही खास करता आले नव्हते. त्यामुळे भारतीय संघाने 50 षटकात सर्वबाद 240 धावा केल्या होत्या.
ऑस्ट्रेलियाकडून मिचेल स्टार्कने सर्वाधिक 3 विकेट्स् घेतल्या होत्या. तसेच जोश हेजलवूड आणि पॅट कमिन्स यांनी प्रत्येकी 2 विकेट्स घेतल्या होत्या, त्याचबरोबर ग्लेन मॅक्सवेल आणि ऍडम झम्पा यांनी प्रत्येकी एक विकेट घेतली.
त्यानंतर 241 धावांच्या आव्हानाचा पाठलाग करताना ऑस्ट्रेलियालाही सुरुवातीला मोठे धक्के बसले. त्यांनी 47 धावांत 3 विकेट्स गमावल्या होत्या. पण त्यानंतर ट्रेविस हेड आणि मार्नस लॅब्युशेन यांनी 192 धावांची भागीदारी करत ऑस्ट्रेलियाला विजयापर्यंत पोहोचवले.
हेडने 120 चेंडूत 15 चौकार आणि 4 षटकारांसह 137 धावांची खेळी केली. तसेच मार्नस लॅब्युशेनने 110 चेंडूत 58 धावांची खेळी केली.
भारताकडून जसप्रीत बुमराहने 2 विकेट्स घेतल्या, तसेच मोहम्मद शमी आणि मोहम्मद सिराज यांनी प्रत्येकी 1 विकेट घेतली.
दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा
Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.