Indian Super League: इंडियन सुपर लीगच्या (आयएसएल) सामन्यात बुधवारी एफसी गोवाने केलेल्या चुकांचा फायदा नॉर्थईस्ट युनायटेडला झाला. उत्तरार्धातील गेममध्ये दोन गोल नोंदवत गुवाहाटीच्या संघाने विजयाचे पूर्ण तीन गुण प्राप्त केले, तर यजमान संघाला लढतीत वर्चस्व राखूनही घरच्या मैदानावर सलग दुसरा पराभव पत्करावा लागला.
दरम्यान, फातोर्डा येथील पंडित जवाहरलाल नेहरु स्टेडियमवर एफसी गोवाची 12 सामन्यांची अपराजित मालिका खंडित करताना मागील लढतीत मोहन बागानने 1-0 असा निसटता विजय मिळवला होता. बुधवारी नॉर्थईस्ट युनायटेडने 2-0 फरकाने सामना जिंकला.
दुसरीकडे, ऑस्ट्रेलियन टॉमी ज्युरिक याने 69व्या मिनिटास पेनल्टी फटक्यावर गोल केल्यानंतर 80व्या मिनिटास ओडेई ओनाइंडिया याच्या गोलमुळे नॉर्थईस्ट युनायटेडची आघाडी भक्कम झाली आणि त्या बळावर हुआन बेनाली यांच्या मार्गदर्शनाखालील संघाने स्पर्धेतील चौथ्या विजयाची नोंद केली. त्यांचे आता 16 लढतीतून 19 गुण झाले आहेत. त्यांनी एका अंकाची सुधारणा करताना सहावा क्रमांक मिळवला. स्पर्धेतील दुसऱ्या पराभवामुळे मानोलो मार्केझ यांच्या मार्गदर्शनाखालील एफसी गोवाचे 14 लढतीनंतर 28 गुण कायम राहिले, पण ते चौथ्या स्थानी घसरले. त्यांचा पुढील सामना रविवारी (ता. 25) कोची येथे केरळा ब्लास्टर्सविरुद्ध होईल.
एफसी गोवाला पूर्वार्धात गोल करण्याची कित्येक संधी मिळाल्या, पण त्यांना सातत्याने अपयश आले. दुसरीकडे मर्यादित आक्रमणे करुनही नॉर्थईस्ट युनायटेडने बाजी मारली. सामन्याच्या पूर्वार्धात नॉर्थईस्टच्या रेडीम ट्लांग याने एफसी गोवाचा गोलरक्षक अर्शदीप सिंग व बचावपटू जय गुप्ता यांना गुंगारा देत गोल केला होता, मात्र ऑफसाईड असल्याने तो अमान्य झाला.
दरम्यान, तासाभराच्या खेळानंतर नॉर्थईस्टच्या ज्युरिक याला गोलक्षेत्रात मागून ओढण्याची सेरिटन फर्नांडिस याची चूक एफसी गोवाला चांगलीच महागात पडली. पेनल्टी फटक्यावर ऑस्ट्रेलियन खेळाडूने गोलरक्षक अर्शदीपला संधीच दिली नाही. पुढच्याच मिनिटास पायाचे स्नायू दुखावल्यामुळे ज्युरिकला मैदान सोडावे लागले. निर्धारित वेळेतील दहा मिनिटे बाकी असताना नॉर्थईस्टला कॉर्नर फटका मिळाला. यावेळी प्रतिस्पर्धी खेळाडू नेस्टर याच्या हेडिंगवर चेंडू एफसी गोवाच्या ओनाइंडिया याला चाटून गोलनेटमध्ये गेला.
- आयएसएस स्पर्धेत एफसी गोवाविरुद्ध 20 लढतीत नॉर्थईस्ट युनायटेडचे 4 विजय
- फातोर्ड्यात एफसी गोवाचा 3 लढतीनंतर फक्त 1 गुण, मुंबई सिटीविरुद्ध बरोबरीनंतर लागोपाठ 2 पराभव
- सामन्यात एफसी गोवाचे चेंडूवर 61 टक्के वर्चस्व, तर नॉर्थईस्ट युनायटेची टक्केवारी 39
- एफसी गोवाच्या 10 पेनल्टी कॉर्नरच्या तुलनेत नॉर्थईस्ट युनायटेडचे 2
दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा
Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.