New Zealand  Dainik Gomantak
क्रीडा

IND vs NZ, 1st T20I: भारताच्या सुंदरचे अर्धशतक व्यर्थ, रांचीत न्यूझीलंडने फडकवली विजयी पताका

न्यूझीलंडने पहिल्या टी20 सामन्यात भारतीय संघाला पराभूत केले आहे.

Pranali Kodre

India vs New Zealand, 1st T20I: भारत विरुद्ध न्यूझीलंड संघात शुक्रवारी टी20 मालिकेतील पहिला सामना पार पडला. या सामन्यात न्यूझीलंडने 21 धावांनी विजय मिळवला. या विजयासह न्यूझीलंडने तीन सामन्यांच्या मालिकेतही 1-0 अशी आघाडी घेतली आहे.

रांचीतील झारखंड स्टेट क्रिकेट असोसिएशन आंतरराष्ट्रीय क्रिकेट स्टेडियमवर (जेएससीए स्टेडियम) झालेल्या या सामन्यात न्यूझीलंडने विजयासाठी भारतासमोर 177 धावांचे आव्हान ठेवले होते. पण या आव्हानाचा पाठलाग करताना भारताला 20 षटकात 9 बाद 155 धावा करता आल्या.

भारताकडून वॉशिंग्टन सुंदरने अर्धशतकी खेळी करत विजय मिळवून देण्याचा प्रयत्न केला. पण त्याला दुसऱ्या बाजूने भक्कम साथ मिळाली नाही. दरम्यान, न्यूझीलंडने तब्बल पाच वर्षांनंतर भारतात भारताविरुद्ध टी20 सामना जिंकला आहे. यापूर्वी त्यांनी 2017 साली राजकोटला झालेला टी20 सामना जिंकला होता.

(New Zealand won 1st T20I at Ranchi by 21 runs against India)

शुक्रवारी झालेल्या सामन्यात भारताने 177 धावांचा पाठलाग करताना पहिल्या तीन विकेट्स पहिल्या 4 षटकांच्या आत 15 धावांवरच गमावल्या होत्या. पण त्यानंतर भारताची कर्णधार-उपकर्णधाराच्या जोडीने म्हणजेच हार्दिक पंड्या आणि सूर्यकुमार यादव यांनी डाव सावरताना अर्धशतकी भागीदारी केली.

मात्र, त्यांची भागीदारी रंगत असतानाच 12 व्या षटकात ईश सोधीने 34 चेंडूत 47 धावा करणाऱ्या सूर्यकुमार यादवला बाद केले. त्यानंतर पुढच्या चारच चेंडूत 13 व्या षटकात हार्दिक पंड्या 21 धावांवर बाद झाला.

सूर्यकुमार आणि हार्दिक यांच्यात चौथ्या विकेटसाठी 68 धावांची भागीदारी झाली. हे दोघे बाद झाल्यानंतर वॉशिंग्टन सुंदरने जबाबदारी खांद्यावर घेतली होती. मात्र दुसऱ्या बाजूने भारतीय संघाने नियमित कालांतराने विकेट्स गमावल्या. त्यामुळे भारताला न्यूझीलंडने दिलेले आव्हान पार करता आले नाही.

सुंदरही अर्धशतकी झुंज दिल्यावर अखेरच्या षटकात बाद झाला. भारताकडून सुंदरने 28 चेंडूत 5 चौकार आणि 3 षटकारांसह 50 धावांची खेळी केली. ही भारतीय डावातील सर्वोच्च खेळी ठरली.

न्यूझीलंडकडून मायकल ब्रेसवेल, मिशेल सँटेनर आणि लॉकी फर्ग्यूसन यांनी प्रत्येकी 2 विकेट्स घेतल्या. तसेच जेकॉब डफी आणि ईश सोधी यांनी प्रत्येकी 1 विकेट घेतली.

तत्पूर्वी, भारताने नाणेफेक जिंकून न्यूझीलंडला प्रथम फलंदाजीसाठी पाचारण केले होते. प्रथम फलंदाजी करणाऱ्या न्यूझीलंडच्या सलामीवीरांनी चांगली सुरुवात केली. फिन ऍलेन आणि डेवॉन कॉनवे यांनी सुरुवातीलाच काही आक्रमक फटकेही खेळले.

पण त्यांची जोडी घातक ठरत असतानाच वॉशिंग्टन सुंदरने फिन ऍलेनला 35 धावांवर बाद केले. त्यानंतर चार चेंडूनंतर लगेचच सुंदरने स्वत:च्याच गोलंदाजीवर मार्क चॅपमनचा झेल घेत त्याला शुन्यावर माघारी धाडले.

पण त्यानंतर डेवॉन कॉनवे आणि ग्लेन फिलिप्स यांनी 60 धावांची भागीदारी करत डाव सावरला. त्यांची भागीदारी कुलदीप यादवने फिलिप्सला 17 धावांवर बाद करत 13 व्या षटकात तोडली. पण त्यानंतरही कॉनवे आणि डॅरिल मिशेलने न्यूझीलंडचा डाव सांभाळला. कॉनवे 35 चेंडूत 7 चौकार आणि 1 षटकारासह 52 धावा करून बाद झाला.

तो बाद झाल्यानंतरही मिशेलने शेवटपर्यंत आक्रमक खेळ सुरू ठेवला. अखेर त्याने 30 चेंडूत 59 धावांची नाबाद खेळी केली. या खेळी दरम्यान त्याने 3 चौकार आणि 5 षटकार मारले. त्यामुळे न्यूझीलंडने 20 षटकात 6 बाद 176 धावा केल्या. दरम्यान, अर्शदीप सिंगने गोलंदाजी केलेल्या अखेरच्या षटकात तब्बल 27 धावा दिल्या. त्यामुळे हे षटक भारताला महागात पडले.

भारताकडून वॉशिंग्टन सुंदरने सर्वाधिक 2 विकेट्स घेतल्या. तसेच अर्शदीप सिंग, कुलदीप यादव आणि शिवम मावी यांनी प्रत्येकी 1 विकेट घेतली.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Goa Congress: खासदार विरियातो, प्रदेशाध्यक्ष पाटकर पोलिसांच्या ताब्यात; काँग्रेसचे कॅश फॉर जॉब विरोधात आंदोलन

IFFI Goa 2024: "आलीयाच्या सुरक्षेसाठी मी त्याला हाकललं होतं" काही तासांतच 'ते' विधान फिरवल्याने इम्तियाज अली वादाच्या भोवऱ्यात

Goa Today's News Live: कळंगुटमध्ये रस्त्यावर नग्न होऊन राडा करणाऱ्या UP च्या पर्यटकाला अटक

National Cashew Day: गोव्यात काजूचे पीक घेणे का बनत आहे कठीण? कारणे जाणून घ्या..

Goa Bench: निवृत्त कर्मचारी सेवा नियमांत बदल; निवृत्तीवेतनाची थकबाकी देण्यास एक वर्षाची मुदत

SCROLL FOR NEXT