Prithvi Shaw Double Century: टीम इंडियाचा धडाकेबाज फलंदाज पृथ्वी शॉ सध्या काऊंटी क्रिकेट खेळत आहे. गेल्या काही काळापासून खराब फॉर्मशी झगडत असलेल्या पृथ्वी शॉ ने आपल्या विस्फोटक फलंदाजीने सर्वांचे लक्ष वेधून घेतले आहे. इंग्लंडमध्ये खेळल्या जात असलेल्या वन डे चषकात नॉर्थम्प्टनशायरकडून खेळताना शॉ ने सॉमरसेटविरुद्ध शानदार फलंदाजी केली. ओपनिंग करताना त्याने अवघ्या 129 चेंडूत द्विशतक झळकावले. यामध्ये त्याने पहिले शतक 81 चेंडूत, तर दुसरे शतक फक्त 48 चेंडूत केले.
दरम्यान, पृथ्वीने शेवटच्या षटकापर्यंत 150 च्या स्ट्राईक रेटने फलंदाजी केली. त्याने 153 चेंडूत 28 चौकार आणि 11 षटकारांसह एकूण 244 धावा केल्या. जरी त्याने आणखी तीन चेंडू खेळले असते तर तो नाबाद राहिला असता. 50 व्या षटकाच्या शेवटच्या चेंडूवर डॅनी लॅम्बने त्याला जॉर्ज थॉमसकरवी झेलबाद करुन पॅव्हेलियनमध्ये पाठवले. या शानदार खेळीत पृथ्वी तब्बल 219 मिनिटे मैदानातच राहिला. हा त्याचा लिस्ट ए कारकिर्दीतील सर्वात मोठा स्कोअर आहे.
तसेच, त्याच्या विस्फोटक फलंदाजीमुळे नॉर्थम्प्टनशायरने प्रथम फलंदाजी करताना 50 षटकांत 8 गडी गमावून 415 धावा केल्या. सॅम व्हाईटमनने 54, रिकार्डो वास्कोनसेलोसने 47 आणि एमिलिओ गाय ने 30 धावांचे योगदान दिले. पृथ्वी शॉ फॉर्ममध्ये परतताना पाहून चाहते खूश आहेत. याआधी त्याने दुलीप ट्रॉफीमध्ये पश्चिम विभागाकडून खेळताना अर्धशतक झळकावले होते. मात्र, आयपीएलमध्ये तो चांगलाच फ्लॉप ठरला. तेव्हापासून त्याच्या फॉर्मवर सातत्याने प्रश्न उपस्थित केले जात होते.
दुसरीकडे, शॉ ने या खेळीसह अनेक लिस्ट ए रेकॉर्ड मोडले. तो रोहित शर्मानंतरचा दुसरा भारतीय आणि एकंदरीत एकापेक्षा जास्त लिस्ट ए द्विशतक करणारा चौथा फलंदाज ठरला. शॉ व्यतिरिक्त रोहितने लिस्ट-ए क्रिकेटमध्ये तीन, अली ब्राउन आणि ट्रॅव्हिस हेडने प्रत्येकी दोन द्विशतके झळकावली आहेत. शॉने चेतेश्वर पुजाराचा विक्रम मोडला. वन-डे कपमध्ये द्विशतक झळकावणारा शॉ हा तिसरा फलंदाज ठरला.
तसेच, शॉ ने इंग्लंडमध्ये भारतीयाकडून सर्वाधिक लिस्ट ए स्कोअरच्या बाबतीत माजी भारतीय कर्णधार सौरव गांगुलीला मागे टाकले आहे. 1999 मध्ये इंग्लंडच्या भूमीवर श्रीलंकेविरुद्धच्या सामन्यात गांगुलीने 183 धावांची इनिंग खेळली होती. शॉ ने 56 लिस्ट ए सामन्यांमध्ये 50 पेक्षा जास्त सरासरीने 2800 हून अधिक धावा केल्या आहेत.
दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा
Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.