West Indies vs England, 1st ODI:
इंग्लंडचा संघ सध्या वेस्ट इंडिज दौऱ्यावर असून वनडे मालिका खेळत आहे. या वनडे मालिकेतील पहिला सामना सर विवियन रिचर्ड्स स्टेडियम, अँटिग्वा येथे झाला. या सामन्यात वेस्ट इंडिजने ४ विकेट्सने विजय मिळवत मालिकेत 1-0 अशी आघाडी मिळवली.
या सामन्यात इंग्लंडने वेस्ट इंडिजसमोर 326 धावांचे आव्हान ठेवले होते. हे आव्हान वेस्ट इंडिजने 48.5 षटकात 6 विकेट्स गमावत पूर्ण केले. वेस्ट इंडिजचा कर्णधार विजयाचा हिरो ठरला. त्याने शतकी खेळी करत आपल्या संघाला विजय मिळवून दिला.
दरम्यान, वेस्ट इंडिजसाठी मायदेशात धावांचा पाठलाग करताना हा सर्वात मोठा विजय ठरला. यापूर्वी वेस्ट इंडिजने मायदेशात 326 धावांचा यशस्वी पाठलाग केला नव्हता.
या सामन्यात अखेरच्या 12 चेंडूत वेस्ट इंडिजला विजयासाठी 19 धावांची गरज होती. यावेळी 49 व्या षटकात सॅम करन गोलंदाजीला आला. त्याच्या पहिल्या चेंडूवर अल्झरी जोसेफने एक धाव काढली.
त्यानंतर दुसऱ्या चेंडूवर शाय होपने षटकार खेचला. तर तिसरा चेंडू निर्धाव गेला. यानंतर चौथ्या आणि पाचव्या चेंडूवर सलग षटकार ठोकत शाय होपने शतक तर साजरे केलेच, पण वेस्ट इंडिजचा विजयही निश्चित केला. शाय होप 83 चेंडूत 109 धावांची नाबाद शतकी खेळी केली.
या सामन्यात इंग्लंडने दिलेल्या 326 धावांच्या आव्हानाचा पाठलाग करताना वेस्ट इंडिजकडून एलिक अथानाझ आणि ब्रेंडन किंग यांनी सलामीला शानदार सुरुवात केली होती. त्यांनी 104 धावांनी शतकी भागीदारी नोंदवली होती.
अथानाझने 66 धावांची खेळी केली, तर ब्रेंडन किंगने 35 धावांची खेळी केली. त्यानंतर कर्णधार शाय होपला केसी कार्टी (16), शिमरॉन हेटमायर (32) आणि रोमारियो शेफर्ड (49) यांनीही चांगली साथ देत वेस्ट इंडिजच्या विजयात मोलाचा वाटा उचलला.
इंग्लंडकडून गस ऍटकिन्सन आणि रेहान अहमद यांनी प्रत्येकी 2 विकेट्स घेतल्या, तसेच ब्रायडन कार्स आणि लियाम लिव्हिंगस्टोन प्रत्येकी 1 विकेट घेतली.
तत्पुर्वी, इंग्लंडने नाणेफेक जिंकून प्रथम फलंदाजी करण्याचा निर्णय घेतला होता. इंग्लंडकडून पाचव्या क्रमांकावर फलंदाजीला उतरलेल्या हॅरी ब्रुकने सर्वाधिक 71 धावांची खेळी केली.
तसेच झॅक क्रावलीने 48 धावांची आणि फिलिप सॉल्टने 45 धावांची खेळी केली. त्याचबरोबर अखेरीस सॅम करनने 38 धावांची आणि ब्रायडन कार्सने 31 धावांची नाबाद खेळी केली. त्यामुळे इंग्लंडने प्रथम फलंदाजी करताना 50 षटाकात सर्वबाद 325 धावा उभारल्या.
वेस्ट इंडिजकडून रोमारिओ शेफर्ड, गुडाकेश मोती आणि ओशान थॉमस यांनी प्रत्येकी 2 विकेट्स घेतल्या. अल्झारी जोसेफ आणि यानिक कॅरिया यांनी प्रत्येकी 1 विकेट घेतली.
दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा
Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.