Prithvi Shaw will play for Northamptonshire in County Cricket in England:
भारतीय क्रिकेट संघातील युवा फलंदाज पृथ्वी शॉ आता इंग्लंडमध्ये क्रिकेट खेळताना दिसणार आहे. 23 वर्षीय शॉ याने उर्वरित काऊंटी क्रिकेट हंगामासाठी नॉर्थहॅम्प्टनशायर संघाशी करार केला आहे. त्यामुळे आता तो सध्या सुरु असलेली दुलीप ट्रॉफी संपल्यानंतर नॉर्थहॅम्प्टनशायरकडून खेळण्यासाठी इंग्लंडला जाणार आहे.
तो नॉर्थहॅम्प्टनशायरकडून इंग्लंडमधील देशांतर्गत लिस्ट ए क्रिकेट स्पर्धा रॉयल लंडन वनडे कप स्पर्धेतही खेळताना दिसणार आहे.
नॉर्थहॅम्प्टनशायरने काऊंटी क्रिकेट डिव्हिजन वनमध्ये आत्तापर्यंत 7 सामन्यांमधील एकच सामना जिंकला असून त्यांना अद्याप 7 सामने खेळायचे आहेत. दरम्यान, शॉची काऊंटी क्रिकेटमध्ये खेळण्याची ही पहिलीच वेळ असणार आहे.
तसेच चालू हंगामात तो इंग्लंडमध्ये काऊंटी संघाकडून खेळणारा पाचवा भारतीय क्रिकेटपटू ठरणार आहे. यापूर्वी या हंगामात चेतेश्वर पुजारा (ससेक्स), अजिंक्य रहाणे (लिसेस्टरशायर), अर्शदीप सिंग (केंट) आणि नवदीप सैनी (वर्सेस्टरशायर) हे खेळाडूंनी करार केले आहेत.
शॉ सध्या सुरु असलेल्या दुलीप ट्रॉफीमध्ये पश्चिम विभागाचा भाग आहे. या संघातील तो प्रमुख खेळाडूंपैकी एक आहे. ही स्पर्धा 16 जुलैला संपणार आहे. पृथ्वी शॉसाठी आयपीएल 2023 स्पर्धा चांगली गेली नसली, तरी त्याने देशांतर्गत क्रिकेटमध्ये गेल्या हंगामात चांगली कामिगिरी केली आहे. पण त्याला भारतीय संघात स्थान मिळवता आलेले नाही.
पृथ्वी शॉने 2018 मध्ये 19 वर्षांखालील विश्वचषक जिंकल्यानंतर लगेचच भारतीय संघात स्थान मिळवले होते. त्याने पहिल्याच कसोटी सामन्यात शतकी खेळी केली होती. पण २०१९ मध्ये प्रतिबंधात्मक पदार्थ घेतल्याचे आढळल्याने त्याच्यावर 8 महिन्यांची बंदी आली होती.
त्यानंतर मात्र, त्याला भारतीय संघात स्थान मिळवण्यात संघर्ष करावा लागला आहे. तरी त्याने पुनरागमन केले होते. पण तो पुन्हा भारतीय संघातून बाहेर गेला. त्याने भारतीय संघाकडून अखेरचा सामना 2021 मध्ये खेळला आहे.
नुकताच तो आयपीएल 2023 मध्ये दिल्ली कॅपिटल्सकडून खेळला. पण त्याला 8 सामन्यांत एका अर्धशतकासह 13.25 च्या सरासरीने 106 धावा केल्या.
दरम्यान, फेब्रुवारी 2023 मध्ये सोशल मीडिया इन्फ्लुएंसर सपाना गिल आणि तिच्या मित्रांबरोबर मुंबईतील रेस्टॉरंटमध्ये झालेल्या भांडणामुळे तो बराच चर्चेत आला होता. सध्या हे प्रकरण कोर्टात आहे.
शॉ याने त्याच्या कारकिर्दीत प्रथम श्रेणी क्रिकेटमध्ये 42 सामन्यांत 3679 धावा केल्या आहेत. यामध्ये त्याच्या 12 शतकांचा आणि 15 अर्धशतकांचा समावेश आहे. तसेच त्याने 53 लिस्ट ए क्रिकेट सामने खेळले असून 8 शतके आणि 11 अर्धशतकांसह 2627 धावा केल्या आहेत.
त्याचबरोबर टी20 क्रिकेटमध्ये त्याने 100 सामन्यांमध्ये 1 शतक आणि 19 अर्धशतकांसह 2507 धावा केल्या आहेत.
Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.