Pakistan Women Cricket team beat New Zealand in 2nd T20I by 10 runs:
पाकिस्तान महिला क्रिकेट संघ सध्या न्यूझीलंड दौऱ्यावर आहे. या दौऱ्यातील टी20 मालिका सुरू असून दुसरा सामना मंगळवारी (5 डिसेंबर) पार पडला. या सामन्यात पाकिस्तानने न्यूझीलंड महिला संघाला 10 धावांनी पराभूत केले. त्यामुळे पाकिस्तान संघाने तीन सामन्यांच्या या टी20 मालिकेत 2-0 अशी विजयी आघाडी घेत मालिका विजय निश्चित केला.
पाकिस्तान महिला संघाने पहिल्या टी20 सामन्यात 7 विकेट्सने विजय मिळवला होता. विशेष म्हणजे पाकिस्तान महिला संघाने न्यूझीलंडविरुद्ध मिळलेला हा पहिलाच टी20 मालिका विजय आहे.
या मालिकेपूर्वी पाकिस्तान महिला संघाला एकही टी20 सामना न्यूझीलंडविरुद्ध जिंकता आला नव्हता. याशिवाय 2018 नंतर पहिल्यांदाच पाकिस्तान महिला संघाने टी20 मालिका परदेशात जिंकली आहे.
दुसऱ्या टी20 सामन्याबद्दल सांगायचे झाले, तर पाकिस्तान महिला संघाने प्रमथ फलंदाजी करताना 20 षटकात 6 बाद 137 धावा केल्या होत्या. त्यांच्याकडून मुनीबा अलीने सर्वाधिक 35 धावांची खेळी केली, तर अलिया रियाझने 32 धावांची खेळी केली.
याशिवाय बिस्माह मारुफने 21 धावांची खेळी केली आणि कर्णधार निदा दारने 14 धावा केल्या. न्यूझीलंडकडून फ्रान जोनास आणि मॉली पेनफोल्ड यांनी प्रत्येकी 2 विकेट्स घेतल्या, तर हानाह रोव आणि कर्णधार सोफी डिवाईन यांनी प्रत्येकी 1 विकेट घेतली.
त्यानंतर 138 धावांच्या आव्हानाचा पाठलाग करतान न्यूझीलंडला 20 षटकात 7 बाद 127 धावाच करता आल्या. पाकिस्तानच्या गोलंदाजांनी शानदार सुरुवात करत 29 धावातच न्यूझीलंडच्या 4 विकेट्स घेतल्या होत्या.
पण नंतर हानाह रोव (33) आणि जॉर्जिया प्लिमरने (28) यांनी थोडीफार झुंज देण्याचा प्रयत्न केला. परंतू नंतर पाकिस्तानचे गोलंदाज वरचढ ठरले. त्यामुळे न्यूझीलंडला पराभवाचा सामना करावा लागला.
पाकिस्तानकडून फातिमा सनाने सर्वाधिक 3 विकेट्स घेतल्या. सादिया इक्बालने 2 विकेट्स घेतल्या, तर निदा दारने 1 विकेट घेतली.
दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा
Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.